यदु जोशी
बऱ्याच लोकांना सध्या प्रश्न पडला आहे की, भाजप-शिवसेना या दोन भगव्या पक्षांची दुश्मनी कुठपर्यंत जाईल? कोरोनाचा कहर जसा टप्प्याटप्प्याने कमी झाला तशी या दुश्मनीची लाट १० मार्चला पाच राज्यांच्या निकालानंतर कमी किंवा जास्त होईल, मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत दोघांतील दुश्मनी कळस गाठेल अन् नंतर ओसरत जाईल हे त्याचं उत्तर आहे. इंग्रजीमध्ये ‘स्नो बॉल इफेक्ट’ अशी एक कन्सेप्ट आहे. तसा उत्तर प्रदेशच्या निकालाचा लगेचचा परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीवर होईल. भाजप-शिवसेनेची जी खुन्नस चालली आहे त्याचा फायदा दोघांपैकी कोणाला होईल माहिती नाही पण, नुकसान महाराष्ट्राचं होत आहे हे मात्र नक्की. एकमेकांवर कुरघोडी करण्यात सत्ताधारी व विरोधक मश्गूल असून सामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाऱ्यावर सोडलंय, हे सध्याचं महाराष्ट्राचं कटू वास्तव आहे.
राजकारणात आधीच्या पिढीकडून सभ्यतेचा कानमंत्र घेत दुसरी पिढी पुढे चालत आली पण, आज ताळतंत्र सुटलं आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवराळ भाषा वापरली जात आहे. भकारांत शिव्यांचा भडिमार होत आहे. कोणत्याही ठाकरेंशिवाय संजय राऊत यांनी शिवसेना भवनात परवा जे शक्तिप्रदर्शन केलं आणि भाजपवर आरोपास्त्र सोडलं त्यामुळे भाजप गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच बॅकफूटवर गेला आहे. आरोप करणाऱ्यांवर आता आरोपांना उत्तरं देण्याची वेळ आली आहे. आरोप टिकतील न टिकतील हा उद्याचा विषय; पण, आतापर्यंत महाविकास आघाडीला घेरणाऱ्या भाजपचा वेळ आता खुलासे करण्यात जाईल पण, त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांवरील कारवाईचं शुक्लकाष्ठ कुठेही कमी होणार नाही. बदल्याचं राजकारण दोन्ही बाजूंनी पेटलं आहे.
ओडिशामध्ये कापालिक साधू असतात. भांग, गांजाने नशा आली नाही तर ते विषारी सापांचा डंख स्वत:ला करवून घेतात. त्या कापालिक साधूंप्रमाणेच संजय राऊत, किरीट सोमय्या आदींना आरोपांची नशा चढली आहे. आज एक बोललं, उद्या त्यापेक्षा भयंकर बोलायचं मग परवा अतिभयंकर आरोप करायचे असं चाललं आहे. असे नेते एकतर हीरो बनतात किंवा स्वत:च्या सापळ्यात अडकत जातात. अमोल काळे लंडनला पळून गेले हे म्हणणं सोपं आहे पण, ते मुंबईतच असतील तर आरोप करणारेच उद्या कचाट्यात सापडतील. संजय राऊत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे वादळी आणि वादग्रस्त बनत आहेत. ते स्वत:कडे ठाकरेपण घेत आहेत असं दिसतं. हे ठाकरेपण त्यांच्याकडे देण्याचं मोठेपण मातोश्री दाखवत आहे.
एरवी खुद्द राज ठाकरेंनासुद्धा असं ठाकरेपण देताना संघर्ष घडला होता. ते राऊत यांना सहज मिळत आहे. ते त्यांच्याकडे किती दिवस राहील माहिती नाही. एक नक्की की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरानंतर आता राज्याच्या तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू होईल. आरोपांची राळ अन् टीकेचा धुरळा खाली बसणार नाही.
विधानसभा अध्यक्षांची निवड यावेळी तरी होईल का?
तिकीट काढलं, गाडीत बसलं अन् गावाला पोहोचलो तरच समजायचं की गाव आलं; तसं काँग्रेसमध्ये असतं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार मिळणार म्हणून गेल्यावेळी खूप हवा झाली पण झालं काही नाही. काँग्रेसला हे पद मिळावं असं मित्रपक्षांनाच वाटत नसल्यानं खोळंबा झालाय असंही बोललं गेलं. आता आगामी अधिवेशनाचा मुहूर्त निघाला आहे. राज्यपालांच्या कचाट्यातून निवडीचा कार्यक्रम सोडवून आणणं, काँग्रेसचा उमेदवार निश्चित करणं अन् मग निवडून आणणं हे सगळं एका दमात जमलं पाहिजे.
गेल्या अधिवेशनापूर्वी याच ठिकाणी लिहिलं होतं की यावेळी काँग्रेसनं अध्यक्षपद पदरात पाडून घेतलं नाही तर काँग्रेसचं सरकारमध्ये फार काही चालत नाही असा त्याचा अर्थ होईल. तेच वाक्य यावेळीही लागू आहे. १० मार्चनंतर काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये उलटफेर होईल, असे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिले आहेत. नानाभाऊ मंत्र्यांच्या गाडीत बसतात की काय? तसं झालं तर घरी कोण जाणार? एखाद्या सिनियर मंत्र्यांला विधानसभा अध्यक्ष करून गेम तर नाही करणार? घोडा-मैदान जवळ आहे. काँग्रेस है, कुछ भी हो सकता है.
आदित्य ठाकरेंचा नंबर त्या उपसरपंचाकडे आहे !!
मंत्री आदित्य ठाकरेंचा मोबाइल नंबर बऱ्याच जणांकडे नसेल पण नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील नांदगावचे उपसरपंच सेवक ठाकरे यांच्याकडे तो आहे. आदित्य नांदगावमध्ये गेले, गावकऱ्यांबरोबर जमिनीवर बसले आणि समस्या जाणून घेतल्या. त्यांनी स्वत:च सेवक यांच्या मोबाइलवर आपला नंबर डायल करून तो सेव्हही केला. हे लोकांचे ऐकणारे ठाकरे दिसतात; फक्त ऐकविणारे ठाकरे नाहीत. पब्लिक कनेक्ट वाढवत आहेत. आधी त्यांची तुलना राहुल गांधींशी करायचे. एका चॅनेलवाल्या मॅडमनी तसा शहाणपणा केला होता. काळ कसा बदलतो बघा !
आज पाचही राज्यातील निवडणूक प्रचारात लोक राहुल गांधींना गांभीर्यानं ऐकत आहेत. आदित्य यांनी त्यांची करवून देण्यात आलेली प्रतिमा कृतीनं बदलवली आहे. पक्षाच्या आमदारांनाही काय हवं नको ते विचारू लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना त्यांच्या नेतृत्वात लढणार अशी बातमी असताना आता २०२४ ची लोकसभा निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात पक्ष लढवणार अशी पुढची बातमी आहे. शिवसेनेचा अन् आदित्य यांचा स्वभाव वेगळा आहे. दोघांपैकी एकाला स्वभाव बदलावा लागेल. शिवसेना बदलली तर तिची ओळख पुसली जाईल. आदित्य यांनाच शिवसेनेसारखं आक्रमक व्हावं लागेल. सेल्फी पॉइंटच्या बाहेर यावं लागेल. संजय राऊत यांच्यासह शिवसेना सांभाळणं जिकिरीचं काम आहे.
(लेखक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत)