भाजपाच्या तीन राज्यांतील पराभवांनी त्या पक्षाच्या नेतृत्वातील राष्टÑीय लोकशाही आघाडीचे टवके उडवायला सुरुवात केली आहे. त्या पक्षाची आताची स्थिती पाहून, हे पक्ष त्याकडे लोकसभेच्या जास्तीच्या जागा तरी मागत आहेत किंवा आपले वेगळेपण अधोरेखित करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. शिवसेनेचा यासंबंधीचा पवित्रा जुना आहे आणि भाजपावर टीका करण्याची एकही संधी तो पक्ष कधी सोडत नाही. त्याने महाराष्ट्रात निर्माण केलेले चित्र असे की, सेना ‘स्वबळावर’ पुढे धावत आहे आणि भाजपा हा त्याचा मोठा मित्रपक्ष लाचारासारखा ‘तरीही आम्ही मित्रच,’ असे म्हणत त्याच्यामागे रखडताना दिसत आहे.‘आमची युती होणारच,’ हे शहा या भाजपाच्या पराभूत सेनापतीचे म्हणणे आणि ‘त्यांच्या आशावादाला आमच्या शुभेच्छा आहेत,’ असे सेनेने त्यांना हिणवणेही या उपेक्षेची परिणती आहे. युती एकदाची होईलही, परंतु तोपर्यंत आपले ‘स्वतंत्र’ असणे, कटुता घेऊनही सेना सांगत राहील, असे वाटायला लावणारा हा प्रकार आहे. मुळात १८ खासदार असलेल्या सेनेला मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात एक बिना वजनाचे पद दिले. महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारनेही उष्टावलेल्या पत्रावळी भिरकाव्या, तशी अतिशय कमी महत्त्वाची पदे त्या पक्षाला राज्यात दिली. त्यामुळे २०१४ पासून सुरू झालेला सेनेचा रोष समोरच्या निवडणुका दिसू लागताच, आता अधिक तीव्र झाला आहे. झालेच तर परवाच्या पराभवांनी भाजपालाही मित्र जोडून ठेवण्याची गरज लक्षात आणून दिली आहे. नेमक्या याच वेळी लोकजनशक्ती या रामविलास पासवानांच्या बारक्या पक्षाने आपल्याही मागण्यांचे निशाण उंचावून भाजपाला हात दाखवायला सुरुवात केली आहे. १९७७ पासून कोणत्या ना कोणत्या पक्षातर्फे वा आघाडीतर्फे मंत्रिपद मिळविण्यात यशस्वी झालेल्या पासवानांना त्या पदावाचून राहता येत नाही. त्यासाठी त्यांनी त्यांच्या लोहियावादाचा बळीही कधीचाच दिला आहे. लोकसभेच्या येत्या निवडणुकीत भाजपाचे नेते जनता दल (यु.)च्या नितीशकुमारांना जास्तीच्या जागा देतील व आपला भाव कमी करतील, या भयाने त्यांनीही आपला खासदार चिरंजीवासह व आमदार भावासह अमित शहा यांना भेटून, आपला खुंटा मजबूत करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.जाणकारांच्या मते, उपेंद्र कुशवाहा यांनी त्यांचा लोकसमता पक्ष जसा रालोआपासून दूर नेला व लालू प्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली, तशाच प्रयत्नांना हे पासवानही आता लागले आहेत. जहाज बुडायला लागले की, त्यातले उंदीर आधी पळापळ करतात, असे म्हणतात. रालोआत ही पळापळ कधीचीच सुरू झाली आहे. तिने चंद्राबाबू नायडू गमावले. के. चंद्रशेखरराव गमावले आणि कर्नाटक व पंजाबातले बारके मित्र गमावले. या काळात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला पक्षांचे दोन-दोन डझन नेते उपस्थित राहत असल्याचेही देशाने पाहिले़ राहुल गांधींच्या सभा मोठ्या होत आहेत. त्यांच्या भाषणांना वजन येत आहे आणि प्रत्यक्ष रायबरेलीत मोदींनी घेतलेल्या जाहीर सभेकडे लोक फिरकलेही नाहीत, अशी छायाचित्रे वृत्तपत्रांनी प्रकाशित केली आहेत. मोदी बोलतात, शाहही बोलतात, पण जेटलींची वाचा गेली आहे, रविशंकर वेडसरांसारखे आज्ञार्थक बोलतात, पण त्यांना लोकप्रियता नाही. सुषमा स्वराज किंवा इराणी यांच्यावर न बोलण्याचे बंधन असावे, असे वाटावे, अशी त्यांची अबोल अवस्था आहे.अडवाणी, जोशी बेपत्ता आहेत (किंवा त्यांना पडद्याआड लोटले आहे) आणि रालोआचा कोणताही नेता परवाच्या भाजपाच्या पराभवाविषयी साधी सहानुभूती व्यक्त करतानाही दिसला नाही. आश्चर्य याचे की, संघ परिवारलाही त्याविषयी साधी ‘चुक्चुक्’ कराविशी वाटली नाही. मोदींचा प्रभाव कमी झाला असला, तरी त्यांचा भाव अजून शिल्लक आहे. शहांना तो पूर्वीही नव्हता आणि आजही नाही. ही स्थिती हातचे सोडून पळते सोबत ठेवायला सांगणारी आहे, पण भाजपा किंवा मोदी यातून काही शिकणार नाहीत. ते स्वत:ला जगद्गुरू समजतात. अशी माणसे कशापासूनही काही शिकणार नाहीत. कारण साऱ्या ज्ञानाचे गठ्ठे त्यांच्याजवळ कधीचेच जमा झाले आहेत.
सेना-भाजपामधील बेबनाव : ‘यांना’ कोण शिकविणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 5:50 AM