>> संदीप प्रधान
पार्थ पवार आणि रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचा भविष्यकाळ आहेत तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे हा पक्षाचा वर्तमानकाळ आहे. पार्थ यांनी लागोपाठ दोन वेळा केलेली दोन विधाने अनेकांच्या भुवया उंचवणारी तर आहेतच पण वेगवेगळ्या चर्चा, विवाद यांना तोंड फोडणारी आहेत. सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येबाबत सुरू असलेल्या पोलीस तपासाबद्दल राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व या सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख हे समाधान व्यक्त करीत असताना अचानक पार्थ यांनी विरोधी भाजपच्या मागणीत सूर मिसळत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. राम मंदिराच्या भूमिपूजनाची घोषणा होताच शरद पवार यांनी मंदिर उभारणीमुळे कोरोना पळून जाईल, अशी काहींची समजूत आहे, असे मत व्यक्त केले. मात्र पार्थ यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला.
पार्थ यांच्या लोकसभा उमेदवारीमुळे आजोबा शरद पवार यांना निवडणूक रिंगण सोडावे लागले होते व भाजपच्या बाजूने वाहणारे वारे पाहून खुद्द पवार यांनी पळ काढला, असा प्रचार भाजपने केला हे सर्वश्रूत आहे. मात्र पार्थ यांनी वरचेवर पक्षाच्या भूमिकेच्या किंवा सर्वोच्च नेतृत्वाच्या वक्तव्याच्या विपरीत भूमिका व्यक्त करणे खटकणारे आहे. प्रत्येक वेळी हे पार्थ यांचे वैयक्तिक मत आहे, असे खुलासे करणे शोभनीय नाही. ज्यांनी पार्थ यांचे पहिलेवहिले मराठीत लिहिलेले भाषण ऐकले आहे, त्यांचा पार्थ हे संपूर्ण विचारांती वैयक्तिक भूमिका घेत असतील हे पटणे जरा कठीण आहे.
पार्थ यांच्या अवतीभवती असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांचे असे मत आहे की, पार्थ हे राम मंदिराच्या बाजूने असलेल्या लोकभावनेचा आपण आदर करतो हे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र हा दावा पोकळ वाटतो. पार्थ हे राजकारणातील त्यांचे ‘गॉडफादर’ अर्थात त्यांचे पिताश्री अजित पवार यांच्या इशाऱ्याखेरीज अशी वक्तव्ये करणार नाहीत. शरद पवार यांच्या वक्तव्याशी सुसंगत अशी विधाने रोहित पवार हे वरचेवर करताना दिसतात तर पार्थ हे अजित पवार यांना जी वक्तव्ये जाहीरपणे करणे शक्य नाहीत ती करतायत, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच कुजबुज आहे.
शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस हे सध्या एका विचित्र कोंडीत अडकले आहेत. जेव्हा देशभर काँग्रेसची सत्ता होती तेव्हा काँग्रेसमधील दरबारी राजकारण, जमिनीशी जोडलेल्या नेत्यांचे पाय कापण्याची प्रवृत्ती याविरुद्ध पवार यांनी बंड केले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र पवार यांच्या पक्षाला स्वबळावर सत्ता हस्तगत करण्याइतके बहुमत कधीच मिळाले नाही. (२००४ मध्ये संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपद चालून येऊनही पवार यांनी ते नाकारल्याची सल अजित पवार यांनी यापूर्वी व्यक्त केली होती) त्यामुळे तब्बल १५ वर्षे काँग्रेससोबत आघाडीचे सरकार स्थापन करावे लागले. आपल्या प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षासोबत सत्तेत बसताना या पक्षाची राज्यातील पाळेमुळे खच्ची करणे ही राष्ट्रवादी मजबूत होण्याकरिता त्यांची गरज होती व ती त्यांनी केली. किंबहुना महाराष्ट्रात काँग्रेसची घसरण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस टिकली. परंतु काँग्रेसची देश पातळीवर मोठी घसरण झाली आणि नरेंद्र मोदी फॅक्टर राजकारणात उदयाला आला. मोदींच्या नेतृत्वापुढे देशभरातील शरद पवार यांच्यापासून चंद्राबाबू नायडूंपर्यंत अनेक नेते फिके पडले. मोदी या नावाचा करिष्मा भाजप सरकारची दुसरी इनिंग सुरु झाली तरी अजून उतरणीला लागलाय असे ठामपणे म्हणता येत नाही. त्यामुळे पवार यांना मोदी यांच्याशी थेट वैर पत्करायचे नाही.
