रवींद्र गायकवाड या शिवसेनेच्या पराक्रमी खासदाराने विमानातील एका कर्मचाऱ्याला स्लिपरने मारल्याच्या हवाई घटनेनंतर तेलगू देसम पक्षाच्या दिवाकर रेड्डी या खासदारानेही तसाच प्रकार केला आहे. विमानतळावर उशिरा पोहचलेल्या या खासदाराने त्याच्यासाठी विमान थांबवले नाही म्हणून तेथे गोंधळ घातला. तेथील फर्निचर तोडले, संगणकांची तोडफोड केली आणि अधिकाऱ्यांना धक्काबुक्की म्हणजे मारहाण केली. त्याचा हा पराक्रम सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांवर चित्रितही झाला आहे. आपल्याला लोकांनी निवडून दिले आहे, किंवा आपला पक्ष सत्तेच्या अळणीवर बसला आहे म्हणून या देशावर आपली खासगी मालकी कायम झाली आहे असा समज करून घेतलेली जुनी सरंजामी मानसिकता असलेली ही माणसे लोकांच्या निवडीला पात्र व्हावी, हे त्यांच्या फसवेगिरीएवढेच त्यांच्या मतदारांचेही अडाणीपण सांगणारे प्रकरण आहे. निवडून देण्यापूर्वी चांगली वागणारी माणसे निवडून दिल्यानंतर अशी बिघडत असतील तर त्याचा दोष मतदारांकडे कमी जातो. मात्र निवडून आल्यानंतर, जनतेचे प्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे, सबब आपण निदान सार्वजनिक जागी सभ्यपणे व संयमाने वागले पाहिजे हे ज्यांना कळत नाही त्या लोकप्रतिनिधींचे वर्णन ‘त्यांच्यात मुळातच माणुसकी नसावी’ अशा शब्दात करणे भाग आहे. आमदार वा खासदार हे आता खासगीतले विषय राहिले नाहीत. त्यांच्या प्रत्येकच हालचालीची व वक्तव्याची चर्चा लोक करतील व त्यांना ती करण्याचा हक्कही आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे केलेला हात त्यांच्या पत्नीने, मेलानियाने तिरस्काराने फटकारला यावर जगभराच्या वृत्तपत्रांनी लेख लिहिले व सगळ्या वाहिन्यांनी त्या अचंबित करणाऱ्या प्रकरणाचे दृश्य सारा दिवस जगाला दाखविले. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, म्हणजे तुम्ही तुमच्या वर्तनाने समाजासमोर काही चांगले आदर्श घडविले पाहिजे हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. रवींद्र गायकवाड किंवा दिवाकर रेड्डी ही माणसे याला अपवाद असतील तर ती सार्वजनिक नव्हे तर एकूृणच सामाजिक व्यवहारात व जीवनात अपात्र ठरणारी माणसे आहेत हे त्यांना स्पष्टपणे बजावले पाहिजे. विमान कंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली प्रवासबंदी त्याचमुळे योग्य ठरणारीही आहे. परंतु ती योग्य असली तरी अपुरी आहे. सार्वजनिक जागी गुंडगिरी करणाऱ्याला ती जागा बंद करूनच केवळ सरकार आणि पोलीस विभागाला त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होता येत नाही. गुंडगिरी व मारहाण हे फौजदारी गुन्हे आहेत. ते करणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देणे व यथावकाश न्यायासनासमोर उभे करणे हाही त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे. कायद्यानुसार विमानात दंगा करणाऱ्याचा बंदोबस्त करण्याचे सर्वाधिकार विमानाच्या मुख्य वैमानिकाला असतात. त्यासाठी त्याला संबंधित गुंडाला गोळी घालून ठार मारण्याचाही अधिकार असतो. त्यासाठी त्याला पिस्तुलेही दिली जातात. ही बाब विमान कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी यांचे अधिकार व जबाबदारी स्पष्ट करणारी आहे. मात्र यातील सर्वात मोठा अपराध आपल्यासाठी विमान थांबविले नाही म्हणून विमानतळावर राडा करणाऱ्याचा किंवा आपल्याला हवी ती जागा बसायला दिली नाही म्हणून विमान कर्मचाऱ्याला स्लिपरने मारणाऱ्या खासदार नावाच्या अपात्र लोकप्रतिनिधींचा आहे. दुर्दैव याचे की अशा माणसांना त्यांचे पक्ष जाब विचारीत नाहीत, ते त्यांना निलंबित करीत नाहीत आणि त्यांना दोष देण्याचेही ते टाळतानाच दिसतात. उलट ‘आमच्या माणसाने केले तेच बरोबर’ अशी ते त्याची पाठराखण करतात. अशावेळी या देशातील राजकीय पक्षांचा त्यांच्या प्रतिनिधींच्या गुंडगिरीला पाठिंबा असतो व त्या गुंडगिरीत त्यांना त्यांच्या पक्षाची कीर्ती व नाव वाढलेले पाहता येते असेच म्हणावे लागते. सार्वजनिक सभ्यता या नावाचीही एक महत्त्वाची बाब आहे. ती जपणे ही सगळ्या सामाजिक व राजकीय संघटनांची व त्यांचे कार्यकर्ते म्हणविणाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र गुंडगिरीच प्रमाण ठरविली जात असेल, वैमानिकांवरील हल्ले, पोलिसांवरील दगडफेक, डॉक्टरांना मारहाण आणि वृत्तपत्रांवरील हल्लेखोरी अशाच गोष्टी राजकारणाचा भाग बनत असतील तर आपले पुढारी त्या गायकवाडांसारखे आणि रेड्डींसारखेच वागणार. शिवाय त्यांचे अनुकरण त्यांचे चेले-चपाटेही करणार. गायकवाडांना सेनेने संरक्षण दिले. सेना हा महाराष्ट्रातील सत्तारूढ पक्ष असल्याने सरकारही त्याच्यासमोर हतबल झालेले दिसले. रेड्डींचा पक्ष तेलंगणात सत्तारूढ आहे आणि त्याला किमान राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपर्यंत राजी राखणे केंद्राला भाग आहे, म्हणून तेही सुटणार... कौटिल्याने नीतीचे दोन प्रकार सांगितले. एक, नीती राजासाठी (म्हणजे आजच्या लोकशाहीतील राज्यकर्त्या म्हणविणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी) आणि दुसरी, सामान्य माणसांसाठी. सत्ता व साम्राज्य वाढविण्यासाठी राज्यकर्त्याने केलेली अनीती हाही त्याच्या नीतीत बसणारा भाग आहे असे कौटिल्य म्हणाला. मात्र अशी सवलत सामान्य माणसांना दिली तर समाजात कायमची अशांतता निर्माण होते असेही त्याने सांगितले. राजांची अनीती हा त्यांच्या सत्तेच्या सबलीकरणाचा भाग असल्यामुळे तो नीतीत बसतो असे त्याचे म्हणणे आहे. ही राजनीती रेड्डी किंवा गायकवाड यांचे समर्थन करणारी व जनतेला तुच्छ लेखणारी ठरते.
पुढारी कायद्याहून श्रेष्ठ असतात ?
By admin | Published: June 20, 2017 12:43 AM