- डॉ. रामचंद्र देखणेपरमेश्वराच्या सौंदर्यवादी सृजनशक्तीचा अविष्कार म्हणजे हे सुंदर विश्व तर मानवाच्या सौंदर्यवादी सृजनशक्तीचा अविष्कार म्हणजे कला होय. विश्व, निसर्ग, परिसर, पशुपक्षी, वेलीफुल, इंद्रधनुष्य त्यातील रंग तसेच पक्ष्यांचे गाणे, निर्झराचे झुळझुळणे, पानाफुलांचे डोलणे आणि मोराने पिसारा उंचावून नाचणे. हे सारे माणसाने पाहिले. त्यातूनच मानवी कलेची अभिव्यक्ती झाली आणि माणसाला निसर्ग कळला. परमेश्वर समजण्यासाठी परमेश्वराने निसर्ग जन्माला घातला आणि निसर्ग समजण्यासाठी कला, कलावंत कलेच्या माध्यमातून आपला आत्माच आपल्यासमोर ठेवत असतो.एक राजा घोड्यावर बसून रस्त्याने जात होता. वाटेत एक झोपडी लागली. तिच्या दारात एक भिकारी उभा होता.राजाला पाहताच तो पुढे आला आणि गयावया करून भिक्षेचे पात्र पुढे केले. राजा म्हणाला, ‘‘सारखे सारखे काय रडगाणे गातोस. आता मी सुद्धा दारात आलोय.मला काही देणार नाहीस का?’’ त्याने आपल्या कटोऱ्यातील पाच दाणे राजाला दिले आणि भीक मागण्यासाठी गावात निघून गेला. राजाने काही न देता माझ्याकडूनच मागितले, असे म्हणत नशिबाला दोष देऊ लागला. परत आल्यावर पाहिले तर झोपडीच्या दारापुढे धान्याचे पोते होते. त्याने ते जमिनीवर ओतले तर त्यात पाच सुवर्णमुद्रा होत्या.राजानेच हे पोते पाठवले हे त्याने ओळखले आणि पुन्हा नशिबाला दोष देऊ लागला की, मी त्याला पाचच दाणे दिले तर त्याने मला पाच सुवर्णमुद्रा दिल्या. मी जर त्याला कटोºयातले सगळेच दिले असते तर. कलावंत हा मोठा दाता आहे. तो आपल्या कटोºयातील सर्व काही रसिकांसाठी ओतत असतो आणि रसिकत्वाचं दान घेऊन तृप्त होत असतो. निसर्गानेही माणसाला भरभरून दिले आहे.कलावंताने तर कलेच्या माध्यमातून त्याचा आत्माच उभा केला आहे. खरं तर निसर्ग हीच एक अद्भूत कला आहे आणि त्यातील स्वाभाविक नैसर्गिकता हाच कलावंत आहे. तो रसिकांपुढे कटोरा रिता करण्यासाठी उभा आहे. माणूस निसर्गापासून दूर दूर जातो आहे. म्हणून कलेच्या स्वाभाविक अभिव्यक्तीला मुकतो आहे.
कलावंताचा कटोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:18 AM