वसंत भोसले, संपादक लोकमत, कोल्हापूर
सातारा येथे पूरस्थितीचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “दरड प्रवण गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार.”
- सह्याद्री पर्वतरांगांमध्ये शेकडो वर्षे वसलेली, शेती कसणारी ही गावे अचानक दरड प्रवण कधी झाली?- असा साहजिकच प्रश्न या विधानानंतर तरी धोरणकर्त्यांच्या, विचारी जनांच्या मनात चमकला पाहिजे. याची दोन कारणे आहेत, एक तर सह्याद्री पर्वतरांगांसह महाराष्ट्रात ढगफुटीसदृश्य पाऊस होऊन हाहाकार माजण्याचे प्रमाण खूप कमी होते; ते अचानक नोंद घेण्याजोगे वाढले आहे. ढगफुटीचे हे असे प्रकार हिमालयात होत असतात. दुसरे कारण सह्याद्री हा इतका कणखर आहे की, अशा प्रकारच्या ढगफुटीने हलणारा नाही. तरी दि. २१ ते २४ जुलै या चार दिवसांत तो अनेक वेळा हलला आणि महाराष्ट्रासमोर एक आव्हानात्मक संकट बनून राहिला आहे.
हे संकट कोणते आहे? या चार दिवसांत नेमके काय घडले?- याचा विचार न करता “दरड तुमच्या गावावर कोसळते काय? थांबा, तुमचे गावच तेथून हलवतो,” हे असले अभद्र, उर्मट उत्तर शोधायला राज्य शासन निघाले असेल, तर मग या राज्याचे कठीण दिसते! चार दिवसांत महाराष्ट्रात एकूण १०२ ठिकाणी ढगफुटीचे प्रकार घडले आहेत. त्याच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, कोकणातील रत्नागिरी आणि रायगड या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या ढगफुटीने पाण्याचा लोंढा आला. चिपळूणसारखे तालुक्याचे शहर पाहता पाहता बुडाले, वाशिष्ठी नदीच्या पाणलोट क्षेत्रात या चार दिवसांपैकी दोन दिवसांत सुमारे साडेतीनशे मिलीमीटर पाऊस झाला.ढगफुटीचा सर्वाधिक परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या खोऱ्यात झाला. राधानगरी येथे एका दिवसात ५९७ मिलीमीटर, तुलसी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८९७ मिलीमीटर पाऊस झाला. या प्रचंड पावसाने सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. कोकणात जाणारे सर्वच घाटरस्ते दरडी कोसळल्याने आणि काही ठिकाणी प्रचंड पाण्याचे लोट आल्याने बंद पडले. हा प्रकार सर्वत्र दिसला नाही.
माण, म्हसवड, फलटण, जत आदी तालुक्यांत पाच-दहा मिलीमीटर पाऊस चोवीस तासांत झाला आहे. म्हणजे आजूबाजूला झाली ती निश्चितच ढगफुटी! या ढगफुटीने टणक, बलदंड, कणखर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हाहाकार झाला. दरड कोसळून आणि महापूर येऊन ८७५ गावे बाधित झाली. १६४ जणांना आपला प्राण गमवावा लागला. आंबेघरसारख्या गावात १८ लोकांना प्राण गमवावे लागले. अद्याप शंभरहून अधिक लोक सापडत नाहीत. पन्नासहून अधिक जण गंभीर जखमी आहेत. ३२४८ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. कोकणातील चोवीस आणि दक्षिण महाराष्ट्रातील तेवढ्याच नद्यांना महापूर आले. त्याचा फटका २ लाख ३० हजार लोकांना बसला. त्यांचे तात्पुरत्या निवारा केंद्रात पुनर्वसन करावे लागले. त्याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे.
ही सर्व समस्याच नव्याने उद्भवली आहे आणि ती मानवनिर्मित आहे. पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यांनी केलेल्या अनेक महत्त्वाच्या सूचना महाराष्ट्रासह पाचही राज्यांना पटल्या नाहीत. त्या अवास्तव आहेत, असा आक्षेप घेतला गेल्यावर त्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. कस्तुरीरंजन यांची समिती नेमली. त्यांनी त्यातील काही कडक सूचना बाजूला करून पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचीदेखील अंमलबजावणी अजूनही करण्यात येत नाही.
पश्चिम घाटात उसाच्या शेतीला प्रोत्साहन देणे, जंगलाची बेसुमार तोड, खाणींना परवानगी देऊन सह्याद्रीचे डोंगरच्या डोंगर पोखरून टाकणे, रस्त्यासाठी अनेक ठिकाणी उकराउकरी करणे आदी प्रकार घडत आहेत. कोकणात दोडामार्गसारख्या तालुक्यात केरळचे लोक येऊन केळी आणि रबराची शेती करू लागले आहेत. त्यासाठी डोंगरदऱ्यांची तोडफोड करण्यात येत आहे. या असल्या विचित्र प्रयोगांसाठी आपल्या जमिनीचे वाटोळे कशासाठी? कोकणात संरक्षित जंगल क्षेत्रच नाही. जे खासगी आहे त्याचे संवर्धन केले जात नाही. बेसुमार चोरटी लाकूडतोड आणि वाहतूक होते. त्याकडे वनखात्याचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पडणारा पाऊस अडविण्याची, ते पाणी जिरविण्याची नैसर्गिक साखळीच नष्ट केली जात असेल तर ढगफुटीने कोसळणारे प्रचंड पाणी अडवणार कोण?
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सरासरी पाच ते सहा हजार मिलीमीटर पाऊस अनेक वर्षे पडत आला आहे. २०१९ मध्ये तर त्याच्या दीडपट पाऊस झाला होता. महाबळेश्वरला साडेआठ हजार मिलीमीटर पाऊस झाला होता. सातारा-रत्नागिरी-सांगली जिल्ह्याची जंगल सीमा येते त्या पाथरपुंजला १० हजारांहून अधिक मिलीमीटर पाऊस झाला, तेंव्हा हे छोटेसे गाव राष्ट्रीय बातम्यांचा विषय बनले होते. मात्र ढगफुटीचे प्रकार घडले नव्हते. २०१९ मध्येही प्रचंड पाऊस झाला. महापुराच्या उंचीचे विक्रम मागे पडले; पण दरडी मोठ्या प्रमाणात कोसळून गावेच्या गावे गाडली गेली नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण हा अपघात नाही, हा नवा नैसर्गिक प्रघात आहे. ढगफुटीने कणखर सह्याद्री हलतो, कोसळतो, गावेच्या गावे कोसळत्या दरडीखाली गाडली जातात म्हणून एकवेळ संकटप्रवण भागातली गावे उचलून दुसरीकडे घेऊन जाल; पण दारात येऊन उभ्या ठाकलेल्या या संकटाचे काय करणार आहात?
दक्षिण महाराष्ट्र कधीही महापूर प्रवण नव्हता, पण जुने सारेच आडाखे बदलले आहेत. ढगफुटीने थरथरलेल्या बेभान झालेल्या कृष्णा, पंचगंगा आणि वारणासारख्या मोठ्या नद्यांच्या महापुराची पातळी पन्नास ते साठ फुटांपर्यंत जाऊ लागली आहे. पाऊस थांबला तरी चार-आठ दिवस पूर ओसरत नाही, याचा अभ्यास झाला पाहिजे. सह्याद्रीचे संवर्धन करणे म्हणजे महाराष्ट्राचे पर्यावरण राखणे आहे. ते प्राणप्रणाने जपले पाहिजे.