त्याचवेळी राष्ट्रीय पातळीवर विरोधी नेतृत्वाची असलेली पोकळी राहुल गांधी व काँग्रेसकडून भरुन निघत नसल्याने ती आपण भरुन काढण्याचा मोह पवार यांना आवरत नाही. नितीशकुमार हे एकेकाळी विरोधी पक्षाचे नेतृत्व करतील, असा आश्वासक चेहरा वाटत होते. मात्र मोदींचा मुकाबला करण्याऐवजी त्यांनी मोदींना शरण जाणे पसंत केले. मुलायमसिंह यादव वृद्ध झाले आहेत तर अखिलेश यादव यांना अनुभव नाही. लालूप्रसाद यादव निमाले असून त्यांचे पुत्र तेजस्वी यांची बिहारमध्ये कसोटी आहे. ममता बॅनर्जी यांच्यापासून मायावतींपर्यंत अनेक नेते वाद, भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधकांमधील मतभेद यामुळे मोदींविरुद्धच्या स्पर्धेत टिकाव धरु शकतील, अशी स्थिती नाही. त्यामुळे मोदींशी वैर पत्करायचे नाही पण विरोधकांची रिकामी स्पेस काबीज करण्याचा प्रयत्न करायचा हा पवार यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हा त्याचाच परिपाक आहे. याखेरीज काँग्रेसला रोखणे ही तर राष्ट्रवादीची गरज आहेच.
गेली पाच वर्षे युतीचे सरकार असताना सत्तेबाहेर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झाली. अनेक नेते पक्ष सोडून गेले. काही नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले तर काही नेत्यांना तुरुंगवास घडला. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले आहे. काँग्रेसने पाठिंबा दिल्याने हे सरकार सुरू आहे. अर्थात या सरकारमध्ये सर्वात मोठा लाभार्थी राष्ट्रवादी काँग्रेस असून काँग्रेसची अवस्था गाढव आणि ब्रह्मचर्य गमावलेल्या माणसासारखी झाली आहे. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येते हा संदेश देण्यात पवार यशस्वी झाले आहेत. अर्थात शिवसेनेबरोबर सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत झालेल्या पवार-मोदी भेटीतील चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही. पण महाविकास आघाडीचा प्रयोग करुनही या दोन्ही नेत्यांच्या संबंधात जराही खटास नाही.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर पार्थ यांचे वक्तव्य पाहिले तर नातू पार्थ व आजोबा शरद पवार यांनी एकाचवेळी परस्परविरोधी वक्तव्ये करून गोंधळ, संभ्रम निर्माण करणे हे राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणारे आहे. समजा अजित पवार व पार्थ एका बाजूला तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार दुसऱ्या बाजूला अशा सुप्त संघर्षातून ही परस्परविरोधी वक्तव्ये केली जात असतील तरी एक गोष्ट नक्की आहे आणि ती म्हणजे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असे वाटणाऱ्या राष्ट्रवादीतील गटाच्या खेळीने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे पक्षाला गमावलेली सत्ता मिळवून दिली आहे. यदाकदाचित राष्ट्रवादीतील भाजपसोबत सत्ता स्थापन केली पाहिजे, असे मानणारा गट भविष्यात पक्षात प्रभावी झाला तरी सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस विरोधाच्या पायावर उभा राहिलेल्या या पक्षातील दोन गटांचे साधन जरी वेगळे असले तरी साध्य हे सत्ता मिळवण्याचे असून ते फलद्रुप होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली तेव्हा शरद पवार, तारीक अन्वर व पूर्णो संगमा हे तिघे (अमर, अकबर, अँथोनी) एकविचाराचे होते. कालांतराने दीर्घकाळ काँग्रेससोबत सत्तेत राहिल्यामुळे आणि स्थानिक राजकारणातील सत्तेच्या गरजेतून संगमा यांनी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याची भूमिका घेतल्याने त्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला. पवार यांनी मोदी यांच्यावर स्तुतीसूमने उधळणारी मुलाखत दिल्यावर अन्वर यांनी बिहारमधील राजकारणातील स्वहितामुळे टीका करताच त्यांनाही पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी लागली. संगमा व अन्वर या पक्षाच्या संस्थापकांनाही पक्षात राहून वैयक्तिक मते राखण्याचा व व्यक्त करण्याचा अधिकार दिला गेला नाही. मात्र पार्थ यांना वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला गेल्याने व त्यांच्यावर कारवाईचे सूतोवाच झाले नसल्याने पार्थ यांचे वेगळेपण नजरेत भरते.