नेते हो, नमस्कार.महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय..? कोण कोणत्या पक्षात..? कोण कोणत्या नेत्यासोबत..? आणि कोण कोणत्या विचारांसोबत..? काहीही कळायला मार्ग नाही. शिवसेनाएकनाथ शिंदे यांच्याकडे... धनुष्यबाणही त्यांच्याच हाती... मग उद्धव ठाकरे यांच्या हातात काय..? त्यांचा पक्ष कोणता..?
आता पुढे काय होणार..? शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह दोन्ही शिंदे गटाकडे गेलं. आता उद्धव ठाकरे नवा पक्ष काढणार का..? नवी घटना लिहिणार का..? निवडणुकीला सामोरं जायचं तर पक्षाचं नाव लागेल. पक्षाला चिन्ह लागेल. बाळासाहेबांनी ज्या धनुष्यबाणाची पूजा केली, जी मशाल उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात लोकांच्या मनात पेटवली. ते धनुष्यही जवळ नाही...पेटवलेली मशाल हाती राहील की नाही, माहिती नाही... त्यामुळे आता नेमकं होणार तरी काय..? नाक्या-नाक्यावर चर्चा सुरू आहेत. गटागटांनी लोक निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेत जाऊन न्यायनिवाडा करत आहेत. नेते हो, तुम्हीच काय ते खरं सांगा...
ज्या जनतेने आपापल्या मतदारसंघातून खासदार, आमदार निवडून दिले. त्यांनी नेमका कोणावर विश्वास टाकला होता..? उमेदवारावर की बाळासाहेब ठाकरेंवर..? की भाजप-शिवसेनेवर..? की विकासावर..? शुक्रवारी जो निर्णय आला त्यामुळे नेमका विजय कोणाचा झाला..? शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा..? की ज्या जनतेने या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांचा..? एकदा निवडून दिलं की पाच वर्ष नेत्यांनी कसंही वागावं. कोणासोबतही संसार थाटावा. कोणासोबतही काडीमोड घ्यावा. इतकी मोकळीक तुम्हाला दिली ते चूक की बरोबर..? नेते हो, डोकं भंजाळून गेलं आहे.
आता जर का निवडणुका झाल्या तर कोणाकडे बघून लोकांनी मतदान करायचं..? बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की ४० आमदार आणि १३ खासदारांकडे..? नेमकं शिवसैनिकांनी बघायचं कोणाकडे..? तुम्हाला एकदा निवडून दिलं की तुम्ही कधी एकत्र येता..? कधी भांडता..? आणि पुन्हा कधी एकत्र येता..? ते सामान्य माणसाला काही कळत नाही. मात्र गावागावात, एकाच घरात दोन भावांमध्ये जी भांडणं लागली आहेत, जे वाद पेटले आहेत, ते कोण, कसे मिटवणार..? या सगळ्यांमध्ये जोरदार तर्कवितर्क सुरू आहेत. पहिला म्हणतो, ‘उद्धव ठाकरे यांना शिवसेना सांभाळता आली नाही...’ दुसरा म्हणतो, ‘भाजपच्या बड्या नेत्यांनी शिवसेना फोडली...’ तर तिसरा विचारतो, ‘शिवसेना अशी फोडण्याइतपत परिस्थिती आणली कोणी...? तुम्हाला तुमचा पक्ष नीट सांभाळता आला असता, तर तो आज असा फुटला असता का..?’
उद्धव ठाकरे म्हणतात, ‘शिवसेनेचं नाव चोरलं... धनुष्य चोरलं...’ तर शिंदे गटाचे नेते म्हणतात, ‘मुंबईत मनसेचे सात नगरसेवक चोरून नेले होते की, गिफ्टमध्ये मिळाले होते..?’ निवडणूक आयोग म्हणतो, ‘संघटनात्मक पातळीवर शिवसेनेत फूट पडली आहे. म्हणून शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं गेलं.’ सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट म्हणतो, ‘शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडलेली नाही.’ तर कायदा सांगतो, संघटनात्मक पातळीवर आणि विधिमंडळात उभी फूट पडली तरच पक्ष फुटला असं म्हणता येतं. या सगळ्यात शिंदे गटाचा दावा मान्य केला आणि फूट पडली नाही असं गृहीत धरलं, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेला व्हिप शिंदे गटाला लागू होतो. तो लागू झाला तर १६ आमदार अपात्र होतात. मग ज्या शिंदे गटाला शिवसेना आणि चिन्ह मिळालं, ते सत्तेत कसे राहू शकतील..? असा तर्क तज्ज्ञ मंडळी देऊ लागली आहेत.
नेते हो काय खरं, काय खोटं तुम्हालाच माहिती...नेते हो, जर १६ आमदार निलंबित झाले, तर सरकार बरखास्त होईल. मग राष्ट्रवादीकडून अजित पवार पुढाकार घेतील का..? सरकारमध्ये सहभागी होतील का..? की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल..? तसे झाले तर लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहील. आज जो आनंद आणि आक्रोश दोन्ही बाजूनं दिसत आहे, तो तोपर्यंत टिकेल का..? ४० आमदारांचे काय होणार..? ते कोणाच्या तिकिटावर उभे राहणार..? प्रश्न अनेक आहेत. वेळ मिळाला तर याचे उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला द्या...
जाता जाता : आता शिवसेनेच्या शाखा कोणाकडे जाणार..? शिवसेनेचे ट्विटर हँडल कोण चालविणार..? एकमेकांना गाडण्याची भाषा सुरू झाली आहे. कोण कोणाला गाडणार..? कोण कोणाला तारणार..? तुम्हाला काय वाटतं..? एका ज्योतिषाने सांगितलं आहे की, जून-जुलै महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार... तुम्ही पण एखाद्या ज्योतिषाला विचारून घ्या... काळजी घ्या...- तुमचाच, बाबूराव