डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह |
अमेरिकी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर भारतावर काय परिणाम होईल, याचा हिशेब आपण मांडू लागलो. अमेरिका संपूर्ण जगावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करत असलेला देश असल्याने असे विश्लेषण स्वाभाविकही ठरते; परंतु आता प्रश्न असा उपस्थित होतो की अमेरिकेतील निवडणुकांवर प्रभाव टाकल्याचा आरोप रशियावर का केला जातो?
५ नोव्हेंबरला अमेरिकेत मतदानाची प्रक्रिया सुरू असताना मिशिगन, ॲरिझोना, जॉर्जिया, तसेच विस्कॉन्सिनसह अनेक राज्यांत मतदान केंद्र उडवून देण्याची धमकी देणारे ई-मेल पोलिसांना मिळाले. हे सर्व मेल रशियातून पाठवले गेले होते, असे म्हणतात. त्यामुळे असा आरोप होणे स्वाभाविक असले तरी अशा धमक्यांचा मतदारांवर परिणाम झाला का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. झाला असेल तर तो कसा? दोन महिने आधी मायक्रोसॉफ्टनेही असा आरोप केला होता की, काही रशियन लोक कमला हॅरिस यांच्याविरुद्ध बनावट व्हिडीओच्या माध्यमातून अफवा पसरवत आहेत. याच वर्षी ४ सप्टेंबर रोजी अमेरिकेचे महाधिवक्ता मेरिक गारलँड यांनी ‘आर.टी.’ या रशियन सरकारी माध्यमावर एका अमेरिकी फर्मला लाच दिल्याचा आरोप केला होता. आर.टी.ने ही लाच रशियाचा अजेंडा रेटण्यासाठी दिली असे त्यांचे म्हणणे होते. रशियाने मात्र याचा इन्कार केला.
अमेरिकेतील निवडणुकीवर प्रभाव टाकल्याचा आरोप रशियावर पहिल्यांदाच झालेला नाही. २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन यांचा लढा कमजोर करून ट्रम्प यांना बळ देण्यासाठी रशियाने ‘लाखता’ नामक एक गुप्त मोहीम चालवली होती, असा आरोप झाला आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी याबाबत सरळसरळ आदेश दिल्याचे म्हटले गेले. अमेरिकेने चौकशी केली. २०१९ मध्ये यावर साडेचारशे पानांचा अहवालही आला. डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये दोनशेपेक्षा जास्त वेळा झालेल्या संवादाची चौकशीही झाली होती. अर्थात रशियाचे कारस्थान किंवा त्यात ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले नाहीत.
ट्रम्प यांच्या विजयामुळे रशियाचा काय फायदा होणार? -वास्तवात युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल जो बायडेन यांनी रशियावर कडक निर्बंध लावले आणि युक्रेनला ६० अब्ज डॉलर्सची मदत केली. याउलट ‘रशियाच्या हल्ल्याला युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कीच जबाबदार आहेत’ असे ट्रम्प सातत्याने म्हणत आले. ‘अध्यक्ष झाल्यावर आपण युक्रेनची आर्थिक आणि लष्करी मदत बंद करू’ असे ट्रम्प निवडणुकीच्या प्रचारात स्पष्टपणे सांगत होते. ट्रम्प यांच्या या पवित्र्यामुळे रशियाला मदत होईल हे तर उघडच आहे. पुतीन आणि ट्रम्प यांच्या दोस्तान्याबाबतच्या चर्चा जागतिक राजकारणात बऱ्याच जुन्या आहेत; परंतु पुतीन यांनी अमेरिकेत खरोखरच काही खेळ केला का, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही.
भारताविषयी बोलायचे तर ‘अमेरिका प्रथम’ ही ट्रम्प यांची नीती असली तरी भारताला अमेरिकेची जितकी गरज आहे त्यापेक्षा अमेरिकेला भारताची जास्त गरज असल्याने त्या देशाचे भारताशी संबंध चांगले राहतील. ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळात चीनच्या मुसक्या आवळण्याचे सर्व ते प्रयत्न केले होते; कारण चीन हे भविष्यकाळातील सर्वांत मोठे आव्हान आहे. अमेरिकेच्या जागतिक खुर्चीवर कब्जा करण्याची चीनची इच्छा लपलेली नाही. चीनच्या मुसक्या आवळण्यात भारत चांगलीच मदत करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात एक समजूतदार मैत्री असून, अशा मैत्रीमुळे फरक तर पडतोच.
याशिवाय रशियाचे भारताशी जुने नाते असल्यामुळे अमेरिका भारताची मदत नक्की घेऊ पाहील. वैश्विक महाशक्तीच्या स्वरूपात भारताला भागीदारीचा हक्क असल्याचे संकेत पुतीन यांनी ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांचे अभिनंदन करताना दिले होते. जागतिक कारणांमुळे पुतीन सरळसरळ ट्रम्प यांचे म्हणणे स्वीकारणार नाहीत; परंतु नरेंद्र मोदी यांच्यामार्फत ते ऐकू शकतात. रशिया आणि अमेरिकेतील तणाव कमी होऊ शकतो. चीनला घेरण्यासाठी हे वातावरण अत्यंत उपयोगी पडेल.
भारताच्या अंतर्गत बाबीतही ट्रम्प यांची भूमिका सहकार्याची राहिली आहे. भारतावर राजकीय टीका करताना ते सौम्य राहिले. त्याचवेळी बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांची त्यांनी उघडपणे निर्भर्त्सना केली. असे असले तरी अमेरिकन उत्पादनांवर भारतात जास्त कर लावलेलाही त्यांना चालणार नाही. ‘हाऊडी मोदी’चा जयजयकार ते अजून विसरलेले नसतील. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका विकासाची नवी परिभाषा लिहील अशी आशा करूया. भारताप्रमाणेच हा देशही ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या मार्गाने जावा.अमेरिकन संसदेत पुन्हा एकदा निवडून आल्याबद्दल भारतीय वंशाचे एमी बेरा, प्रमिला जयमाल, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना आणि श्री ठाणेदार यांचे अभिनंदन. सुहास सुब्रमण्यम यांनी वर्जीनिया आणि संपूर्ण पूर्व किनारपट्टीतून विजय मिळवून इतिहास रचला, त्यांचेही अभिनंदन. तेथे पहिल्यांदाच भारतीय वंशाचा प्रतिनिधी निवडून आला आहे.
गेल्या २३५ वर्षांत एकही महिला अमेरिकेची अध्यक्ष का होऊ शकली नाही? -हा प्रश्नही शेवटी विचारला पाहिजे. १७८८-८९ मध्ये तेथे राष्ट्राध्यक्षपदासाठी पहिली निवडणूक झाली. विक्टोरिया वूडहूल यांच्यापासून हिलरी क्लिंटन आणि कमला हॅरिस यांच्यापर्यंत अनेक महिलांनी निवडणूक लढवली; परंतु त्यांना यश मिळाले नाही. असे का? -याचे उत्तर अमेरिकन मतदारच देऊ शकतील.
( vijaydarda@lokmat.com )