कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे तरुण पिढीच्या भाषेत 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे समस्त मानवी समूहापुढे मोठे गंभीर संकट आले आहे, असे मानणारे अनेक मान्यवर नुकतेच इंग्लंडमध्ये एआय सेफ्टी समिटच्या निमित्ताने एकत्र आले. इंग्लंडकडे या परिषदेचे यजमानपद होते. ब्लेचली पार्क नावाची जागादेखील यासाठी निवडण्यात आली होती. याच ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनीच्या संदेशवहनातील एन्जिमा कोडची फोड करताना पहिल्या संगणकाचा पाया घातला गेला.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मशीनला मानवी मेंदू जोडण्याचा प्रकार आणि आताचा धोका संगणक नावाच्या मशीनमुळे निर्माण झाला आहे. अमेरिका, चीन, भारतासह विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रमुख मानले जाणारे जगभरातील अठ्ठावीस देश तसेच युरोपियन महासंघ या मंथनात सहभागी झाले. त्यातून जे मुद्दे समोर आले त्यावरून ब्लेचली जाहीरनामा जारी करण्यात आला. ही चर्चा एकप्रकारे सगळे जग जशी हवामान बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंगवर न चुकता नियमितपणे गंभीर चिंता करते आणि प्रत्यक्षात काहीही करत नाही, त्याची आठवण करून देणारी होती. हा नकारार्थी सूर यासाठी की, अजून 'एआय'मुळे नेमकी कोणती संकटे येणार आहेत, याबद्दल बऱ्यापैकी संदिग्धता आहे. म्हणूनच उपाय काय शोधायचे हेदेखील निश्चित नाही.
याचा अर्थ असा नव्हे की, मुळात 'एआय'मुळे काही धोके नाहीतच, त्यापैकी पहिला व प्रमुख धोका आहे तो मानवी क्षमतांपुढे या तंत्रज्ञानाने प्रचंड आव्हान उभे केले आहे. मशीनला मेंदू मिळाला आणि त्या आपल्या मगदुराप्रमाणे वागू लागल्या तर माणसे अडचणीत येतीलच. शिवाय, मानवी श्रम कमी होतील. त्यामुळे नोकऱ्या जातील. अर्थात हे सध्यातरी अंदाजच आहेत. कारण, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी प्रचंड प्रमाणात डेटा लागतो आणि तो संकलित करण्यासाठी जे मानवी श्रम लागतील, त्यामुळे कदाचित नव्या नोकऱ्याही निर्माण होतील.
उदाहरणार्थ, प्रादेशिक भाषांमधील व्यवहारासाठी लागणारा डेटा गोळा करण्याच्या क्षेत्रात केवळ भारतात किमान दहा लाख लोक लागतील आणि ते लोक फार शिक्षित असायलाच हवेत, असे अजिबात नाही. त्याशिवाय महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, हे तंत्रज्ञान अजून बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. गुगलने ताब्यात घेतलेल्या डीपमाइंडचे सहसंस्थापक मुस्तफा सुलेमान यांनी या परिषदेतच स्पष्ट केले की, वर्षभरापूर्वी बाजारात आलेल्या चॅटजीपीटीसह सध्याचे एआय अॅप्लिकेशन्स जितके दाखविले जातात तितके धोकादायक नाहीत. टेस्ला, एक्स, स्पेसएक्स यासारख्या बहुचर्चित कंपन्यांचे सीईओ एलन मस्क यांनी मात्र हा धोका मोठा असल्याचे सांगताना अशा प्लॅटफॉर्मचे यापुढचे अवतार मात्र दहापट किंवा अगदी शंभरपट धोकादायक असतील, असा दावा केला.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी हा मुलभूत मानवी हक्क तसेच लोकशाही व्यवस्थेला धोका असल्याचे सांगितले. यजमान इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक अर्थातच अधिक उत्साही आहेत. ही परिषद आयोजित करण्याआधीच इंग्लंडने ओपन एआय, गुगल डीपमाइंड व ॲन्थ्रोपिक या कंपन्यांसोबत एक करार केला आहे. त्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील कोणतेही नवे संशोधन या कंपन्या इंग्लंडला आधीच कळवतील, असे ठरले आहे. ज्या उत्साहाने सुनक, हॅरिस व मस्क या परिषदेत बोलले आणि नेहमीप्रमाणे चीनने आपले पत्ते उघड केले नाहीत, त्यावरून एक अंदाज बांधता येतो की, या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रावर वर्चस्वाची नवी लढाई जगात सुरू झाली आहे. ही स्पर्धा कशी असेल, तिला लढाईचे स्वरूप येईल की नाही, याबद्दल लगेच काही सांगता येणार नाही.
तथापि, हवामान बदलाचा हवाला देऊन आधी म्हटल्याप्रमाणे विकसित बडे देश आणि विकसनशील, अविकसित देश ही संपत्तीमधील वैश्विक दरी या बौद्धिक संपत्तीच्या वर्चस्वामध्येही नक्की अनुभवाला येईल. कार्बन किंवा इतर हरितवायूंच्या उत्सर्जनाच्या मुद्दयावर जागतिक महासत्ता बोलतात एक व करतात दुसरेच असे जे अनुभवाला येते, तसाच प्रकार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा विकास, विस्तार व चांगल्या- वाईट परिणामांबाबत अनुभवास आला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मानवी समुदायापुढील अशा संकटांच्या आणि त्यावर मात करण्याच्या विकसित जगाच्या व्याख्या वेगळ्या असतात. भूक, दारिद्र्य, अनारोग्य, निरक्षरतेचा सामना करणाऱ्या गरीब देशांच्या समस्या वेगळ्या असतात. ब्लेचली जाहीरनामा म्हणूनच सध्या तरी ढोबळ आणि संदिग्ध ठरतो.