माधवी वागेश्वरीचित्रपट अभ्यासक
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या सिनेमाची ऑस्कर पुरस्कारासाठी भारत सरकारतर्फे निवड झाल्याची बातमी आली आणि त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही या निवडीच्या बाजूने तर काही विरुद्ध! काही प्रतिक्रिया या सम्यक आहेत, त्या मुख्यत्वे निवड समिती कसे सिनेमे निवडते आहे आणि त्याचे निकष कसे बदलत गेले आहेत यावर चर्चा करणाऱ्या आहेत. ‘लापता लेडीज’ हा सिनेमा जेंव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता तेंव्हा त्याला फार प्रतिसाद मिळाला नव्हता. पण, तो ‘ओटीटी’वर रीलीज झाल्यावर मात्र वेगाने लोकप्रिय झाला! घराघरातून, विशेषतः महिला मंडळांमधून अगदी हळदी-कुंकवाला भेटलेल्या बायकादेखील “अगं लापता लेडीज बघितलास का? काय सुंदर आहे गं सिनेमा..” असं म्हणताना दिसल्या.
अर्थात ही अशी लोकप्रियता ऑस्करच्या शर्यतीत उपयोगाची ठरतेच असं नाही. त्या स्तरावर जाताना देशीय संदर्भ बदलतात, सगळं एकदम आंतरराष्ट्रीय होऊन जातं. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेताना नियम समजून घेणं आणि ती स्पर्धा जिंकण्यासाठी योग्य अशी व्यूहरचना आखणं अत्यंत आवश्यक असतं. स्पर्धा मग ती ऑलिम्पिक असो वा ऑस्कर!
आतापर्यंत परदेशी विभागात ज्यांना ऑस्कर मिळालं आहे त्यांच्यावर नजर टाकली तर ढोबळमानाने दोन मुद्दे लक्षात येतात : त्यात आशय म्हणून वैश्विक मूल्यांवर भाष्य केलेलं आहे, मानवतेला जोडणारा समान धागा या सिनेमांच्या मुळाशी आहे. आणि दुसरं म्हणजे ‘सिनेमाचं तंत्र.’ सिनेमा या माध्यमाच्या ज्या शक्यता आहेत, त्या दृश्य आणि ध्वनीच्या माध्यमातून किती उत्क्रांत करत नेल्या आहेत, त्यात क्राफ्ट म्हणून काय विचार केला गेला आहे... अगदी हे दोन निकष लावून जरी आपण याआधी पुरस्कार जिंकलेले सिनेमे पाहिले तरी आपल्या लक्षात येईल की या दोन गोष्टी किती आणि का महत्त्वाच्या असतात. आता या दोन निकषांवर यावेळी निवडलेला सिनेमा उतरतो आहे का? की केवळ सगळ्या भारतीयांना तो आवडला म्हणून त्याची निवड झाली आहे हे जरा तटस्थपणे पाहिले पाहिजे.
‘लापता लेडीज’ सोबत चर्चा होते आहे पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या कान्स महोत्सव गाजवलेल्या सिनेमाची. जर आधीच या सिनेमाने एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवली आहे तर मग तोच का नाही पाठवला, असा प्रश्नही सध्या चर्चेत आहे. खरं म्हणजे हा सिनेमा फ्रान्सतर्फे पाठवला गेला आहे; कारण त्याची निर्मिती त्या देशातल्या लोकांनी केलेली आहे. आपल्याकडे ‘आवड आपली आपली’ला जरा अजूनही जास्तच महत्त्व आहे. आवडतं ते दरवेळी निकषांमध्ये बसतंच असं नाही, याचा अनुभव राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या निवड समित्यांच्या लोकांनाही कदाचित येत असावा. शेवटी या अशा स्पर्धेत फिल्म प्रमोट करायला लागणारे पैसे, त्या पद्धतीची माणसे हेही निकष लावले जातातच. ‘लापता लेडीज’साठी ही जमेची बाजू आहे; कारण, खुद्द आमीर खान; ज्यांच्याकडे ‘लगान’चा पहिल्या पाचात येण्याचा बहुमान आणि अनुभव आहे आणि दुसरं म्हणजे ‘लापता लेडीज’ हा बलाढ्य अशा ‘जिओ’चा सिनेमा आहे, त्यातच सर्व काही आले.
या सगळ्या चर्चेत एक सगळ्यात सुखावह गोष्ट म्हणजे हे दोन्हीही सिनेमे हे स्त्रियांच्या भावविश्वावर आणि विचारविश्वावर भाष्य करणारे आहेत. स्त्रियांच्या आयुष्याशी संबंधित वैश्विक मूल्यांवर काही वेगळं सांगू पाहणारे आहेत जे शेवटी मानवतेच्या धाग्याजवळ येऊन एका व्यापक गोष्टीशी जोडले जातात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं हे दोन्हीही सिनेमे किरण राव आणि पायल कपाडिया या दोन स्त्रियांनी बनविलेले आहेत, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींसाठी ती फार फार उमेद देणारी बाब आहे.madhavi.wageshwari@gmail.com