संपूर्ण पृथ्वीवर कोरोनानं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस ते वाढतंच आहे. भारतात तर त्यानं अक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. पण अंतराळात काय स्थिती आहे? अंतराळातही कोरोना पसरू शकतो का? आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील शास्त्रज्ञांना कोरोना होऊ शकतो का? सध्या त्याच प्रश्नावरुन जगभरात काहूर माजलं आहे. सर्वसामान्य लोकांना कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क इत्यादी गोष्टींचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्याबाबत जगभरात प्रत्येक देशात नियम, बंधनं आहेत.
कोरोनापासून वाचण्याचा हाच एक उपाय आहे, असं कानीकपाळी ओरडून सांगितलं जात आहे, मग अंतराळ स्थानक आणि तिथले शास्त्रज्ञ ‘कोरोनाप्रूफ’ आहेत का, मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंग न ठेवता, छोट्याशा जागेत एकमेकांच्या गळाभेटी घेऊनही कोरोना त्यांना स्पर्श करू शकणार नाही का? शास्त्रज्ञांना या कुठल्याच गोष्टींचं बंधन नाही का, असा सवाल आता सर्वसामान्य लोकांकडूनही विचारला जात आहे.
नुकतंच एक कारण त्याला निमित्त ठरलं.
सर्वाधिक धनाढ्यांपैकी एक एलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या कंपनीनं चार अंतराळवीरांना नुकतंच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवलं. अंतराळ स्थानकात आधीच सात अंतराळवीर उपस्थित होते. हे चारही नवे शास्त्रज्ञ तिथे पोहोचताच, तिथे आधीच असलेल्या सगळ्या अंतराळवीरांनी नव्या ‘पाहुण्यां’चं अतिशय आपुलकीनं स्वागत, आदरातिथ्य केलं. एकमेकांशी हस्तांदोलन केलं, गळामिठ्या मारल्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. शास्त्रज्ञच जर इतके बेपर्वाईने वागत असतील, साधा मास्कही घालत नसतील, तर सर्वसामान्यांकडून नियमांचं उल्लंघन झालं, तर त्यात चूक काय, अंतराळात कोरोना पसरत नाही का, असे जाहीर सवाल लोकांनी उपस्थित करायला सुरुवात केली. पण त्याआधी अंतराळ स्थानक म्हणजे नेमकं काय, हे समजून घेऊया.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळातलं एक संशोधन केंद्र आहे. १९९८ मध्ये अंतराळात पाठवलेलं हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालं. त्याचा आकार फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठा आहे. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे. अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि १० युरोपियन देशांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालतं; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह आहे. एकावेळी आठ ते दहा शास्त्रज्ञ राहू शकतील, अशी व्यवस्था तिथे आहे. वर्षाचे बाराही महिने अंतराळवीरांचं ते निवासस्थान आहे. संशोधन करण्यासाठी दर सहा महिन्यांनी अंतराळवीरांचा नवा चमू इथे पाठवला जातो. एक गट गेला की दुसरा गट तिथे दाखल होतो. ही प्रक्रिया अव्याहत सुरू असते. आतापर्यंत एकावेळी जास्तीत जास्त तेरा शास्त्रज्ञ तिथे राहिलेले आहेत.
पृथ्वीवरील गुरुत्वीय बलामुळे जे प्रयोग पृथ्वीवर करता येत नाहीत, ते प्रयोग या अंतराळ स्थानकात करण्यात येतात. मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येण्याच्या उद्देशाने, वजनविरहित अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल याचा अभ्यासही या स्थानकावर केला जात आहे. खरंतर कोणताही शास्त्रज्ञ अंतराळ स्थानकावर जाण्यापूर्वी एक प्रक्रिया राबवली जाते. स्थानकावर पोहोचण्यापूर्वी दोन ते तीन आठवडे त्यांना क्वारंटाइन केलं जातं. अर्थातच हा नियम कोरोना काळाच्या बऱ्याच आधीपासून राबवला जातो आहे. काही वर्षांपूर्वी नासानं आपलं ‘अपोलो’ अभियान राबवलं होतं, त्यावेळी अंतराळ स्थानकात काही शास्त्रज्ञ आजारी पडले होते. तेव्हापासून अंतराळ स्थानकात जाणाऱ्या शास्त्रज्ञांना दोन आठवड्यांचं क्वारंटाइन सक्तीचं करण्यात आलं आहे. या शास्त्रज्ञांना कोणालाही भेटता येत नाही. केवळ अति महत्त्वाच्या गोष्टींसाठी आणि अति विशिष्ट लोकांना कठोर वैद्यकीय तपासणीनंतर या शास्त्रज्ञांची अल्प काळासाठी भेट घेता येते.
गेल्या वर्षी ९ एप्रिलला कझाकस्थान येथील बैकोनूर प्रक्षेपण केंद्रावरुन तीन अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात पाेहोचवले गेले होते. या प्रक्षेपणासाठी उपस्थित असलेल्या एव्हेजिनी मिक्रिन या वरिष्ठ रशियन अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. अर्थात यामुळे अंतराळ स्थानकात कुठल्याही प्रकारे कोरोनाचा प्रसार होणार नाही, अशी ग्वाही रशियन स्पेस एजन्सी ‘रॉसकॉसमॉस’ नं दिली होती. असं असलं तरी स्थानकावर जाण्यासाठीची बंधनं आणखी कडक करण्यात आली होती.
नील आर्मस्ट्राँगचा वाढदिवसही क्वारंटाइनमध्येच! अंतराळ स्थानकात जातानाच नाही, तर तिथून आल्यानंतरही अंतराळवीरांना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन व्हावं लागतं. नासाने ‘अपोलो ११, १२, १३ आणि १४’ या चांद्रमाेहिमा राबवल्या होत्या. त्यावेळीही शास्त्रज्ञांना क्वारंटाइन व्हावं लागलं होतं. तीही क्वारंटाइन करण्यात आली होती. नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. त्याच काळात नील आर्मस्ट्राँगलाही आपला वाढदिवस क्वारंटाइनमध्येच साजरा करावा लागला होता!