साहित्य वा कला हा अभिव्यक्तीचा आविष्कार आहे आणि अभिव्यक्ती प्रभावी व्हायची असेल तर तीत समाजकारण व राजकारणाचे प्रतिबिंब असले पाहिजे; अन्यथा त्या कृती निर्जीव दागिन्यांसारख्या होतात, हे उद्गार आहेत न्या. धनंजय चंद्रचूड यांचे. आमच्यातील कर्मठ कलावाद्यांना ते आवडायचे नाहीत. त्यांना कला ही शुद्ध व राजकारणनिरपेक्षच हवी असते. राजकारणाने लोकजीवनाएवढेच व्यक्तीचे जीवन पूर्णपणे व्यापून टाकले असतानाही त्यांचा तो आग्रह कायम आहे. वॉल्टर बेजहॉट हा राज्यशास्त्रज्ञ म्हणाला, ‘राज्याचे समाजावरील व व्यक्तीवरील नियंत्रण पाळण्यापासून समाधीपर्यंत (फ्रॉम क्रॅडल टू ग्रेव्ह) चालणारे असते.’
दुसऱ्या एकाने त्याला छेद देत म्हटले, ‘गर्भवती महिलांची काळजी आणि मृत्यूनंतर द्यावयाचे कर पाहता हे नियंत्रण जन्माआधी सुरू होते व मृत्यूनंतरही कायम राहते.’ राजकारण असे सर्वव्यापी आहे एवढाच याचा अर्थ. ज्या साहित्यकृतीत वा कलाकृतीत राजकारण प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रगटत असते त्याच कलाकृती मोठ्या होतात व त्याचेच लेखक व कलावंत समाजमान्य होतात. चार्ली चॅप्लिन या विनोदी नटाला लाभलेली जगन्मान्यता आपल्याकडील विनोदी नटांना लाभली नाही यातून ही बाब स्पष्ट होते. चॅप्लिनच्या कलेतून प्रगटलेले सामाजिक व राजकीय चिंतन त्याला महानता देऊन गेले. दुर्दैवाने आम्ही जीवनाचे एवढ्या हवाबंद कप्प्यात विभाजन केले की त्यातल्या एका क्षेत्रात दुसºयाचा साधा प्रवेशही आम्हाला वर्ज्य वाटतो. रामायण व महाभारतासारखी महाकाव्ये नुसतीच धार्मिक नाहीत, ती राजकीयही आहेत.
तिकडे हेलन आॅफ ट्रॉयही असेच कला व राजकारण सांगत येणारे आहेत. हे करता यायला कलावंतामध्ये प्रचंड सामर्थ्य व अभिव्यक्तीची थोर जाण मात्र असावी लागते. अन्यथा कलाही प्रचारी होते आणि तिच्यातील राजकारणही बटबटीत होते. मराठीतील अनेक लेखकांची नावे अशी सांगता येतील. पण तो प्रमाद नको. समाजमनावर ज्याचा प्रभाव पडत नाही आणि ज्या विचारांना चालना देत नाहीत त्या निर्जीव कलाकृती कोणत्या कामाच्या? ‘तुझे आहे तुजपाशी’ किंवा पूर्वीची ‘किचकवधा’सारखी नाटके, रवींद्रनाथांचे काव्य या पातळीवरचे आहे. खरा प्रश्न, कलेतून प्रगटणाºया राजकीय भावाने तिच्या खºया स्वरूपावर मात करू नये व तिचे कलाकृती असणे स्वायत्त राखावे हा आहे.
राजकारण व समाजकारण हे कलेवर अशी मात करू लागले की कला प्रचारी होते. ज्या कविता क्रांतीला साथ देतात वा ती घडवितात त्यांचे मोठेपण निर्विवाद. पण ज्या निवडणुकीतील प्रचारात म्हटल्या जातात त्या तेवढ्याच बाजारू. मात्र हे तारतम्य तोपर्यंतच टिकते जोपर्यंत राजकारणातील सत्ताधारी माणसे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व जाणतात व जोपासतात. न्या. चंद्रचूड यांनी ज्या श्रेष्ठ कलाकृतींची नावे घेतली त्या सगळ्या अशा तारतम्याच्या काळातील आहेत. (काही श्रेष्ठ कलाकृती बंदीकाळातही क्रांतिगीताच्या स्वरूपात जन्माला येतात हेही येथे नोंदविले पाहिजे. मात्र त्यासाठी कलावंताचे मन कमालीचे निर्भय व सगळ्या परिणामांची जबाबदारी भोगायला सिद्धही असले पाहिजे.) राजकारण व त्यातील लोक जेव्हा हे तारतम्य गमावतात व कलावंतांवर आपली हुकमत गाजविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा केवळ कलावंतांची नव्हे, तर कलेचीही गळचेपी होते व ती समाजाची सांस्कृतिक हानी ठरते.
सारे हुकूमशाही देश व लोकशाहीच्या नावाने दडपशाही आणू पाहणारे राज्यकर्ते कलेची अशी गळचेपी करतात. त्यांना अनुकूल अशाच कलाकृती निर्माण व्हाव्यात अशी व्यवस्था करतात. भारतात इंग्रज सरकारने किती पुस्तकांवर, कवितांवर व नाट्यपदांवर बंदी घातली होती हे येथे आठवायचे. तात्पर्य, साहित्य वा कला आणि राजकारण यांच्यातील संबंध सलोख्याचे असताना त्यांनी परस्परांचे क्षेत्र स्वायत्त व अस्पर्श राखले पाहिजे व त्यांचा आदर करण्याची वृत्ती बाळगली पाहिजे. सध्याचे जागतिक राजकारण त्याला फारसे अनुकूल नाही. मात्र हा काळ मागे पडेल व चांगले राजकारण व तेवढेच चांगले कलाक्षेत्र पुढे येईल अशी आशा आपण बाळगली पाहिजे.