शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
2
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
3
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
4
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
5
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!
6
शेवटी आईच ती! ९ महिन्यांच्या बाळाला वाचवलं, स्वत:चं बलिदान दिलं; काळजात चर्र करणारी घटना
7
काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?
8
जगाच्या भुवया उंचावल्या! भारताच्या तीन युद्धनौका इराणला पोहोचल्या; इस्रायल कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असताना...
9
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
10
Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड
11
लेकीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसणार? 'सिंघम अगेन' च्या ट्रेलर लाँचची चर्चा
12
"आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस
13
३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
14
"आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ..." तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
15
मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास
16
Diffusion Engineers Share Price : पहिल्याच दिवशी ₹२०० पार पोहोचला 'हा' शेअर; बाजारात एन्ट्री घेताच अपर सर्किट; ११४ पट झालेला सबस्क्राइब
17
४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवर दिसला अभिनेता, म्हणाला- "माझ्यासाठी..."
18
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
19
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
20
Rakhi Sawant : Video - "स्मशानभूमीतून आईच्या अस्थी..."; ढसाढसा रडत राखीने मोदींकडे मागितली मदत

समजा, एलियन्सनी तुमचे दार ठोठावले तर?; चला, ती वेळ येण्याची वाट पाहूया!

By विजय दर्डा | Published: September 18, 2023 7:27 AM

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मी एकदा विचारले, ‘एलियन्सच्या बाबतीत आपले मत काय?’ - ते उत्तरले, ‘एलियन्स नाहीतच असे म्हणता येणार नाही!’

एलियन्स म्हणजे दुसऱ्या ग्रहावरील अज्ञात जीवांचे अस्तित्व! कुठेही युएफओ म्हणजे उडत्या तबकड्या दिसल्या की, लगेच एलियन्सच्या चर्चा रंगू लागतात. दावे-प्रतिदावे केले जातात. मात्र, यावेळी पहिल्यांदाच मेक्सिकोच्या संसदेत एलियनचा मृतदेह दाखविला गेला.  युएफओ तज्ज्ञ पत्रकार जेमी मोसान यांचा दावा आहे की, ‘ममी झालेले हे हजार वर्षांपूर्वीचे शव दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या एलियनचे असून, पेरूमधील खाणीत ते सापडले!’

हे शव मानवी शरीरापेक्षा वेगळे दिसते.  त्याला तीन तीनच बोटे असून, ती माणसाच्या बोटांपेक्षा जवळपास दुप्पट मोठी आहेत. बरगड्यांची रचना ही माणसापेक्षा वेगळी आहे. मोसान म्हणतात, ‘मेक्सिकोच्या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या शवाची  रेडिओकार्बन डेटिंगच्या माध्यमातून तपासणी केली. या शवामधील हाडे मानवी हाडांपेक्षा हलकी परंतु अधिक मजबूत आहेत!’  

मेक्सिकोच्या ज्या भागात हे शव मिळाले तेथे गवताची काडीही उगवत नाही. तेथे मोठ्या आकाराचे रेडियो कंडक्टर आढळले जे तयार करणे मनुष्याला शक्य नाही... म्हणजे एलियन्सचा या प्रदेशाशी संबंध आला होता का? - मेक्सिकोच्या संसदेत झालेल्या या चर्चेचे थेट प्रक्षेपण केले गेले. 

या कार्यक्रमात अमेरिकन नौदलाचे माजी पायलट रायन ग्रेव्ह्ज हेही उपस्थित होते. नोकरीत असताना आपण एलियन्सचे अंतराळयान पाहिले होते, असा दावा याच रायन यांनी अमेरिकन संसदेत केला होता. गतवर्षी अमेरिकन संसदेत एलियन्सबाबत झालेल्या चर्चेत अमेरिकन नौदलाचे माजी गुप्तचर अधिकारी मेजर डेविड प्रश् म्हणाले, उडत्या तबकड्या आणि एलियन्सच्या बाबतीत अमेरिका बरीच माहिती जगापासून लपवत आहे!” अमेरिकेने एलियन्स आणि उडत्या तबकड्या पकडल्या असून, त्यावर संशोधन चालू असल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिकन संरक्षण खाते - पेंटागनने मात्र हा दावा निराधार असल्याचे सांगून फेटाळला. 

