भाई, भाऊ, दादा आणि एक ‘भाई’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 07:54 AM2024-09-27T07:54:46+5:302024-09-27T07:56:01+5:30
अजितदादांना मर्यादा आहेत, शिंदे शरद पवारांना हेडऑन घेत नाहीत, फडणवीस जखडले गेले आहेत; म्हणूनच अमितभाई आखाड्यात उतरलेत.
यदु जोशी
सहयोगी संपादक, लोकमत
एकनाथ शिंदे यांना ‘भाई’ म्हणतात, फडणवीसांना ‘भाऊ’ तर अजित पवारांना ‘दादा’. आता या भाई-भाऊ-दादांच्याही वर एक भाई आले आहेत ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह. आपल्यामुळेच सर्कस चालते असे कधी वाघ, कधी हत्ती तर कधी मौत का कुआँवाल्यास वाटत असते; पण, ती चालते रिंगमास्टरमुळे. बाकी सगळे आपापली भूमिका बजावत असतात. रिंगमास्टर अस्वलाचा रोल वाघाला देत नाही आणि बकरीचे काम हत्तीला सांगत नाही. ते तर अमित शाह आहेत; युद्धशास्त्रापासून अनेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. चाणक्याचे तत्त्वज्ञान तोंडपाठ आहे.
- तर आता दिल्लीचे रिंगमास्टर अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. राजाची स्वारी येण्यापूर्वी एकदोन सरदारांना चाचपणी करायला; वर्दी द्यायला पाठवत असतात. तसे दीडदोन महिन्यांपासून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव या आपल्या खासमखास सरदारांना त्यांनी आधीच महाराष्ट्रदेशी धाडले होते. आता ते स्वत: अंगाला तेल चोपडून उतरले आहेत. त्यांच्या या दमदार एन्ट्रीचा परिणाम म्हणून की काय भाजपचे एक सिनियर मंत्री परवा खासगीत सांगत होते, “तू लिहून ठेव, महायुतीला निर्भेळ बहुमत मिळाले तर नोव्हेंबरअखेर आमचे सरकार नक्की बनणार, अन् नाही बहुमत मिळाले तर राष्ट्रपती राजवट लागून फेब्रुवारीत आमचे सरकार येईल; पण सरकार आमचेच येईल, ये पत्थर की लकीर है.”
दोन वर्षांपूर्वी गुजरातची विधानसभा निवडणूक कव्हर करायला गेलो तेव्हा तिथे भाजपचे सरकार येणार की नाही इथपर्यंतचे वातावरण होते. तिथले एक बडे नेते सांगत होते, निवडणूक जिंकण्यासाठी आम्हाला नरेंद्रभाई हवे असतात आणि निवडणुकीनंतर काही अडचण आली तर अमितभाई लागतीलच. महाराष्ट्राच्या मैदानात अमितभाई निवडणुकीआधीच उतरले आहेत. ते वयाच्या पस्तीशीत होते तेव्हा गुजरातमध्ये त्यांचे आमदारकीचे तिकीट पक्षाने कापले. नंतर राष्ट्रीय अध्यक्ष झालेले कुशाभाऊ ठाकरे त्यांच्या घरी गेले. अमितभाई त्यांना म्हणाले, “माझे तिकीट कापले, मी दु:खी आहे.” कुशाभाऊ म्हणाले, “तू पक्षाचा प्रचार करू नकोस; कारण, दु:खी मनाने कोणीही चांगले काही करू शकत नाही. पण, तुझ्याकडे कोणी समजवायला येणार नाही हेही बघ; कारण, ज्याला घरी जाऊन समजवावे लागते तो कार्यकर्ताच नाही, असे मी मानतो.” स्वत: अमितभाईंनीच परवा नागपुरात भाजपच्या बैठकीत हे अनुभव कथन केले. “माझे तिकीट एकेकाळी कापले गेले, आज नाइलाजाने मला तिकिटे कापावी लागतात,” असे ते याच बैठकीत म्हणाले तेव्हा बऱ्याच आमदारांच्या काळजात धस्स झाले असेल. “आमच्यापैकी कोणाचे तिकीट कापले गेले तर आम्ही बंड करणार नाही,” असे त्यांनी उपस्थितांकडून वदवून घेतले. कुशाभाऊंचे उदाहरण देऊन त्यांनी, ‘नाराज झालात तरी तुम्हाला मनवायला कोणी घरी येणार नाही,’ हेही एकप्रकारे सांगून टाकले. भाजपचे महाराष्ट्रात १०३ आमदार आहेत. अमितभाईंनी ज्या पद्धतीने वदवून घेतले त्यावरून आता अशी कुजबुज सुरू झाली आहे की ५०-६० आमदारांचे तिकीट तर कापले नाही जाणार? गुजरातचे उदाहरणही अमितभाईंनी दिले, तिथे तर ९९ आमदारांपैकी ५८ जणांना घरी बसविले होते. गुजरात पॅटर्न लागू केला तरी ५०-६० आमदारांची तिकिटे कापली जातील, असे भीतीचे भूत दोन दिवसांपासून फिरू लागले आहे.
शिंदे-फडणवीस-अजित पवार एका पारड्यात अन् शरद पवार-उद्धव-ठाकरे-नाना पटोले दुसऱ्या पारड्यात असे मानले तर दुसरे पारडे जड वाटते. ते हलके व्हावे म्हणून महायुतीच्या पारड्यात बसायला अमित शाह आलेले दिसतात. शरद पवारांविरुद्ध बोलायला अजित पवारांना मर्यादा आहेत, शिंदे ठाकरेंना घेतात; पण, शरद पवारांना हेडऑन घेत नाहीत. सामाजिक आंदोलनांमुळे आणि सगळ्यांनीच टार्गेट केले असल्याने फडणवीस जरा जखडले गेले आहेत, म्हणूनही अमितभाई उतरले असावेत. ते कोणावरही तोफ डागायला मोकळे आहेत. विशेषत: शरद पवारांच्या रणनीतीविरुद्ध प्रति रणनीती तयार करण्यात शाह यांचा रोल असेल असे मानले जाते. शिवाय, त्यांच्याकडे केवळ देशाचे गृहखातेच नाही, तर सहकार खातेही आहे, दोन्हींच्या फायली महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या आहेत. ‘सामाजिक आंदोलनानंतरही कसे जिंकायचे असते हे आम्ही गुजरातमध्ये दाखवून दिले होते,’ या आशयाचे सूचक उद्गार अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगरच्या भाजपच्या बैठकीत काढले. यावरून त्यांची आंदोलनाच्या दाहकतेतून भाजपला सुखरूप बाहेर काढण्याची काही ना काही रणनीती नक्कीच ठरलेली असावी. ती नेमकी कशी आहे ते लवकरच कळेल. महाराष्ट्रातील राजकारणात तीन नेते विरुद्ध तीन नेते या लढाईत आता एका बाजूने चौथा नेता उतरला आहे. अमित शाह यांना महाविकास आघाडी टार्गेट करेलच; पण, त्यांच्या येण्याने रंगत अधिक वाढणार हे नक्की.
yadu.joshi@lokmat.com