आज इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर आपला यमके खुशीत होता. मराठी भूमीत शांतता असल्याचा रिपोर्ट इंद्र दरबाराला धाडण्याच्या तयारीत असतानाच महागुरू नारदांचा फोन आलाच... नारायण... नारायण ! (यमकेने फोन घेतला.)यमके - प्रणाम गुरुदेव ! मी आज केवळ शांतता एवढाच रिपोर्ट देण्याच्या तयारीत आहे.नारद - शिष्या, मला तो अंदाज आला, म्हणूनच तातडीने तुला फोन केला. अर्धी मराठी भूमी दुष्काळाच्या छायेत असताना तू कसला शांततेचा रिपोर्ट देतोस?यमके- वरुणराजाला कधी आणि कुठे धाडायचे हे तुमचा दरबार ठरविणार आणि वर तुम्हीच आम्हाला दुष्काळाची भीती दाखविणार! वरुणराजाला धाडा, सगळं काही व्यवस्थित होईल.नारद- इंद्रदेवांनी भूलोकी कितीही चांगले केले तरी तुम्ही लोक आनंदाने खाता कुठे? एकीकडे काही लोक आरक्षणासाठी टाहो फोडतात तर दुसरीकडे कायद्याने आरक्षण असूनही कागदी घोड्यांसाठी पोराबाळांना जीव द्यायला भाग पाडता...!यमके- आता कुणाचा जीव गेला?नारद- अरे, विदर्भभूमीत एका मुलाने जातीचा दाखला मिळाला नाही म्हणून प्राण दिल्याचे तुला माहीत नाही का? तुमचीच व्यवस्था, तुम्हीच कुजवून टाकता आणि वर आमच्या दरबाराला दोष देता.यमके - खरं आहे देवा! पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता काही तरी ठोस मार्ग निघायलाच हवा.नारद - प्रश्न मार्ग निघण्याचा नाही. आपण अशा विषयांना कसे हाताळणार, हे महत्त्वाचे आहे. आज मराठा समाज ऐरणीवर आहे. धनगर, मुस्लीम आणि इतरही काही समाज पंगतीला असणारच ना...यमके - त्यासाठी तर संविधान आणि संविधानिक प्रक्रियेचा प्रत्येकाने कृतिशील आदर करायला हवा. तरीही देवेंद्रभाऊंनी ‘तामिळनाडू पॅटर्न’ मार्गाने जाऊन मराठा समाजाचे समाधान केले तर होणार नाही का?नारद - देवेंद्रभाऊ काय आणि पृथ्वीराजबाबा काय, विधिमंडळाचे सोपस्कार त्यांनी पार पाडलेच होते ना! पण तेथे तिरोडकर नामक बालक आडवा आलाच आणि पुढचे महाभारत घडते आहे. नमोच्या साथीने ‘तामिळनाडू पॅटर्न’ देवेंद्रभाऊंनी प्रामाणिकपणे राबविला आणि पुन्हा एखादा तिरोडकर उभा राहिला तर कसे?यमके - त्याचसाठी आता मराठी भूमीतील मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट आणि बाकीच्या घटनात्मक तरतुदीनुसार पुढे जाणेच मराठी भूमीला हिताचे ठरणार आहे. डॉ. सुधीर गव्हाणे नामक संशोधक-पत्रकाराने मागासलेपण कसे मोजावे, याचा मापदंड सांगणारा विशेष रिपोर्ट मागास आयोगाला दिला आहे म्हणे!नारद - हो! आता जाणता राजानेही मराठा-बहुजन फुटीची भीती व्यक्त करणारे कागदी घोडे नाचवायला सुरुवात केली आहे.यमके - मराठा समाजाच्या सर्वच संघटनांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर आता अचानक जाणता राजांना तशी आठवण का व्हावी?नारद - समता हाच प्रत्येक समस्येवरचा खात्रीशीर उपाय तो संविधानाच्या चौकटीत बसविणे हेच राज्यकर्त्यांचे कर्तव्य असते. त्याचाच विसर पडल्याने आज जाणता राजाचीही ‘बैल गेला... झोपा केला...!’ अशी अवस्था झाली असावी...
बैल गेला... झोपा केला...
By राजा माने | Published: August 13, 2018 12:24 AM