आपल्या देखण्या चित्रसृष्टीत घडणारे कुरूप प्रकार नेहमीच प्रकाशात येतात असे नाही. शिवाय ते तसे आले तरी त्यावर पांघरुण घालायला त्या क्षेत्रातली बडी धेंडे तात्काळ एकत्र येतात आणि तसे काही झालेच नाही याचे अमंगळ नाटक करतात. काही काळापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायकाची कामे करणाऱ्या एका दुय्यम दर्जाच्या नटाने या सृष्टीत प्रवेश करू इच्छिणाऱ्या एका तरुण मुलीला आपल्या अंथरुणात येण्याविषयी सुचविले. तिने त्याला नकार दिला तेव्हा ‘आज ज्या मोठ्या नट्या तुला पडद्यावर दिसतात त्या अशाच अंथरुणमार्गे तिथवर पोहोचल्या आहेत’ असे निर्लज्ज उद््गार त्या बेशरम माणसाने तिला ऐकविले होते. त्या साऱ्या घटनेचा छायाचित्रांसकटचा तपशील सर्वसंबंधितांच्या नावानिशी तेव्हा वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्याची पोलिसात नोंद नाही, तपास नाही आणि ते प्रकरण काही न होता साऱ्यांच्या विस्मरणातही गेलेले दिसले. त्या काळात ‘ती मुलगीच बहुदा तशी असावी’ असे शहाजोगपणे म्हणणारे मोठे नट आणि दिग्दर्शकही देशाला दिसले होते. दुहेरी वा अनेक पदरी आयुष्य जगणाऱ्या या माणसांनी त्या बदनाम खलनायकालाच तेव्हा चारित्र्याची प्रशस्तिपत्रे दिलेली दिसली. नंतरच्या काळात हिंदी क्षेत्रात तसे धाडस करायला कोणती नवी नटी वा होतकरू मुलगी धजावल्याचे दिसले नाही. मात्र ती दिसली नाही म्हणून त्यातले हे प्रकार थांबले असे समजण्याचे कारण नाही. आज त्या घटनेचे स्मरण होण्याचे कारण वरलक्ष्मी शरदकुमार या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे आहे. दूरचित्रवाहिनीच्या एका संचालकाने तिला काम देण्यासाठी ‘बाहेर सोबतीला येतेस का’ हा निर्लज्ज प्रश्न विचारला. त्यावर ‘अशा कामासाठी मला अभिनेत्री व्हायचे नाही, अभिनय ही माझ्या आवडीची बाब असल्याने मी येथे आले आहे’ असे तिने त्याला ऐकविले. वरलक्ष्मीचे वडील शरद कुमार हे दक्षिणी चित्रसृष्टीतले एक वजनदार व प्रतिष्ठित कलावंत आहेत. अशा व्यक्तीच्या मुलीला असे सुचविण्याचे धाडस एखादा निर्माता वा संचालक करीत असेल तर या क्षेत्राचे सडकेपणच साऱ्यांच्या लक्षात यावे. वरलक्ष्मीचे धाडस हे की तिने हा सारा प्रकार टिष्ट्वटरवर जाहीर केला. त्याची दखल बीबीसी या जगप्रसिद्ध वृत्तवाहिनीने घेतली. ‘चित्रपटसृष्टीत येऊ इच्छिणाऱ्या बहुतेक मुलींनी हे प्राक्तन स्वीकारले’ असे बीबीसीला सांगताना वरलक्ष्मी म्हणाली ‘सिनेमात व मालिकात कामे देण्याचा मोबदला असा मागितला जातो. याहून महत्त्वाची व हीन बाब अशी की येथे हे चालणारच अशीच धारणा या सृष्टीतील अनेकांनी करून घेतली आहे. मी त्यांना माझ्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला तेव्हा येथे हे चालतच असते असे म्हणणाऱ्या अनेकांनी मी यात आलेच कशाला असा प्रश्न मलाच विचारला.’ जे क्षेत्र त्याच्या देखणेपणाएवढेच वैभवासाठी वाखाणले जाते आणि ज्यात शिरण्यासाठी तरुण-तरुणी त्यांच्या जिवाचा प्रचंड आटापिटा करतात त्याची ही अवस्था त्याच्या खऱ्या व परिणामकारक बंदोबस्ताची मागणी करणारी आहे. यशासाठी काहीही वा प्रसिद्धीसाठी कसेही वागणाऱ्या वा वागू इच्छिणाऱ्यांचीही एक जमात असते. त्यातली माणसे आणि स्त्रिया तशा वागतही असतात. मात्र या सृष्टीला प्रतिष्ठेचे दिवस यायचे असतील तर तिच्या अशा स्वच्छतेची गरज कायद्याच्या मार्गाने पूर्ण करणे आता आवश्यक झाले आहे. सगळ्याच मुलींजवळ वरलक्ष्मीएवढे धाडस नसते. त्यातल्या काही मुकाटपणे या मागणीला बळी पडतात तर काही तिला दिलेला नकारही आपलीच बदनामी करील म्हणून गप्प राहतात. वरलक्ष्मीचे वडील तिच्या धाडसामागे उभे राहिले हीदेखील एक महत्त्वाची व चांगली बाब म्हणून येथे लक्षात यावी. नीती, सदाचार, सामाजिकता आणि उच्च आदर्शांचे पाठ समाजाला शिकवायला जे क्षेत्र नावाजले जाते त्याचे हे सडकेपण त्यातील सर्व संबंधितांएवढेच समाजालाही त्याची मान खाली घालायला लावते. आपले अनेक नट, नट्या आणि दिग्दर्शक त्यांच्या चाहत्यांकडून दैवतांसारखे पूजले जातात. खलनायकी करणाऱ्यांचाही एक चाहता वर्ग असतो. मात्र या साऱ्या दैवतांचे चेहरे त्यांची खरी प्रकृती सांगतातच असे नाही. तसेही त्यांना अनेक चेहरे आणि अनेक भूमिका वाहून न्याव्या लागतात. अशा माणसांचे खरेपण आणि त्यांच्या सृष्टीतले वास्तव जनतेसमोर येणे, त्यांच्या या वरपांगी मोहक व आदरणीय दिसणाऱ्या प्रतिमांमुळेच आवश्यकही आहे. अन्यथा लग्नाचे आमिष दाखवून मुलींना वेश्यावृत्तीकडे वळविणाऱ्या बदमाशांहून ही माणसेही वेगळी वाटणार नाहीत. आपल्या सृष्टीचे भलेपण असे जोपासायला त्या सृष्टीतल्या माणसांनीही आता पावले उचलणे आवश्यक आहे. स्वत:ला ईश्वराचे अवतार म्हणवून घेणारे बुवा-बाबा आणि बापू हे प्रत्यक्षात कसे असतात हे गेल्या काही काळात देशाने पाहिले आहे. चित्रपटसृष्टीतल्या अनेकांचे चेहरे त्यांच्या श्रद्धावानांना असेच ईश्वररूप दिसत असतात. सामान्य नट आणि नट्यांच्या दर्शनासाठी रांगा लावणारे आणि गर्दी करणारे आंबटशौकिन लोक आपल्यालाही ठाऊक असतात. अशा शौकिनांचा शौक भागवण्यासाठी देहाचे मोबदले मागणारे ही तथाकथित दैवते आपल्या मुखवट्यांमागे केवढे राक्षसी चेहरे घेऊन वावरतात हे समाजाला समजलेच पाहिजे.
‘देखण्या’ सृष्टीचे सडकेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2017 11:53 PM