मिलिंद कुलकर्णीराजकीय नेते आणि कलावंत यांच्यात साम्यस्थळे खूप आहेत. दोघेही उत्कृष्ट अभिनय, वक्तृत्व, लेखन याद्वारे तमाम रसिकांचे मोठे रंजन करीत असतात. त्यामुळे या दोघांचा एकमेकांच्या क्षेत्रातील वावरदेखील सहज, उत्स्फूर्त असतो. राजकीय मंडळी ही कलावंत म्हणून छोट्या, मोठ्या पडद्यावर, रंगमंचावर अवतरतात तर पडद्यावरील कलावंत राजकीय व्यासपीठावरुन भूमिका वठवतात.भारतीय राजकारणात अशी खूप उदाहरणे आहेत. अर्थात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर दोन-तीन दशके स्वातंत्र्य चळवळ, देशाची उभारणी हे उद्दिष्ट ठेवून कलावंत मंडळी राजकीय लोकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाली होती. दोघांमध्ये फारसे अंतर नव्हते. राजकीय पक्षांमध्ये कलावंतांचे मोठे स्थान होते. विशेषत: साम्यवादी, समाजवादी पक्षांमध्ये ते पूर्वीही होते आणि अलिकडे प्रमाण कमी असले तरी आहेच. संयुक्त महाराष्टÑाच्या आंदोलनात पहिल्यांदा राजकीय मंडळी आणि कलावंतांमध्ये संघर्ष बघायला मिळाला. आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, निळू फुले यांच्यासारखे कलावंत सरकारच्या विरोधात उभे ठाकले होते. हे चित्र नंतर आणीबाणीच्यावेळी पुन्हा एकदा दिसून आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रयत्नाला त्यावेळी कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राने मोठा विरोध केला. एखादी कलाकृती, चित्रपट, पुस्तकाला समूहपातळीवर विरोध होण्याच्या घटना वारंवार घडत असतात, यावेळी संख्येने कमी असले तरी कलावंत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या अतिक्रमणाला विरोध करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावरुन कलावंतांनी केलेली पुरस्कारवापसी मोठा चर्चेचा विषय ठरली होती.एन.टी.रामाराव, करुणानिधी, जयललिता, अमिताभ बच्चन, गोविंदा, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, जया बच्चन, जयाप्रदा, स्मृती इराणी असे अनेक कलावंत राजकारणात आली, त्यापैकी काही यशस्वी झाली तर काही अपयशी ठरली. कलावंतांचा सन्मान करण्यासाठी राष्टÑपती त्यांना राज्यसभेत नियुक्त करीत असतात. लता मंगेशकर, वैजयंतीमाला, रेखा, जावेद अख्तर यांच्यासारख्या कलावंतांनी ही भूमिकादेखील उत्तमपणे वठवली. पद्म पुरस्कारांनीदेखील या कलावंतांना गौरविले जाते. केंद्र व राज्य शासनाचे वेगवेगळे पुरस्कार, तसेच कला, साहित्य व सांस्कृतिक विषयाशी निगडीत समित्यांवर स्थान देऊन त्यांचा सन्मान केला जात असतो.राजकीय मंडळी पाच वर्षे उत्तम अभिनय करुन विकासाचा आभास निर्माण करण्यात यशस्वी तर ठरतात, परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात त्यांना कलावंतांची मदत घ्यायची आवश्यकता भासते. यामागे बहुदा हेच कारण असावेच. पाच वर्षातील त्यांचा अभिनय पाहून जनता वीटलेली असते. आभास आणि वास्तव यातील फरक कळलेला असतो. म्हणून चवपालट सारखे खऱ्या कलावंताला उभे करुन पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जात असावा. किंवा राजकीय मंडळींची लोकप्रियता खालावत चालली की, कलावंतांच्या लोकप्रियतेचा आधार घ्यावा लागतो, असेही म्हणता येईल. पूर्वी निवडणूक काळात कलावंत प्रचारासाठी मैदानात उतरायचे. आता निवडणूक पूर्व तयारी म्हणून वेगवेगळ्या स्पर्धा, मेळावे, भूमिपूजन, उद्घाटने आयोजित करुन कलावंतांना बोलावले जात आहे.दोन्ही क्षेत्र एकमेकांशी निगडीत असल्याने बहुदा ऋणानुबंध कायम असावा.
कलावंत आले धावून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:36 PM