अमेरिकेच्या नेवाडा राज्यात ‘एरिया ५१’ नावाच्या गुप्त ठिकाणी एलियन्सवर संशोधन चालू असल्याचे म्हटले जाते. न्यू मेक्सिकोत तासाला २७ हजार मैल इतक्या वेगाने एक उडती तबकडी पडली होती. तिचे अवशेष १९५१ साली या प्रदेशात आणले गेले म्हणून या भागाला ‘एरिया ५१’ म्हटले जाते. अमेरिकेकडे एलियन्सचे मृतदेहसुद्धा आहेत, अशीही चर्चा आहे. ‘एरिया ५१, अनसेंसर्ड हिस्ट्री ऑफ अमेरिकाज टॉप सीक्रेट मिलिट्री बेस’ या पुस्तकात पत्रकार ॲन जेक्बसन लिहितात, ‘लहान मुलांच्या आकाराचे एलियन्स पायलट पकडले गेले, अशी माहिती माझ्या सूत्रांनी दिली. पण त्याचा पुरावा मात्र नाही!’

जगाच्या अनेक भागात उडत्या तबकड्या दिसल्याचे दावे केले जात असतात. भारत आणि चीनच्या सीमेवरही अशाप्रकारच्या गोष्टी अनेकदा दिसल्या आहेत. प्रारंभी असे वाटले की, चीनचा  ड्रोन असेल, परंतु तेही कधी रडारवर आले नाही. त्यामुळे त्या उडत्या तबकड्या असल्या पाहिजेत, अशी शंका व्यक्त होते. २००३ साली चिलीच्या वाळवंटात ट्रेजर हंटर ऑस्कर मुनु याला सहा इंचाच्या मुलाचे शव सापडले, ते एखाद्या एलियनचे असले पाहिजे, असे तेव्हा म्हटले गेले. त्या शवाच्या शरीररचनेत केवळ १० बरगड्या होत्या. सामान्य माणसाच्या शरीरात १२ बरगड्यांची जोडी असते. नंतर जेनेटिक तपासणीत असे लक्षात आले की, वेगळ्या प्रकारच्या आजारामुळे तो मुलगा विकृत स्वरूपात जन्माला आला होता.

तर असे दावे प्रतिदावे होत आले आहेत. मात्र, सांगोवांगीवर विश्वास न ठेवणाऱ्या विज्ञानाला प्रमाण लागते. वैज्ञानिकांनी एलियन्सच्या अस्तित्वाची शक्यता कधी नाकारलेली नाही. ब्रह्मांडातील दुसऱ्या एखाद्या ग्रहावर जीवन असेल तर आश्चर्य मानण्याचे कारण नाही, असे वैज्ञानिकही मानतात.  अंतराळ विज्ञान वेगाने विकसित होत आहे. आपणही संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. ब्रह्मांडातून येत असलेले संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या संदेशांची भाषा सिग्नल्सच्या स्वरूपात आहे. गतवर्षी केवळ ८२ तासांच्या अवधीत १८६३ रेडिओ सिग्नल्स शास्त्रज्ञांनी पकडले. या सिग्नलचा अभ्यास करणारे चिनी अंतराळशास्त्रज्ञ आणि अंतराळवीर हेंग शू यांनी असा दावा केला की, ते रेडिओ सिग्नल्स शक्तिवान चुंबकीय क्षेत्र असलेल्या न्यूट्रॉनवरून आले आहेत. हे रेडिओ सिग्नल्स का आले, याचा खुलासा झालेला नाही. ते कोणी पाठवत आहे काय? 

आपणही अंतराळात पुष्कळच रेडिओ सिग्नल्स पाठवले आहेत. १५ ऑगस्ट १९७७ रोजी अमेरिकेतील ओहायोमध्ये बिग इअर टेलिस्कोपने एक सिग्नल पकडला जो २०० प्रकाश वर्ष अंतरावरून आलेला होता. हे अंतर समजून घ्यायचे असेल तर प्रकाशाची गती प्रति सेकंदाला किमान ३ लाख किलोमीटर असते, हे लक्षात घ्यावे लागेल. २०० वर्षांत प्रकाश किती दूर पोहोचेल, याचा हिशोब करून आपल्याला हा सिग्नल किती दूरवरून आला हे समजू शकेल. महान वैज्ञानिक, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मी एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल विचारले होते. ते म्हणाले, ‘एलिअन्स नसतीलच असे ठामपणे म्हणता येणार नाही!’ महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइनने म्हटले होते, एलियन्स नाहीतच असे कुणी म्हणत असेल तर ते म्हणजे केवळ समुद्रातून काढलेल्या चमचाभर पाण्यात नाही म्हणजे  समुद्रात शार्क किंवा व्हेल मासा नाही, असे म्हणण्यासारखे आहे.

आपल्या विज्ञानाची प्रगती पाहता एक दिवस आपण एलियन्सच्या संपर्कात नक्की येऊ, असे वाटते. पण, खरोखर एखाद्या दिवशी एलियन्सने आपला दरवाजा ठोठावला तर? त्याची भाषा काय असेल? तो कसा वागेल? कसा दिसेल? चला, ती वेळ येण्याची वाट पाहूया!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड लोकमत समूह