तुका म्हणे होय मनाशी संवाद। आपुलाचि वाद आपणासी।। तुकाराम म्हणतात तसा मनाशी संवाद होतो का? तो झाला तर वाद आला विवाद आला. पण तुकाराम वाद इतरांशी करीत नाहीत. त्यांचा वाद स्वत:शी आहे. जे स्वत:शी बोलू शकतात ते स्वत:ला नवनव्या प्रवाहात सामील करून घेऊ शकतात, त्यातील आणि आपल्यातील टाकाऊ काय किंवा टिकाऊ काय हे पाहण्याची दृष्टी त्यांना मिळते, म्हणूनच आश्चर्य वाटतं प्रचंड जीवनाची हाव आणि हौस असणारी माणसं क्षणात विरक्त होतात. इतके की आपण पूर्वी कोण होतो याचीही त्यांना जाणीव राहत नाही. मराठीतील एक नामवंत लेखक आयुष्यभर माणसातील वासना, व्यवस्थेविरुद्धची तडफड, राग, स्त्रीविषयी प्रचंड आसक्ती आणि घृणाही... हे सगळं त्याच्या लेखनात होतं. कसा बदल होत जातो कळत नाही पण झाला आणि तो लेखक इतका विरक्त झाला की घरदार सोडून, भगवी वस्त्र घालून एका अनाम मंदिरात राहू लागला. सर्वसंगपरित्याग हा शब्द आहे. तो बोलायला छान, पण आचरायला कठीण. त्याने ते केलं. एखादा माणूस इतरांना क्षणात नकोसा होत नाही. त्याच्या वागण्यात बदल होऊ लागतात. तो एकतर कमालीचा चिडचिडा, उद्धट किंवा पराकोटीचा शांत, बधिर, एकटा, निर्विकार होत जातो.ही दोन्ही टोकं ज्याने आपल्या मनाच्या धाकाने बांधली वा जोडली तोच जिंकला. पण, हे जिंकणं सोपं नाही. आपण ऊठसूट काही संत-महात्मे यांची नावं घेतो. सगळे आपलेच सोयरे आहेत असं आपण बोलतो. पण खरं सांगायचं तर हा प्रचंड चक्रव्यूह आहे. वेद, तत्त्वज्ञान, धम्म या साऱ्यांत सहज म्हणून फिरता येत नाही. त्यात पूर्ण अवगाहन करून बुडून गेलेले स्वत:ला पूर्ण वाया गेलो अशी समजूत झालेले जेव्हा तक्रार न करता जगाला वेडं वाटावं असं वागतात किंवा बोलतात तेव्हा समजायचं ही चक्रव्यूह भेदण्याची धडपड आहे. बरेचसे अभिमन्यू होण्यात धन्यता मानतात. किती वेगळं जगता जगता संपत गेलो हे डोळ्यांनी पाहतानाही ते कृतार्थ असतात. कारण तथाकथित विषयांची, संसाराची, लौकिकार्थाची कुठलीही बंधनं त्यांनी स्वीकारलेली नसतात. म्हणून ही माणसं भणंग असतात. जगाला एक तर ते पराकोटीचे मूर्ख, गाढव वाटतात नाहीतर एकदम महान व्यक्ती. पण त्याला खूप वेळ द्यावा लागतो. पिढ्या बरबाद कराव्या लागतात.त्यांना क्षमा करो, ते काय करतात त्यांना कळत नाही... हे म्हणायला क्षमेचे काटे आणि विरक्तीचा काटेरी मुकुट परिधान करावा लागतो. ज्यांनी जखमा जोजवल्या त्यांना हा छळ काहीच वाटत नाही. फक्त जगण्याचे हे व्यूह भेदून जाता यायला हवेत. ते ज्याला जमलं तो जिंकला. जेते झाला, नेते झाला, संत झाला.व्यूह करून शत्रूचा तळ उद््ध्वस्त करायला हिंमत लागते बाबा! त्याचाच जयजयकार होतो. तो खरा सैनिक!-किशोर पाठक
व्यूह
By admin | Published: October 03, 2016 6:18 AM