- वीणा जामकर (अभिनेत्री)
मी आविष्कार संस्थेमध्ये सलग चार-पाच वर्षे काम केले आणि आता ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडेकाकांशिवाय आविष्कारची कल्पनादेखील करू शकत नाही. निर्मिती सूत्रधार म्हणून खूप मोठी जबाबदारी त्यांनी निभावली. नाटक मोठे असो वा छोटे... कलाकार-दिग्दर्शकांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहायचे. प्रायोगिक रंगभूमीसाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले, त्यांच्यासारख्या व्यक्तीचा सहवास लाभला. त्यांच्यासोबत काम करता आले. त्यांच्याकडून शिकता आले हे माझे भाग्य आहे.प्रदीर्घ कारकीर्द असलेल्या काकांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. त्यांचे असणे हेच आम्हा कलाकारांसाठी खूप महत्त्वाचे असायचे. काकडेकाकांची जागा अनन्यसाधारण होती. ते प्रचंड झोकून देऊन काम करायचे. ऊर्जेचा स्रोत होते. त्यांच्यासोबत काम करतानाच्या असंख्य आठवणींचा हृद्य ठेवा माझ्याकडे आहे. आम्ही कोलकात्याला ‘जंगल मे मंगल’ या नाटकाच्या प्रयोगासाठी जात होतो. काकांना क्रिकेटची खूप आवड. त्यामुळे पूर्ण प्रवासात ट्रान्झिस्टरवर ते क्रिकेटची कॉमेंट्री ऐकत होते आणि प्रवासादरम्यान ट्रान्झिस्टरला चांगली रेंज मिळावी म्हणून स्टेशनलाही उतरायचे. आपल्या संघाने चौकार मारला किंवा कोणाची विकेट काढली, की अगदी लहान मुलांसारखे नाचून त्यांचा आनंद ते साजरा करत. त्यांच्यातले लहान मूल सतत डोकावत राहायचे आणि वयाच्या ७५ व्या वर्षी काकांचा हा उत्साह पाहून आम्हालाही लाजायला व्हायचे. त्यांच्याकडे पाहूनच आपला संघ हरलाय की जिंकलाय, हे कळायचे.काकडेकाकांनी केलेल्या सर्व नाटकांचे डॉक्युमेंटेशन केले, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक नाटकाचे व्हिडीओ, कात्रणे जमा करणे, ती नीट जतन करून ठेवणे हे काम काका सातत्याने करीत असत. आविष्कारची जागा तुलनेने कमी होती. मात्र तिथेही सगळे त्यांनी व्यवस्थित, सुरक्षित ठेवले होते. ते कायम कुणाच्याही मदतीला धावून यायचे. त्यांचा स्वभाव अगदी मृदू होता. पाहताक्षणी जरी ते कठोर वाटले, तरी ते कधी कोणावर रागावल्याचे, ओरडल्याचे आठवत नाही. एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीमध्ये त्यांनी कधी लुडबुड केली नाही, त्या-त्या व्यक्तीला काम करताना ते पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे. तेवढेच ते आपल्या कामाविषयी अत्यंत जागरूक असायचे. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर त्यांचे पूर्ण लक्ष असे. मुंबई, पुण्यात कुठेही काम असेल तरी त्यांचा उत्साह तरुणाईला लाजवेल, असा असायचा. मी त्या वेळी वसतिगृहात राहायचे. त्या वेळी रात्री नऊनंतर तिथे जाण्यास मनाई होती. नाटकाचे प्रयोगच उशिराने संपायचे. त्यामुळे मग आता कुणाकडे राहायचे, असा प्रश्न कायम माझ्यासमोर उभा राहायचा. त्याप्रसंगी, मग नाटकातील सहकलाकारांकडे राहण्यास सुरुवात केली. पण मग हळूहळू सर्व सहकलाकारांच्या घरी राहून झाले आणि सारखे-सारखे सहकलाकारांच्या घरी जाणे बरे दिसत नाही, या भावनेतून एक दिवस माझ्यासमोर आता कुणाकडे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी काकडेकाका म्हणाले, विचार कसला करतेयस, माझ्या घरी चल. त्यानंतर प्रत्येक प्रयोगानंतर मी काकांच्या घरी जाऊन राहू लागले. त्या वेळी अत्यंत आपुलकीने घरीही ते काळजी घ्यायचे. दुसऱ्या दिवशी निघताना ते आवर्जून चहाचा आग्रह करत. स्वत: दूध वगैरे आणून बनवलेला चहा एकत्र घेतल्याशिवाय घरातून जाऊ द्यायचे नाहीत.ज्या क्षेत्राला ग्लॅमर नाही, ते काम सहजासहजी करण्यास कुणी धजावत नाही. काकांचे कामही तसेच होते. त्यांच्या कामाला ग्लॅमर नव्हते. त्यांचा चेहरा समोर यायचा नाही. मात्र त्याची तसूभरही तमा त्यांनी कधी बाळगली नाही. सतत पडद्यामागे ते कार्यरत राहिले. एखादी कलाकृती उभी करण्यासाठी आपण किती कष्ट घेतले आहेत, हे सांगण्याचा - त्यातून प्रसिद्धीचा सोस त्यांनी कधी बाळगला नाही. इतकी वर्षे आविष्कार संस्था उभी आहे. कारण त्यामागे काकडेकाकांसारखी माणसे, त्यांची अविश्रांत मेहनत आहे. माझ्यासारख्या कलाकारांची वये नाहीत, तेवढा काकांच्या कारकिर्दीचा प्रदीर्घ काळ आहे. त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी त्यांची आणि माझी अखेरची भेट झाली होती. त्यामुळे त्यांच्या सहवासाची तीच अखेरची आठवण माझ्याकडे आहे. गेला महिनाभर ते आजारी होते. खरे मात्र तरीही शेवटच्या प्रयोगाच्या वेळीही काकांनी फोनवरून सेट नीट लागला ना? सगळी तयारी झालीय ना? याची आवर्जून विचारपूस केली होती. म्हणजे आयुष्याच्या उत्तरायणातही त्यांच्यातील नाटकाप्रतिची तळमळ कमी झाली नव्हती...