उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिब तसेच व्हॅली ऑफ फ्लॉवर या जागतिक वारसा सांगणाऱ्या खोऱ्यात जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर जोशीमठ शहर वसले आहे. या शहरातील सुमारे सव्वासहाशे घरांना तसेच रस्ते, शेती आणि सरकारी कार्यालयांनाही तडे गेले आहेत. जोशीमठ हे छोटे गाव सुमारे सातशे वर्षांपूर्वी वसले असल्याचे मानले जाते. ती जागाच मूळची बर्फाच्छादित पर्वतावरील बर्फ वितळून रिकाम्या झालेल्या टेकडीवरील आहे. हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. परिणामी हवामानातील बदलाचे परिणाम तातडीने जाणवायला लागतात.
अलकनंदा नदीवरील जोशीमठ आता वाढत्या लोकसंख्येमुळे शहर झाले आहे. अनेक सरकारी कार्यालये, सार्वजनिक संस्था, धार्मिक संस्थांच्या इमारती येथे उभ्या राहिल्या आहेत. बद्रीनाथसह चारही धाम तसेच चमोसी जिल्ह्यातील व्हॅली ऑफ फ्लॉवरला जाणाऱ्या हजारो पर्यटकांना वास्तव्य करण्यासाठी उपयोगी पडणारे हे शहर आहे. अलकनंदा या गंगेच्या उपनदीवर गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून वीजनिर्मितीसाठी धरणांची बांधकामे झाली आहेत. शिवाय भूकंपप्रवणक्षेत्र म्हणूनही जोशीमठाचा परिसर ओळखला जातो. चारधामची यात्रा सुलभ व्हावी म्हणून या चारही ठिकाणांना जोडणाऱ्या मोठ्या रस्त्याची आखणी करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून जोशीमठ शहराला बाह्यवळणाचा रस्ता करण्यात येत आहे.
वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के बसत असताना या परिसरात पर्यावरणीय बदलही जाणवत आहेत. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात दुप्पटीने बदल झाला आहे. पंधरा वर्षांपूर्वी दररोज सरासरी ३३ मिलीमीटर पाऊस होत असे. हेच प्रमाण आता ६८ मिलीमीटरपर्यंत वाढले आहे. वृक्षतोड, घरांसाठी वेगाने होणारी बांधकामे आणि सरकारला विकासाची झालेली घाई आदी कारणांनी जोशीमठ परिसरातील जमिनीच्या स्तरात लक्षणीय बदल झाले आहेत. एकविसाव्या शतकाबरोबर उत्तराखंड प्रदेशाची निर्मिती झाली आणि सरकारला विकासकामांची घाई झाली. वीज उत्पादनासाठी धरणे बांधण्यास घेण्यात आली. त्यावेळेपासूनच उत्तराखंडमधील अनेक अभ्यासक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी हा प्रदेश संवेदनशील असल्याने भौगोलिक रचनेत काही बदल होणार नाहीत किंवा त्या बदलास पूरक परिस्थिती निर्माण होईल, अशी कामे करू नका, असा आग्रह धरला.
गेल्या काही वर्षांत घरांना तडे जाण्याचे प्रकार वाढत असताना राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी जोशीमठाचे नागरिक आंदोलने करीत आहेत. व्यापारीवर्गाने बाजार बंद करून या आंदोलनास पाठिंबा दिला. जोशीमठ परिसराचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली. अखेर परवा रविवारी पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत तातडीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय जाहीर केला. शिवाय तत्पूर्वीच जोशीमठ शहर परिसर भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. सात विविध केंद्रीय संस्थांचा सहभाग असलेली समिती स्थापन करून सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हैदराबाद आणि डेहराडून येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या मदतीने उपग्रहाद्वारे जोशीमठ शहराचा अभ्यास करण्यात येणार आहे. उत्तराखंड या पर्वतीय प्रदेशातील पर्यावरणीय संवेदना आता तरी जागी झाली आहे, असे दिसते. निसर्गाचे संवर्धन करीत विकासकामे केली तर निसर्ग साथ देतो अन्यथा विध्वंसच होतो.
जोशीमठ शहराला पठारावरील शहराप्रमाणे बाह्यवळणाचा रस्ता करताना खूप काळजी घेतली पाहिजे. शहराभोवतीचे पाण्याचे प्रवाह, जमिनीचा प्रकार, खडक आणि दगडांचा प्रकार याची नोंद घेणे आवश्यक आहे. भारताच्या विविध भागात विविध प्रकारची भौगोलिक रचना आहे. त्याचा अभ्यास करून अनेक कामे केली जातात. अनेक प्रांताकडे याचा अनुभव आहे. त्याची देवाण-घेवाण करून मदत घेतली पाहिजे. शिवाय हिमालयाची भौगोलिक रचना आणि वैशिष्ट्ये वेगळीच आहेत. त्याची काळजी घेऊन रस्ते, बंधारे, धरणे, वीज प्रकल्प इमारतींचे बांधकाम आदी केले पाहिजे. अन्यथा आपण विकासाऐवजी विध्वंसास निमंत्रण देत आहोत, याची खात्री बाळगावी. देशाच्या विविध भागात हवामान बदलाची लक्षणे ठळकपणे दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जोशीमठ शहराबरोबरच हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये जेथे जेथे मानवी हस्तक्षेप करण्यात आला आहे तेथील भौगोलिक बदलाचा अभ्यास करावा लागेल. त्यापुढेच आपली सीमारेषा असल्याने तिच्या संरक्षणासाठीदेखील या परिसराचे संवर्धन महत्त्वाचे आहे. त्यास तडे जाता कामा नये.