गौरी पटवर्धन, लेखक, मुक्त पत्रकार
“अरे हे काय चाललंय? स्टेटस अपलोड का होत नाहीये???, “हॅलो, मी तुला व्हाॅट्सॲप वर एक मेसेज पाठवलाय. तो डिलिव्हर झाला का?” ,“फोन रिस्टार्ट करून बघू का?”.. ४ तारखेला भारतीय वेळेप्रमाणे रात्र होता होता फेसबुक, व्हाॅट्सअप आणि इंस्टाग्राम यातलं काहीच धड चालेना आणि नेटकरी मंडळी अक्षरशः कासावीस झाली. गुगल केलं तेव्हा लक्षात आलं, की जगभरात सगळीकडेच ही तिन्ही फलाटं बंद पडली आहेत. फेसबुकवर निम्मं जग आहे, त्यामुळे एकच हलकल्लोळ उडावा, अशी परिस्थिती तयार झाली. अर्थातच काही तासांनी फेसबुक, इन्स्टा आणि व्हाॅट्सॲप परत चालू झालं. मग चर्चा, स्टेटस अपडेटस आणि डिजिटल लाईफ परत एकदा सुरळीतपणे सुरु झालं…
- काही तास सोशल मीडिया बंद पडलं तर, इतकं काय बिघडतं? समजा काही तास आपण एकमेकांशी कनेक्टेड राहिलो नाही तर, काय बिघडतं? काही तास जगात काय चाललंय हे आपल्याला लगेच नाही समजलं तर, काय बिघडतं?, काही जणांचं काम सोशल मीडियावर किंवा एकमेकांशी कनेक्टेड असण्यावर अवलंबून असतं हे खरं, पण बाकीच्यांचं काय? एकदा घरी आल्यावर आणि बातम्या बघून झाल्यावर जगात काय चालू आहे याचे आपल्याला सतत अपडेट्स मिळत राहणं खरंच इतकं गरजेचं असतं का?, - असे नेहमीचेच प्रश्न सोमवार रात्रीच्या अनुभवाने पुन्हा समोर आले. हा प्रकार अवघ्या काही तासांचा, पण तेवढ्यात मार्क झुकरबर्गचं इतकं नुकसान झालं की, त्यामुळे जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांमधली त्याची क्रमवारी घसरली. म्हणजे एरवी हे सगळं सुरळीत चालू असतांना ही तिन्ही फलाटं आपल्या खिशात किती खोल हात घालत असतील?
या सगळ्या बिघाडाला असलेली एक पार्श्वभूमीही महत्त्वाची ! अख्ख्या जगाची आवड-निवड, मतं, राजकीय विचार हे सगळं काही ठरवण्याची कळ गवसलेल्या आणि त्यातूनच पैसे कमावण्याच्या रीती शोधलेल्या गुगल, फेसबुक सारख्या अगडबंब कंपन्यांमध्ये काम करणारे, त्या कंपन्यांची संस्कृती जाणून असणारे काही (माजी) कर्मचारी कंपनीतून बाहेर पडल्यावर / काढल्यावर “व्हिसल ब्लोअर “ होऊन जगासमोर येऊ लागले आहेत. “ फेसबुकमध्ये काम करणारे कुणी जगाचा विनाश व्हावा अशी इच्छा धरणारं नक्कीच नाही, पण फेसबुकची एकूण रचना आणि त्यात असलेल्या आर्थिक कमाईच्या शक्यता ही सारी व्यवस्थाच सामाजिकदृष्ट्या अतिशय घातक आहे “ असं विधान फ्रान्सिस होगनने नुकतंच जाहीर मुलाखतीत केलं आणि अमेरिकन सिनेटच्या समोरही तिने तिचं मत नोंदवलं. ही फ्रान्सिस सिव्हिक इन्फॉर्मेशन गटाची प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून फेसबुकमध्ये काम करत होती. सामाजिक द्वेषाला कारणीभूत ठरणारा, राजकीय मतांना अपेक्षित वळण लावू इच्छिणारा मजकूर फेसबुकवरून प्रसारित होऊ नये यासाठी फेसबुक करत असलेले उपाय हे “विंडो ड्रेसिंग “ सारखे कामचलावू असतात आणि त्यावर कायमस्वरूपी टाच आणणं फेसबुकला शक्य असलं तरी परवडणारं नाही कारण असाच मजकूर यूजर्सना खेचून आणतो , त्यांना जास्त वेळ साईटवर “ एंगेज “ ठेवतो आणि त्यातूनच फेसबुकचं उत्पन्न वाढत राहातं असं गणित या फ्रान्सिसने जाहीरपणे मांडलं.
फेसबुकची अंतर्गत कार्यपद्धती अनुभवलेले लोकही आता “फेसबुकचं मॉडेलच मुळात सामाजिक सलोख्याच्या विरोधात जाणारं आहे “ असं सांगू लागले आहेत. फेसबुकची वेगाने घटती लोकप्रियता पाहाता तरुण आणि लहान मुलांना टार्गेट करणारे “ इन्स्टाग्राम “ अधिक यूजर्स आणि अधिक पैसा कसा मिळवून देईल याची फेसबुक आखत असलेली नवी स्ट्रॅटेजी लहान मुलांच्या मानसिक आरोग्याशी कसा खेळ करू शकते यावरून हरकती घेतल्या जाऊ लागल्या आहेतच. आणि असं असताना अवघे काही तास हे प्रकरण बंद पडलं, तर, जगाचा श्वास कोंडल्यासारखी परिस्थिती होते. आपण सारेच या माध्यमांवर किती अवलंबून राहायला सरावलो आहोत, याचा हा अनुभव प्रत्यक्षात एका भयावह वास्तवाकडे निर्देश करतो. आपली मतं तर, आपण गहाण टाकलीच आहेत ; आता आपला वेळ, आपली नाती, आपल्या कामाच्या रीती आणि आपला दिनक्रम हेही आपल्या हातातून सुटत चाललं आहे. म्हणून फ्रान्सिस होगनचं म्हणणं महत्वाचं ! ती म्हणते, फेसबुक चुझेस प्रॉफिट ओव्हर सेफ्टी !
patwardhan.gauri@gmail.com