मोहंमद सिराज. परवाचा रविवार उजाडलाच होता बहुतेक त्याच्यासाठी! आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात त्यानं श्रीलंकन संघाची दाणादाण उडवली. भारतानं सहज सामना जिंकला! पण जिंकण्या-हरण्याची ही गोष्ट इथेच संपत नाही. उलट इथे सुरू होते.
ती गोष्ट आहे वैभवशाली क्रिकेटच्या पोटात दडलेल्या अपरिमित कष्टांची. त्या कष्टांच्याच वाटेवरून चालत आलेला मोहंमद सिराज. त्याचे वडील हैदराबादमध्ये रिक्षाचालक होते. आपला मुलगा क्रिकेटपटू व्हावा, असं स्वप्न वडिलांसह साऱ्या कुटुंबानं पाहिलं. पण क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पाहणं आणि भारतीय संघाची कॅप डोक्यावर येणं यादरम्यान कित्येक मैल अंतर असतं. अर्ध्या वाटेतच गतप्राण झालेली अनेक स्वप्नं अवतीभोवतीही असतातच. मात्र, सिराजचं तसं झालं नाही. तो भारतीय संघापर्यंत पोहोचला. कोरोना काळात ऑस्ट्रेलियात सामना खेळत असताना त्याचे वडील गेले. क्वारंटाइन नियमांमुळे तो वडिलांच्या अंत्यसंस्कारांनाही येऊ शकला नाही.
रविवारी सामना संपल्यावर तो म्हणाला, ‘कितीही प्रयत्न करा; नशिबात असतं ते आणि तेवढंच मिळतं!’ - सिराजला कुणी नियतीवादी म्हणेलही! मात्र हजारो, लाखो गुणवंतांमधून आपण संघापर्यंत पोहोचतो, संघातही भरपूर स्पर्धा असताना आपण आपली गुणवत्ता सिद्ध करतो, हे सगळं म्हणजे नशिबाची साथ असं त्याला वाटत असेल तर ते चूक तरी कसं? अर्थात, नशीब - कष्ट आणि जिंकण्या-हरण्याची क्रिकेटची गोष्ट इथेही संपत नाही!
आशिया खंडातले सहा देश मिळून आशिया कप खेळविला गेला. पाकिस्तानात खेळण्यास भारताने नकार दिला आणि श्रीलंकेत सामने आयोजित करण्यात आले. श्रीलंका हा देश मोडकळीला आलेला! तिथं एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन आशियाई क्रिकेट काऊन्सिलने करण्याचं ठरवलं हे आव्हान होतं. त्याहीपेक्षा मोठं आव्हान पावसानं उभं केलं. अनेक सामन्यांत पावसाने विरस केला. पाऊस आला की, तांबडे शर्ट-हाफ पॅण्ट घातलेली फौज मैदानात धावत येत असे. मोठमोठी प्लास्टिकची आवरणं पसरवा, खेळपट्टीची काळजी घ्या. मैदान ओलं होऊ नये म्हणून झटा, असं काम सतत चाले. ही ग्राऊंड्समनची आर्मी कायम ‘अलर्ट’ मोडवर होती. माणसं तासनतास राबली. सामने झाले, कप भारताने जिंकला. स्पॉन्सर्सनी पैसा कमावला. खेळाडूंनी नाव आणि आदर कमावला किंवा गमावलाही!
मात्र, पावसाशी झुंज दिली ती या साध्याशा माणसांनी! कुणी म्हणेल, त्यात काय एवढं, ते त्यांचं कामच होतं! त्यांना मेहनताना मिळाला! - असं म्हणणाराच हा काळ आहे. खुद्द क्रिकेटच जिथे ‘हायर ॲण्ड फायर’ पद्धतीने खेळलं जातं तिथं मैदानात राबणाऱ्या साध्या माणसाची कदर कोण करणार? आपण पैसे देऊन माणसांचे श्रम विकत घेतो, माणसं नव्हे; हे न कळणाऱ्या नव्या कार्यसंस्कृतीत राबणाऱ्या माणसांची प्रतिष्ठा सांभाळली जाणं फार दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे.
मोहंमद सिराज वेगळा ठरला तो त्यामुळेच! तो खरंतर शब्दश: यशाच्या उत्तुंग शिखरावर होता. अत्यंत टोकाच्या आनंदात (दु:खातही प्रसंगी) स्वत:पलीकडे काही दिसू नये, असा भावनावेग असूच शकतो. पण सिराज तेव्हाही डोकं शाबूत ठेवून उभा राहिला. आपल्याला मिळालेली बक्षिसाची रक्कम त्यानं मोठ्या मनानं पण उपकाराच्या भावनेचा लवलेशही न दाखवता श्रीलंकन ग्राऊंड्समनच्या टीमला देऊन टाकली! नुसते पैसे दिले नाहीत, तर आदरपूर्वक त्यांचं योगदानही मान्य केलं! त्याआधी रोहित शर्मानेही बक्षिसाची रक्कम ग्राऊंड्समनना दिली; आणि यासोबतच एसीसीनेही पन्नास हजार अमेरिकन डॉलर्सची बक्षीसभेट दिली! पैसे दिले ही गोष्ट तर आनंदाचीच पण माणसांच्या कष्टांचं ऋण मान्य केलं ही गोष्ट जास्त ‘दिलदार’ आहे!
कुणी कुणाचा खुर्दा केला आणि कुणी गदर माजवला अशी वर्णनं करत रंगविलेल्या क्रिकेट सामन्यात ही दिलदारीच खऱ्या अर्थानं आशिया चषकाची कमाई आहे!
अनन्या भारद्वाज, मुक्त पत्रकार