...तर तो खरा मास्टरस्ट्रोक असेल; कोंडी नक्की कुणाची, काकांची की पुतण्याची?

By यदू जोशी | Published: May 5, 2023 10:40 AM2023-05-05T10:40:08+5:302023-05-05T10:40:47+5:30

पक्षाध्यक्षपदाचा तिढा सुटेलही कदाचित; पण भाजपसोबत जायचे की विरोधी भूमिका ठेवायची, हा पेच सुटत नाही तोवर राष्ट्रवादीत शांतता नांदणे कठीण

Article on Sharad Pawar, Ajit Pawar Politics in NCP Party | ...तर तो खरा मास्टरस्ट्रोक असेल; कोंडी नक्की कुणाची, काकांची की पुतण्याची?

...तर तो खरा मास्टरस्ट्रोक असेल; कोंडी नक्की कुणाची, काकांची की पुतण्याची?

googlenewsNext

यदु जोशी, सहयोगी संपादक

अजित पवार यांच्या हालचाली वाढल्यानंतर २१ एप्रिलच्या अंकात याच स्तंभात हा संघर्ष घरातला की घर बदलण्यासाठीचा?' या शीर्षकाखाली लिहिले होते. राष्ट्रवादीत नेतृत्वावरूनचा संघर्ष तीव्र होत जाईल, असे भाकीतही वर्तविले होते. गेले तीन दिवस ते खरे ठरत आहे. ५५ वर्षांच्या संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले शरद पवार वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वांत मोठ्या आव्हानास सामोरे जात आहेत. हे आव्हान २४ वर्षे त्यांनी वाढवलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टिकवण्याचे आहे. 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन समारंभात पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली अन् भूकंप झाला. उद्या पवार यांच्या जागी नवीन अध्यक्ष आले तरी राष्ट्रवादीतील गोंधळ आणि संदिग्धता संपेलच असे नाही. पक्षाध्यक्षपदाचा तिढा सुटेलही; पण भाजपविरोधी भूमिका कायम ठेवायची की भाजपसोबत जायचे, हा पेच सुटत नाही तोवर राष्ट्रवादीत शांतता नांदणे कठीण आहे. त्या दृष्टीने पक्ष आणि पवार हे आता एका निर्णायक टप्प्यावर उभे आहेत.

पक्षाच्या स्थापनेपासून भाजपसोबत न गेलेल्या पवारांवर भाजपसोबत चलण्याचा सर्वाधिक दबाव आज पक्षातूनच आहे. त्याचवेळी  भाजपसोबत जाऊ नये, असे मानणारेही काही नेते आहेतच. त्यांच्यापैकी कोणाच्या बाजूने कौल द्यावा ही खरी कोंडी आहे. वैचारिकतेची कास कायम ठेवायची की सत्तेसाठी व्यवहारवाद स्वीकारायचा याचा फैसला करायचा आहे. तीन-चार महिन्यांत तो करावाच लागेल. पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा करून शरद पवार यांनी अजित पवार यांची कोंडी केल्याचा तर्क काही जण लावत आहेत. घोषणेनंतर भावनांचा जो बांध फुटला त्यातून पक्ष माझ्या सांगाती' हे दाखवून देण्यात साहेब यशस्वी झाले असले तरी सगळे बेंबीच्या देठापासून आर्जव करत असताना अजित पवार मात्र 'नवीन अध्यक्ष आले तर काय हरकत आहे?' असा सूर लावत होते. पुतण्याचा हा सूरच काकांसाठी मोठी डोकेदुखी आहे आणि राहील. भावनाविवश झालेल्या नेत्यांची ताकद एकत्र केली तरी अजित पवारांची ताकद अधिक आहे. भावना अनावर झालेल्यांपैकी बरेच जण अजितदादांसोबत आहेत. इतकी वर्षे धर्मनिरपेक्ष नेता ही प्रतिमा टिकवणाऱ्या पवारांना आयुष्याच्या संध्याकाळी भाजपसोबत जायचे नाही आणि पक्षातील फूटही टाळायची आहे. त्यासाठी हरेक प्रयत्न ते करत आहेत हा त्यांच्या राजीनाम्याचा अर्थ! सध्याच्या वादळातही त्यांनी भाजपविरोधातील भूमिका कायम ठेवली आणि अजित पवार यांच्यासह संपूर्ण पक्षाच्या ती गळी उतरविली तर तो खरा मास्टरस्ट्रोक असेल.

द्रोणाचार्य होण्याच्या वयात साहेबांचा अभिमन्यू होत आहे; पण तेही कसलेले पहिलवान आहेत; हार मानणार नाहीत. कुटुंबातील सदस्यांसह पक्षातील बडे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. अशा वेळी महाशक्तीच्या विरोधात टिकाव धरण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याच्या वादळावर 'सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यात सर्वाधिकार अजित पवारांकडे असा मार्ग निघू शकतो. पवार कुटुंब फुटणार नाही. भाजपासोबत जायचे की नाही याचा निर्णय लगेच होणार नाही. कर्नाटकमध्ये भाजपची कामगिरी आणि त्यानंतर बदललेल्या राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊनच रणनीती ठरविली जाईल. पवार आपला पक्ष भाजपला लगेच आंदण देणार नाहीत. पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय त्यांनी सुप्रिया सुळे, अजित पवार यांना विचारूनच घेतल्याचे दिसते.

वज्रमूठ की वज्रझूठ?

छत्रपती संभाजीनगरमधील पहिल्या वज्रमूठ सभेआधी ही कसली वज्रमूठ सभा ही तर वज्रझूठ सभा' असे वर्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानंतर तीन मोठ्या वज्रमूठ सभा झाल्या तरी सध्या तीन पक्षांमध्ये विसंवादाचे वातावरण बघता शिंदेंनी केलेले वर्णन खरे ठरत आहे. मविआमध्ये परस्पर अविश्वासाचे वातावरण आहे. आपसी धुसफूस वाढत जाईल तसतसे मविआ अभेद्य राहणेही कठीण होत जाईल. उन्हातान्हाचे कारण देऊन वज्रमूठ सभा पुढे ढकलल्याचे सांगितले जात असले तरी मतभेदाचे चटके बसू लागल्याने उन्हाचा आधार घेतला गेला हे उघड आहे.

राष्ट्रीय पक्ष अन् प्रादेशिक पक्ष यांची अस्मिता, अजेंडे वेगवेगळे असतात. एक राष्ट्रीय अन् एक प्रादेशिक पक्ष एकमेकांसोबत संसार करू शकतात; पण दोन प्रादेशिक पक्ष फारकाळ सोबत राहू शकत नाहीत हा अनेक राज्यांमधील अनुभव आहे. महाराष्ट्रातही तेच घडत आहे. तीन पक्षांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी यांची जवळीक अधिक होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची वाढती सहानुभूती, मविआ त्यांच्याच नेतृत्वात पुढे जाणार असल्याचे निर्माण करण्यात आलेले चित्र आणि राष्ट्रवादीच्या व्होट बँकेला उद्धव ठाकरे उद्या हायजॅक तर करणार नाहीत ना ही शंका हे तीन फॅक्टर दुराव्याला सुरुवात करणारे ठरत आहेत. धर्मनिरपेक्षवादी मतदार ही राष्ट्रवादीची व्होट बँक तर हिंदुत्ववादी मतदार ही ठाकरेंची परवापर्यंतची व्होटबँक; पण गेल्या दोन वर्षांत धर्मनिरपेक्ष मतदारांतही ठाकरेंना फॉलोअिंग मिळू लागल्याने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता असू शकते. दोघांमध्ये भविष्यातही सख्य असेलच असे सांगणे कठीण आहे. ५३ आमदारांचा राष्ट्रवादी आणि ४५ आमदारांचा काँग्रेस पक्ष १५ आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्या प्रमाणातच जागा ऑफर करेल. मुख्यमंत्री राहिलेल्या ठाकरेंना उपमुख्यमंत्री पदाकडे नेणारा हा फॉर्म्युला मान्य नसेल. वज्रमूठ ढिली होत जाईल.

Web Title: Article on Sharad Pawar, Ajit Pawar Politics in NCP Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.