‘अफवाअफवी’च्या खेळातली ‘खपवाखपवी’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 11:28 AM2021-07-08T11:28:51+5:302021-07-08T11:33:21+5:30

बारामतीच्या वाटेत मुनींना पाटी दिसली : ‘अफवा प्रॉडक्शन हाउस’! मनासारख्या फायली हलेना झाल्या की धाकले दादा न् थोरले काकाही इथं येतात असं कळलं!! - 

Article on politics rumor | ‘अफवाअफवी’च्या खेळातली ‘खपवाखपवी’

‘अफवाअफवी’च्या खेळातली ‘खपवाखपवी’

Next


सचिन जवळकोटे, निवासी संपादक, लोकमत, सोलापूर -

भूतलावरचे म्युटेटेड विषाणू शेवटी इंद्र दरबारापर्यंत पोहोचले, ही ‘ब्रेकिंग न्यूज’ कर्णोपकर्णी पसरताच हलकल्लोळ झाला. भाल्यावर अमृत शिंपडून-शिंपडून द्वारपाल थकले. पायातल्या पैंजणांनाही हात लावायला अप्सरा तयार होईनात. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर वस्त्र लपेटलं गेलं. कोण रंभा अन्‌ कोण उर्वशी, कुणालाच काही समजेना. अस्वस्थ इंद्रांनी ताबडतोब नारदांना बोलावून खातरजमा केली. तेव्हा शोध लागला की, ‘विषाणू स्वर्गात पोचले, ही तर केवळ अफवा होती.’ महाराजांनी चिडून फर्मावले, ‘भूतलावर विषाणू पसरताहेत तर आपल्याकडं अफवा. तेव्हा त्वरित ही अफवा शोधून तिला पकडून आणा.’

..मग काय, मुनी भूतलावर पोहोचले. एका कोपऱ्यात रौतराव अन्‌ आशिषभाऊ यांची गुफ्तगू चाललेली. मुलं जशी चिंचोक्यांची वाटणी करतात, तसं ते एकमेकांना काहीतरी वाटत होते. ‘या दोन अफवा तुमच्याकडं ठेवा. उरलेल्या तीन माझ्याकडे. एक दिवस मार्केटमध्ये तुम्ही खपवा. दुसऱ्या दिवशी मी खपवतो.’ असं रौतांनी सांगताच शेलार खूश होत म्हणाले, ‘होय.. होय.. तुमच्या अफवेमुळं पटोले नाना टेन्शनमध्ये येतील तर आमच्या अफवेमुळं थोरले काका डिस्टर्ब होतील.’

त्यांच्या हातातल्या अफवेवर झडप घालण्यासाठी मुनी पुढं सरसावले, मात्र तोपर्यंत आपापल्या खिशात या अफवा टाकून दोघेही दोन वेगवेगळ्या दिशेला गायब झाले. या ‘अफवाअफवी’च्या खेळात कोण कुणाला ‘खपवाखपवी’ करतंय, हे मुनींना काही समजलंच नाही. ते पुढे निघाले. वाटेत रामदास भेटले. मंत्रिमंडळ विस्तारात गच्छंतीच्या अफवेमुळं तेही जरा शांतच वाटले. मुनींना पाहताच त्यांना नवीन कविता सुचली, एकही खासदार नसताना मी कायमचाच मंत्री.. 
आतापर्यंत कैक अफवा पचविल्या, 
आता खातो नागपूरची संत्री!
सरकार कुणाचंही येवो, हे महोदय लाल दिव्याच्या गाडीत फिरतात कसे..? अशी कोणती अफवा यांच्याकडे आजपावेतो शाबूत आहे, या प्रश्नाचं उत्तर काही मुनींना सापडलं नाही.
ते अफवेच्या शोधात पुढं सरकले. त्यांना देवेंद्र नागपूरकर भेटले. 
‘तुम्हाला अफवा दिसली का हो?’ मुनींनी विचारताच डोके खाजवून ते एकच वाक्य बोलले, ‘दीड वर्षापूर्वी पहाटेच्या साखरझोपेत एकदा दिसली होती होऽऽ. त्यानंतर तिनं जो चकवा दिलाय की बस्स्‌’. 
नारद चमकले. गेल्या दीड वर्षात रोज एका अफवेचं पिल्लू सोडणाऱ्या नेत्यांच्या चतुरपणाला दाद देत ते मातोश्रीवर गेले.
‘तुम्ही म्हणे गेल्या महिन्यात दिल्लीला जाताना रिकामे गेला होता. येताना मात्र अफवांची करंडी भरून आणलीत. खरंय का?’ -  ‘उद्धों’नी नारदांचा प्रश्न ऐकून न ऐकल्यासारखं केलं. नेहमीप्रमाणं चेहऱ्यावरची एक रेषाही न हलवू देता ते एवढंच म्हणाले, ‘मी नाही आणली हो, दिल्लीकरांनी नंतर हळूच पाठवून दिली.’
हे ऐकून मुनी घाईघाईनं म्हणाले, ‘कुठाय ती? द्या बघू मला,’ 
तेव्हा नार्वेकरांनी त्यांना नीट समजावून सांगितलं, ‘अहो, आमचे साहेब दिल्लीवरून आल्यानंतर दोन-तीन वेळा थोरले काका बारामतीकर वर्षा बंगल्यावर येऊन गेले. त्या वेळी त्यांनी तिची तुकड्या-तुकड्यांत पार विल्हेवाट लावून टाकली.’ 
अखेर मुनी थेट बारामतीत पोहोचले. वाटेत त्यांना एक पाटी दिसली. ‘अफवा प्रॉडक्शन हाउस’. मुनींच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तिथल्या वॉचमननं सांगितलं, ‘या कंपनीचे दोन मालक. थोरले काका अन्‌ धाकटे दादा. सरकारमध्ये मनासारख्या फायली हलेना झाल्या की दादा या कंपनीत येतात. कधी-कधी मूड आला की काकाही यातले काही प्रॉडक्टस्‌ घेऊन दिल्लीला जातात. तिथं विरोधकांच्या मीटिंगमध्ये सर्वांना ते वाटतात.’ 

‘पण मग ही शेजारची नवी बिल्डिंग कशाची?’-  मुनींच्या गोंधळलेल्या प्रश्नावर वॉचमन गालातल्या गालात हसला, ‘आता ही नवीन कंपनी सुरू केलीय काकांनी. अफवा डिस्ट्रॉय हाउस. रोज निर्माण होणाऱ्या अफवा गाडून टाकण्यातच आमच्या दोन्ही मालकांचा दिवस चाललाय. लय बिझी हायतीऽऽ दोगं बी आजकाल.’ 
नारायणऽऽ नारायणऽऽ 
sachin.javalkote@lokmat.com
 

Web Title: Article on politics rumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.