डॉ. सुनील कुटे, अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाने ते अभियंता असले तरी त्यांच्या प्रचंड कार्याने ते प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी ठरतील, असे भारतरत्न होते. उद्याच्या भारताला घडविणाऱ्या युवकांसाठी तर त्यांच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.
विश्वेश्वरय्या १०१ वर्षांचे निरोगी आरोग्य जगले. वयाच्या ९८ व्या वर्षीसुद्धा ते सतत कार्यमग्न होते. नियमित व्यायाम न करणे, फास्ट फूड खाणे, जेवण व झोपण्याचे दिनचक्र न पाळणे, तरुण वयात हृदयरोग, मधुमेह व रक्तदाब या आजारांचे शिकार होणे हे आजच्या युवकांचे प्रश्न आहेत. विश्वेश्वरय्यांच्या नियमित व्यायाम, सकस व मोजका आहार आणि शिस्तबद्ध दिनक्रम यातून आजच्या युवकांना शरीर, मन व मेंदूचा उत्कृष्ट विकास कसा करायचा याचे उत्तम उदाहरण डोळ्यांपुढे ठेवता येईल.
चीनमध्ये सध्या ‘बाय लान’ नावाची घातक धारणा युवकांमध्ये पसरली आहे. ही धारणा जगभर झपाट्याने फोफावत आहे. भारतही त्याला अपवाद नाही. ‘बाय लान’ या संकल्पनेत युवक नैराश्याने ग्रासला आहे. अनिश्चितता व संधीचा अभाव याविरुद्ध संघर्ष न करता स्पर्धेतून दूर जाणे व आयुष्यासाठी कोणतेच ध्येय न ठेवणे, स्वतःहून सर्व गोष्टीतून माघार घेणे, दिवसभर मोबाईल व टीव्ही पाहण्याशिवाय काहीही न करणे ही ‘बाय लान’ धारणेची लक्षणे आहेत. चीनसहित अनेक देश व त्यांचे राष्ट्राध्यक्ष युवकांमधील या नवीन अकार्यक्षम धारणेने चिंतित आहेत. भारतातदेखील स्पर्धा परीक्षेत यश न मिळालेले, नोकरी वा उद्योगधंद्यात अपयश आलेले, तरुण वयातच स्व- प्रोत्साहन गमावलेले लाखो युवक ‘बाय लान’चे शिकार होत आहेत. या युवक पिढीसाठी विश्वेश्वरय्यांच्या आयुष्यापासून खूप काही शिकण्याजोगे आहे.
‘बाय लान’प्रमाणेच ‘क्वाएट क्विटिंग’ नावाची धारणा आजकाल युवकांमध्ये फोफावत आहे. यात जेमतेम नोकरी टिकवून ठेवण्यापुरते काम करणे, कुठल्याही कामात पुढाकार न घेता कमीत कमी काम करणे, कुठलीही पूर्वसूचना न देता नोकरी सोडणे या बाबींचा समावेश होतो. विश्वेश्वरय्यांचे संपूर्ण आयुष्यच ‘बाय लान’ व ‘क्वाएट क्विटिंग’ या धारणांना छेद देणारे आहे. त्यांच्या जेवणाच्या व झोपण्याच्या वेळा सूर्योदय-सूर्यास्ताशी निगडित व निसर्गस्नेही होत्या. नियमित व्यायाम, कमीत कमी तसेच सकस आहार व शिस्तबद्ध दिनक्रम त्यांनी आयुष्यभर पाळला. संपूर्ण दिनक्रम मिनिटा-मिनिटांमध्ये बसवलेला असे व ते सर्व वेळा काटेकोरपणे पाळत. विदेशात गेले असताना एक रेल्वे गाडी वेळेवर रद्द झाल्यामुळे तेथे त्यांनी स्टेशनमास्तरला इतके फैलावर घेतले की, खास त्यांच्यासाठी एक डब्याची विशेष गाडी सोडण्यात आली. ठरलेल्या वेळेत पोहोचून विश्वेश्वरय्यांनी आपली बैठकीची वेळ चुकू दिली नाही. नातवाने परीक्षेत चांगले गुण मिळविले म्हणून त्याला रोख बक्षीस देऊन जेवणासाठी घरी बोलविले असता, नातू उशिरा आला म्हणून बक्षिसाची निम्मी रक्कम त्यांनी कापून घेतली होती !
आयुष्याचेच वेळापत्रक चुकलेल्या युवकांना यातून खूप शिकण्याजोगे आहे. मोबाईल व इंटरनेटच्या विळख्यात अडकल्याने आपल्यातील नावीन्यता व सर्जनशील संशोधनवृत्ती गमावून बसलेल्या युवकांनी विश्वेश्वरय्यांच्या संकल्पना अभ्यासाव्यात. धरणांचे स्वयंचलित दरवाजे, वीज न वापरता खालच्या पातळीवरून, वरच्या पातळीवर पाणी नेणारी धुळ्याची पंपरहित पाणीपुरवठा योजना हे त्यांचे नावीन्यपूर्ण सर्जन! व शंभर वर्षांपूर्वी त्यांनी स्वयंचलित दरवाजे या संकल्पनेचे पेटंट घेतले होते. विश्वेश्वरय्यांनी राबविलेल्या पाणीपुरवठा, रस्ते, बांधकाम, धरणे, कालवे, नगरनियोजन उद्योगधंदे व कारखाने उभारणी, पूल बांधणी, इत्यादी शेकडो योजना अभ्यासल्या तर युवकांना राष्ट्रउभारणीसाठी प्रोत्साहन मिळेल. सातत्यपूर्ण वाचन, ज्ञान, व्यासंग, लिखाण, प्रबोधनात्मक व्याख्याने, शुद्ध व सात्त्विक आचरण, प्रामाणिकपणा, शिस्तबद्धता, कार्यमग्नता, मूल्यांची जोपासना, देशहिताचा विचार व त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, निसर्गस्नेही जीवनशैली हे भारतरत्न विश्वेश्वरय्यांच्या जीवनाचे पैलू आजच्या युवकांसाठी आदर्श आहेत. त्यासाठी वेगळी ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी स्किल्स’ शिकण्याची व ‘फाईव्ह ए. एम. क्लब’ वा ‘फाइव्ह ए. एम. मिरॅकल’ वाचण्याची गरज नाही..