प्रा. डाॅ. सुधाकर पाटील, ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ (सेवानिवृत्त)
भारत ‘उष्ण कटिबंधीय’ हवामान वर्गात येतो. निरनिराळ्या महासागरांचा आणि विशेषतः पूर्व व पश्चिम प्रशांत महासागरीय वातावरणाचा भारतीय मोसमी वाऱ्यांवर अतिशय प्रभाव असतो. मोसमी वारे समुद्रांवरून जमिनीवर आल्यानंतर त्यांची तीव्रता, मागून पुरवठा होणाऱ्या सततच्या तीन- चार दिवसांच्या बाष्पपुरवठ्यावर अवलंबून असते. गेल्या दशकातील जागतिक तापमानवाढ ही हवामान दृष्टिकोनातून खूप जास्त झालेली आहे. ज्यामुळे चक्रीवादळांची तीव्रता व संख्या वाढलेली आहे.
महाराष्ट्रातील विविध हवामान विभागांची भौगोलिक व्याप्ती, विशेषतः पर्वतराजींचासुद्धा अंदाजावर परिणाम होतो. नऊ प्रारूपांच्या आधारे वर्तविलेल्या अंदाजामध्ये वापरलेले विविध हवामान घटक हे ५० ते १०० वर्षांच्या सर्वसाधारणवर आधारित असतात. प्रत्यक्षात अलीकडे त्यांच्या वागणुकीत नक्कीच फरक झालेला आहे. अंदाज व्यक्त करतेवेळी तीन दिवसांपूर्वीची वातावरणीय स्थिती लक्षात घेतली जाते; परंतु प्रत्यक्षात पुढील तीन- चार दिवसांत त्यात निश्चितपणे बदल होऊ शकतो. अंदाज प्रसारित करताना केवळ प्रारूपांच्या विश्लेषण फलितांवरच भाष्य करावे लागते. अन्यथा प्रशासकीय कारवाईच्या बडग्याची शास्त्रज्ञांना भीती असते. त्यामुळे त्या विभागातील सद्य:स्थिती लक्षात घेता येत नाही.
उष्ण कटिबंधामुळे पाश्चिमात्य देशांप्रमाणे सरळ सरळ हिशोब आपल्याकडे करता येणे शक्य नाही. त्यामुळे तीन दिवसांच्या आतील किंवा येणाऱ्या पुढील चार- सहा तासांचा असा अंदाज आपल्या देशात देता येणे शक्य नाही. आपल्या देशातील मोसमी वारे कुठे, केव्हा आणि अचानक कसा मार्ग बदतील हे अचूक सांगणे तसे कठीणच आहे. अंदाज अतितंतोतंतपणे लागू होण्याची अपेक्षा ठेवणे ही संकल्पनाच मुळात योग्य नाही. अंदाज हे त्या त्या भागातील जनतेला ‘सूचक’ असतात; परंतु जनता त्यावर अति विश्वास दर्शविल्याचा आभास निर्माण करते आणि अतिउत्साही किंवा जागरूक लोक त्याप्रमाणे कृतीदेखील करतात. परिणामी, बरेच वेळा त्यांचे संपूर्ण शेतीचे गणित बिघडते. सुदैवाने पेरणीचा योग्य कालावधी हा बराच विस्तारित असतो. त्यामुळे योग्य परिस्थितीची खात्री झाल्याशिवाय पेरणीची घाई करणे हे आततायीपणाचे ठरू शकते. शेतकऱ्यांनी आपले पूर्वानुभव व ठोकताळेसुद्धा अवश्य वापरावेत.
काही परिस्थितीत सत्य हे कटू असल्यामुळे त्याचा सर्वसामान्यांवर, शेतकऱ्यांवर, व्यापारी व शासनाच्या आर्थिक धोरणांवरसुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अंदाज वर्तविण्याची भाषा अंशतः बदलावी लागते. हवामान अंदाज विश्लेषणाच्या विविध परिभाषा आणि अंदाजांचे फलित यावर भाष्य करण्याच्या शास्त्रज्ञांच्या परिभाषाच मुळात सर्वसमान्यांना न पटण्याजोग्या असतात ही बाबसुद्धा लक्षात घ्यावी. विभागातल्या दोन- चार शहरात कमीअधिक पाऊस झाला तर अंदाज बरोबर आला, असा अहवाल नोंद केला जातो; परंतु लगतचा भूभाग त्यापासून वंचित राहतो आणि शास्त्रज्ञ व जनता यांच्यात विसंवाद जन्माला येतो.
सारांश रूपाने सांगायचे झाले तर हवामानाचे अंदाज हे फार विस्तृत अशा भूभागांच्या बाबतीत असतात आणि आपण ते आपल्या स्थानिक पातळींशी तुलना करून त्यावर भाष्य करतो. अर्थात या बाबतीत प्रथम चूक ही हवामान विभागाची आहे ती अशी की, याबाबत कोणीच अजिबात भाष्य करीत नाही. उलट या बाबीचे समर्थन करून जनतेमध्ये गोंधळ आणि गैरसमज निर्माण केला जातो. उदाहरणच द्यायचे झाले तर हवामान शास्त्रज्ञ विधान करतात की भारतात जून महिन्यात सरासरी (हा शब्द पण चुकीचाच) समजा १६५ मिमी पाऊस पडतो आणि प्रत्यक्षात त्याच्या ९० टक्के पडला आहे. या विधानाची उपयुक्तता शून्य आहे हे विचाराअंती लक्षात येईल. मुळात असे निरर्थक विधान करू नये हेच योग्य ठरावे. अर्थात, या बाबतीत सर्वसामान्य अनभिज्ञ असतात आणि ही त्यांची चूक नाही ही बाब लक्षात घेतली तर शेतकऱ्यांच्या पेरण्या थोड्या उशिरा होतील; पण पिकांची मोड होऊन शेतकऱ्यांचे पुढील हाल तरी टळतील.