‘माणूस म्हणून चांगले असणे’च राजीव गांधींच्या राजकीय मर्यादेचे कारणही ठरले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:07 AM2021-05-21T08:07:28+5:302021-05-21T08:08:56+5:30
राजीव गांधी यांना अभिप्रेत असलेले त्यांच्या जातकुळीचे नैतिक राजकारण आता आसपास कोठे दिसत नाही. देशाचे केवढे दुर्दैव आहे हे!
मणीशंकर अय्यर, ज्येष्ठ काँग्रेस नेते, राजीव यांचे व्यक्तिगत स्नेही
राजीव गांधी यांच्या आत ‘एक चांगला माणूस’ होता, आणि नेमके हे ‘माणूस म्हणून चांगले असणे’च त्यांच्या राजकीय मर्यादेचे कारणही ठरले. १९८४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रचंड बहुमत मिळाले. राजकारणात नीतिमत्ता आणण्याचा प्रयोग करण्यासाठी सुपीक जमीन त्यामुळे त्यांच्या हाती आली खरी, पण याच प्रयत्नामुळे १९८९ साली त्यांचे बहुमत ढासळले. त्यानंतर आयुष्याच्या उर्वरित १८ महिन्यांतही त्यांनी नैतिकतेची कास सोडली नाही. २१ मे १९९१ रोजी त्यांची हत्या झाली. तो दुर्दैवी दिवस उगवला नसता, तर चोख नैतिकता राजकारणातही जिंकू शकते हे बरोबर ३० वर्षांपूर्वी राजीव गांधींनी दाखवून दिले असते.
२८ डिसेंबर १९८५ रोजी मुंबईत काँग्रेसच्या शताब्दी समारोहात बोलताना ‘सत्तेच्या दलालां’ची निर्भर्त्सना करून राजीवजींनी राजकारणातील तत्त्वनिष्ठेचे नाट्यपूर्ण दर्शन घडवले. दिवाणखान्यात आरामदायी सोफ्यावर बसणाऱ्या मध्यमवर्गीयांना त्यांचा हा पवित्रा बेहद्द आवडला. हे भाषण ऐकणाऱ्यांत असे ‘सत्तेचे दलाल’ होतेच. ते आणि त्यांच्या हस्तकांनी विचार केला की हे राजकारण तर आपल्या हितसंबंधांच्या आड येणार आहे. सत्तेची दलाली हाच तर त्यांच्या राजकारणाचा पाया होता. बाकी देशात राजीव गांधी यांची वाहवा होत असताना त्यांना पक्षातच विरोध करणारे अरुण नेहरू, व्ही. पी. सिंग, आरिफ मोहम्मद ही फळी याच काळात आकाराला आली. व्यक्तिमत्त्वातील चांगुलपणा राजकारणाला मारक ठरतो याचे हे ठळक उदाहरण.
अयोध्येत राममंदिराचे कुलूप उघडण्याच्या बाबतीत हेच झाले. पंतप्रधानांच्या माघारी हे सारे शिजवण्यात अरुण नेहरू यांची भूमिका होती. धर्मनिरपेक्षतेच्या मुळांना धक्का लावणारी ही चाल राजीवजींनी कदापि मान्य केली नसती. आपण फसवले गेलो हे राजीवजींना कळल्यावर त्यांनी अरुण नेहरू यांना पक्षात लगाम घातले, कालांतराने नेहरूंना मंत्रिमंडळातून नारळ दिला. राजकीय परिणाम काही होवोत; योग्य तेच करायचे हे राजीव महात्मा गांधींकडून शिकले होते. राजकारणात तत्त्वनिष्ठा आणण्यासाठी हेच तर आवश्यक असते.
शहाबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या बाबतीतही हेच घडले.
सर्व संसदीय प्रथा पाळून, लोकशाही पद्धतीने लोकसभेने जोरदार बहुमताने संमत झालेल्या मुस्लीम महिला (घटस्फोटाचा हक्क) विधेयकाच्या विरोधात डॅनियल लतीफ या जन्माने मुस्लीम असलेल्या ज्येष्ठ वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. लतीफ यांच्या याचिकेवर निकाल द्यायला न्यायालयाने १५ वर्षे घेतली. २००१ साली दिलेल्या निकालात न्यायालयाने म्हटले की कायद्याने सर्वोच्च न्यायालयाचा आधीचा निकाल उलटा तर फिरवला नाहीच; पण निकाल अधिक स्पष्ट केला. कोणत्याही प्रकारे त्यात घटनेची पायमल्ली झालेली नाही.
८५ साली न्यायालयाने दिलेल्या निकालाला मोठ्या प्रमाणात माध्यमांनी झोडपून काढले होते; पण राजीव गांधी चुकले नव्हते हे दाखवणाऱ्या २००१ साली आलेल्या निकालाला कोणी फारसे महत्त्व दिले नाही. राजीव गांधी यांचे राजकारण नैतिक कसे होते हे दाखवणारी अन्य उदाहरणे येथे विस्तारभयास्तव मला देता येणार नाहीत. त्या जातकुळीचे नैतिक राजकारण आता आसपास कोठे दिसत नाही. केवढे दुर्दैव आहे हे!