जगभर : युक्रेनमुळे रशियात सैन्याची वारेमाप भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 09:07 AM2024-09-26T09:07:17+5:302024-09-26T09:07:31+5:30

चिवट युक्रेन रशियाला नेटानं प्रतिकार करतोच आहे. इतकंच नाही, त्यानं रशियाच्या नाकीनव आणले आहेत.

Article on Military deployment in Russia due to Ukraine | जगभर : युक्रेनमुळे रशियात सैन्याची वारेमाप भरती

(फोटो सौजन्य - AP)

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. ‘दोन दिवसांत’ संपणारं हे युद्ध अजूनही सुरूच आहे आणि या युद्धाला आता तब्बल अडीच वर्षे झाली आहेत. युक्रेनचा आम्ही चुटकीसरशी सफाया करू अशा वल्गना रशिया आणि पुतीन यांनी केल्या होत्या, पण त्या साऱ्या हवेतच विरल्या. चिवट युक्रेन रशियाला नेटानं प्रतिकार करतोच आहे. इतकंच नाही, त्यानं रशियाच्या नाकीनव आणले आहेत. त्यामुळे रशियाच्या नाकाला फारच मिरच्या झोंबल्या आहेत.

चिमुरड्या युक्रेननं रशियाच्या नाकावर टिच्चून त्यांच्या तोडीस तोड उत्तर देताना मागच्या महिन्यात तर रशियाच्या कुर्स्क प्रांतावर हल्ला करून तेथील तब्बल १,१७५ चौरस किलोमीटर जमीन आपल्या ताब्यात घेतली. या मानहानीमुळे रशियाचा इतका संताप झाला आहे की, युक्रेनला आता खाऊ की गिळू असं त्यांना झालं आहे. पण दात ओठ खाण्याशिवाय त्यांच्या हाती फारसं काही राहिलेलंही नाही. त्यांच्या हातात आता एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या सैन्याच्या संख्येत वाढ करणं! त्यांनी कैद्यांना सैनिकांत भरती करून पाहिलं. देशोदेशीच्या ‘निष्पाप’ नागरिकांना ‘फसवून’ आपल्या सैन्यात दाखल केलं, त्यांचे स्वत:चे ‘अधिकृत’ सैनिकही होतेच, पण तरीही बरेच रशियन सैनिक कामी आले. या युद्धात त्यांना सैनिकांची कमतरता जाणवते आहे. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा सैन्य भरती सुरू केली आहे. युक्रेनबरोबरचे युद्ध सुरू झाल्यानंतर तब्बल तिसऱ्यांदा ही सैन्यभरती करण्यात येत आहे. पुतीन यांनी हा आदेश दिला आहे. कुर्स्क क्षेत्रातील पिछेहाट त्यांच्याही मनाला फारच बोचली आहे. त्यांच्यासाठी हा फार मोठा अपमान आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच रशियाला एवढ्या मोठ्या प्रदेशाला मुकावं लागलं आहे. युक्रेनच्या ताब्यात गेलेला हा प्रदेश लवकरात लवकर ताब्यात मिळवावा आणि आपली गेलेली इज्जत निदान आणखी जाऊ नये या प्रयत्नांत पुतीन आहेत. त्यामुळेच त्यांनी आता सैन्याची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपला प्रदेश तर युक्रेननं हिसकावला, पण त्याबदल्यात युक्रेनचा इतर प्रदेश तरी आपल्या ताब्यात मिळावा यासाठी रशियानं डोनबासजवळील पोक्रोवस्क या युक्रेनी शहरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

पुतीन यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये १.३७ लाख सैन्याची भरती करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर रशियाच्या एकूण सैनिकांची संख्या वीस लाखांपेक्षाही जास्त झाली होती. त्यातील ‘ॲक्टिव्ह’ सैनिकांची संख्या ११.५ लाख होती. पण ही संख्याही कमी पडल्यामुळे चारच महिन्यांत पुतीन यांनी डिसेंबर २०२२ मध्ये पुन्हा आपली सैन्यसंख्या १.७० लाखांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या ‘ॲक्टिव्ह’ सैनिकांची संख्या १३.२ लाख इतकी झाली. कुर्स्क क्षेत्रातील मानहानीकारक पिछेहाटीमुळे त्यांनी पुन्हा सैन्यभरतीचा निर्णय घेतला आहे. 

नव्या आदेशानुसार रशिया आपल्या सैन्याच्या ताफ्यात आणखी १.८० लाख सैन्याची भरती करणार आहे. क्रेमलिनच्या माहितीनुसार येत्या डिसेंबरमध्ये ही सैन्यभरती केली जाईल. यामुळे रशियाच्या एकूण सैन्याची संख्या सुमारे २३.८ लाख इतकी होईल. त्यातील ‘ॲक्टिव्ह’ सैनिकांची संख्या तब्बल १५ लाख इतकी असेल. यामुळे रशियाची ‘ॲक्टिव्ह’ सैन्यसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताला पिछाडून रशिया आता भारताची जागा घेईल. ॲक्टिव्ह सैनिकांच्या बाबतीत सध्या तरी पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्या क्रमांकावर भारत आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज (आयआयएसएस)च्या मते या भरतीमुळे अमेरिका आणि भारताला मागे टाकून रशिया दुसऱ्या क्रमांकावर जाईल. दुसरीकडे युक्रेननंही संभाव्य हल्ल्याची भीती लक्षात घेऊन आपल्या मित्रदेशांकडे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची मागणी केली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपूर्वीपर्यंत युक्रेनला अशी क्षेपणास्त्रे पुरवण्याबाबत अमेरिका आणि ब्रिटननंही अनुकुलता दर्शवली होती, पण यामुळे पुतीन यांचं पित्त फारच खवळलं होतं आणि याचे परिणाम फार वाईट होतील, अशी धमकी दिली होती. चक्रमपणासाठी प्रसिद्ध असलेले पुतीन काहीही करू शकतील म्हणून या दोन्ही देशांनी काही काळापुरता या निर्णयाला विराम दिला होता.

सैन्यसंख्येत रशिया दुसऱ्या क्रमांकावर  

युक्रेन युद्धामुळे पुतीन यांनी आपल्या युद्धसैन्यात वाढ सुरू केली आहे. जगात सध्या ॲक्टिव्ह सैन्यसंख्या पुढीलप्रमाणे आहे. चीन २०.३५ लाख, त्यानंतर भारत १४.५६ लाख, अमेरिका १३.२८ लाख, रशिया १३.२० लाख, उत्तर कोरिया १३.२० लाख, युक्रेन नऊ लाख, पाकिस्तान ६.५४ लाख, इरण ६.१० लाख, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम सहा लाख! नव्या सैन्यभरतीमुळे रशिया भारताच्या पुढे म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर जाईल.
 

Web Title: Article on Military deployment in Russia due to Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.