डॉ. विजय पांढरीपांडे
दोन दिवसांपूर्वी टेक्सास अमेरिका येथील शाळेत एका १८ वर्षे वयाच्या माथेफिरू मुलाने गोळीबार करून अनेक शाळकरी मुलांना ठार मारले. ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे. जग कुठल्या दिशेने चालले आहे? पाश्चात्य संस्कृतीत जे स्वातंत्र्य अभिमानाने मिरवले जाते, त्या मोकळ्या स्वातंत्र्याचे पुरेपूर धिंडवडे निघाले आहेत. पंधरा-सोळा वर्षे झाली की, मुले स्वतंत्र होतात, आई वडिलांपासून वेगळी राहतात, कमवायला लागतात, या गोष्टींचे कौतुक आहेच. पण, यातले अनेक तरुण-तरुणी मद्य, ड्रगच्या आहारी जातात. खुले लैंगिक व्यवहार ही नैसर्गिक गरज मानतात. या मुक्त व्यवस्थेचे फायदे कमी अन् तोटे जास्त आहेत.
शाळेत नैतिक मूल्याचे धडे सक्तीने दिले जावेत हा, आपला आग्रह. तिकडे मोठी झाल्यावर मुलांना हवे तसे वागू द्या, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या, हा युक्तिवाद : ही दोन्ही टोके आहेत आणि तोल त्याच्या मध्ये कुठेतरी आहे. आपणदेखील यापासून वेळीच धडा घेणे गरजेचे आहे. तरुण पिढीत वाढत चाललेली बेजबाबदार प्रवृत्ती, गावातून शहरांत गेलेल्या तरुण-तरुणींची शीघ्र वेगाने बदलत चाललेली मानसिकता, समाजातील विषमतेमुळे आलेले नैराश्य, सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे वाढलेली सैरभैरता, दूषित राजकारणामुळे भरकटलेली वैचारिक क्षमता हे सारे दुर्लक्षित करण्यासारखे नाही. गावखेड्यातील मुले शिक्षण, अध्ययन यापेक्षा एखाद्या नेत्याच्या मागे उपरणे घालून, झेंडे हाती घेऊन घोषणा देण्यात धन्यता मानतात. त्यांना तात्कालिक फायदा हवा असतो. आपले खरे भले कशात आहे, हे त्यांना कळत नाही. गेल्या काही महिन्यांत नागपूर, ओरंगाबाद येथे घडलेले खूनसत्र चिंता करण्यासारखेच आहे. तिथेही बहुतांशी तरुण मुलाचा हात, सहभाग आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून खुनापर्यंत मजल जावी? दूषित कौटुंबिक वातावरण, हरवलेला संवाद, शिक्षकांचा ओसरलेला प्रभाव, शाळा कॉलेजातील बदललेले वातावरण, समाजातील एकूणच नीतीमत्तेची घसरण हे चैनचंगळ आणि पुढे अती उपभोगातून नैराश्य, नैराश्यातून आत्महत्या, द्वेषातून एकमेकांचा काटा काढणे हे प्रकार वाढले आहेत.
अजून आपल्या शाळेतील मुलांच्या हातात बंदूक आलेली नाही. पण, त्यांच्या हातातले दगडदेखील कमी घातक नाहीत. बदलती समाजव्यवस्था, संस्कृती, मूल्य विचार याचा सर्वांगाने अभ्यास व्हायला हवा. आग लागल्यावर विहिरी खणत बसून काय साधणार? पाश्चात्य देशात याबाबतीत गंभीर अवस्था आहे. आर्थिक संपन्नतेने प्रश्न सुटलेले नाहीत, उलट वाढले आहेत. कारण घराघरात, समाजात वाढत चाललेला संवादाचा अभाव! माणसे एकेकटी पडू लागली आहेत. एकदा दिलेले स्वातंत्र्य परत घेणे, निर्बंध सोडल्यावर लगाम लावण्याचा प्रयत्न करणे अवघड असते. आपण या घटनांपासून शिकायला हवे. वेळीच सावध व्हायला हवे.संवादाने प्रश्न सुटतात. निदान सोपे तरी होतात. वाढत्या वयाच्या मुलांच्या आयुष्यातून घर वजा होणार नाही, हे आवर्जून पाहिले पाहिजे. मुलांना “कंट्रोल” करू नका. पण, त्यांच्यासाठी “असा”! अतिरेकानेच अतिरेकी निर्माण होतात. म्हणूनच टेक्सासचा धडा महत्त्वाचा. तो ऑप्शनला टाकण्याचा विषय नाही एवढे समजले तरी पुरे!
( लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आहेत)vijaympande@yahoo.com