- अभिजित घोरपडे(संपादक, भवताल मासिक)महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहने दिसत आहेत. याची कारणे दोन- १.पेट्रोल, डिझेलची मोठ्या प्रमाणात झालेली दरवाढ. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत चार्जिंगसाठी फारसा खर्च नसणे. २. या वाहनांना ‘इको-फ्रेंडली’ म्हणून मिळालेली मान्यता. ही रस्त्यावरील प्रदूषण कमी करणारी, गोंगाट न करणारी वाहने. यांच्याबाबत महत्त्वाची बाब सांगितली जाते- त्यांच्या वापरामुळे जागतिक तापमानवाढ रोखण्यास मदत होईल, कारण ती कार्बन वायूंचे उत्सर्जन करत नाहीत. अलीकडे केंद्र आणि राज्य पातळीवरही हा मुद्दा जोरकसपणे मांडला जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वक्तव्येसुद्धा हेच सांगतात. त्यामुळे या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने धोरणे आखली जात आहेत. भारतातील भविष्यातील वाहन उद्योग कोणत्या दिशेने जाणार आहे, हेही यावरून स्पष्ट होत आहे.मात्र, या वाहनांचा ज्या प्रकारे ‘ग्रीन’ म्हणून प्रचार केला जात आहे, तितक्या प्रमाणात ही वाहने पर्यावरणस्नेही आहेत का?, त्याचबरोबर त्यांच्या वापरामुळे हवामान बदलाची समस्या दूर होईल यात तथ्य आहे का? इलेक्ट्रिक वाहने कशावर चालतात? इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी असते. बॅटरीवर चालणाऱ्या इतर उपकरणांप्रमाणेच (उदा. मोबाईल, लॅपटॉप, वगैरे) या वाहनांमध्ये ऊर्जा साठवली जाते आणि वापरली जाते. मात्र, सध्याची पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यासारख्या इंधनावर चालणारी परंपरागत वाहने यांच्यात वापरली जाणारी ऊर्जा आणि आताची इलेक्ट्रिक वाहने यांच्यात ऊर्जेच्या वापरासंबंधी एक मूलभूत फरक आहे. परंपरागत वाहनांमध्ये ऊर्जा पेट्रोल, डिझेल, गॅस यासारख्या इंधनाच्या रूपात, तर, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरीच्या रूपाने साठवलेली असते. मात्र, या साठवलेल्या ऊर्जेचे रूपांतर चल ऊर्जेत (कायनेटिक एनर्जी) केल्याशिवाय वाहन चालू शकत नाही. ते होताना परंपरागत वाहनांमध्ये इंधनाचे ज्वलन होते. त्यातून कार्बन डायऑक्साईड किंवा इतर वायू बाहेर पडतात. हेच वायू जागतिक तापमानवाढ करण्यास कारणीभूत ठरतात. याशिवाय इंधनाचे पूर्ण ज्वलन न झाल्यास त्यातून धूर व इतर प्रदूषित घटकही बाहेर पडतात.याउलट इलेक्ट्रिक वाहनांमध्ये असे ज्वलन होत नाही. त्याऐवजी साठवलेल्या ऊर्जेचे चल ऊर्जेत रूपांतर होताना ते विद्युत-रासायनिक पद्धतीने होते. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूंचे उत्सर्जन होत नाही, शिवाय धूर व इतर प्रदूषित घटकही बाहेर पडत नाहीत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे काही फायदे आहेतच. पण, या बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणारी वीज कुठून येते?, आणि ती कशी तयार केली जाते?, हा मुद्दा येथे महत्त्वाचा आहे.वीज कशी तयार केली जाते? इलेक्ट्रिक वाहनांना लागणारी वीज स्वच्छ प्रकारच्या पद्धतींनी (उदा. सौरऊर्जा, पवनऊर्जा, भूऔष्णिकऊर्जा, जलविद्युत, काडी-कचऱ्यापासून) निर्माण केली जात असेल तर, या वाहनांना पूर्णपणे ‘ग्रीन’ म्हणता येईल. मात्र, या वाहनांसाठी लागणारी ऊर्जा अशा स्वच्छ पद्धतींऐवजी कोळसा, खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू यारखे जीवाश्म इंधन जाळून केली जात असेल तर, हा हेतू साध्य होत नाही. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी कार्बन वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वीज स्वच्छ पद्धतींनी निर्माण होते ना, हे निश्चित करणे गरजेचे आहे. वीज तयार होताना जीवाश्म इंधन जाळले जात असेल आणि अशा विजेवर इलेक्ट्रिक वाहने चार्ज केली जात असतील तर, अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही. अशा परिस्थितीत वाहनांमधून कार्बन वायूंचे उत्सर्जन झाले नाही तरी जिथे कुठे वीजनिर्मिती केली जाते, तिथे या वायूंचे उत्सर्जन होणारच. ते आपल्या नजरेआड होते इतकेच. याचा एक फायदा नक्की आहे. अलीकडे दिल्लीसारख्या महानगरांमध्ये हवेचे प्रदूषण ही प्रचंड मोठी समस्या बनली आहे. त्या दृष्टीने रस्त्यावर धुराचे प्रदूषण न करणारी ही वाहने फायदेशीर आहेत. मात्र, त्यांच्यामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाची समस्या सुटेल, हे म्हणणे अर्धसत्य आहे.भारतात ऊर्जा निर्मितीसाठी अजूनही आपण मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधनावरच अवलंबून आहोत. केंद्रीय वीज प्राधिकरणानुसार, देशात जीवाश्म इंधन आणि इतर स्वच्छ इंधन यांच्या स्थापित क्षमतेचे गुणोत्तर सुमारे ६० : ४० असे आहे. म्हणजे ४० टक्के ऊर्जा स्वच्छ स्रोतांद्वारे निर्माण केली जाऊ शकते. पण, प्रत्यक्षात काय घडते?, याच प्राधिकरणाची २०२० वर्षातील वीज निर्मितीची आकडेवारी सांगते की, गेल्या संपूर्ण वर्षात देशात झालेल्या ऊर्जा निर्मितीत सुमारे ८४ टक्के वाटा जीवाश्म इंधनाचा आहे. म्हणजे जीवाश्म इंधनावर निर्माण केलेल्या विजेवर इलेक्ट्रिक मोटारींच्या बॅटरी चार्ज होणार असतील तर, कार्बन वायूंचे उत्सर्जन कसे काय कमी होणार?, त्याऐवजी वाहने थेट जीवाश्म इंधनावर चालवलेली परवडतील. निदान, एका ऊर्जेचे दुसरीमध्ये रूपांतर करताना होणारा क्षय (नुकसान) तरी टळेल. याशिवाय बॅटरीमध्ये लिथियम, निकेल, कोबाल्ट, ग्राफाईट यासारखी दुर्मीळ मूलद्रव्ये वापरली जातात. ती मिळवण्यासाठी लागणारी जास्त ऊर्जा व ॲसिडसारखे घातक पदार्थ जास्त प्रमाणात भासतात. हे ॲसिड, बॅटरी यांची विल्हेवाट करण्याची यंत्रणा उभारणे व अंमलात आणणे गरजेचे आहेच. या मोटारींना चार्ज करणारी ऊर्जा स्वच्छ स्रोतांपासून तयार होणार नाही, तोवर त्या पर्यावरणस्नेही ठरणार नाहीत. तेच लक्ष्य ठेवून पुढील मार्गक्रमणा हवी. या मोटारींच्या चार्जिंगसाठी लागणारी सर्व वीज ही स्वच्छ स्रोतांमधूनच यायला हवी, अशी सक्ती केली तरच, या मोटारींचा प्रसार आणि त्यांचे खरेखुरे ‘ग्रीन’ बनणे हे एकमेकांना समांतर असे घडून येईल.abhighorpade@gmail.com
electric vehicles: इलेक्ट्रिक वाहने खरेच इको-फ्रेंडली असतात? नेमकं वास्तव काय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 2:31 PM