शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

आर्वीचा कत्तलखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 10:07 AM

गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्याजवळ आर्वी येथे उघडकीस आलेले गर्भपाताचे रॅकेट मानवतेला काळिमा फासणारे आहे.

गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्याजवळ आर्वी येथे उघडकीस आलेले गर्भपाताचे रॅकेट मानवतेला काळिमा फासणारे आहे. देवदूत समजले जाणारे डॉक्टर केवळ पैशासाठी किती नृशंस होतात, मुलीचे पाऊल वाकडे पडले, गर्भधारणा झाली, कुटुंबाची अब्रू चव्हाट्यावर टांगली गेली म्हणून गर्भगळीत झालेल्या अगतिक पालकांचा कसा गैरफायदा घेतला जातो, हेदेखील या प्रकरणाने स्पष्ट झाले आहे. धक्कादायक म्हणजे डॉ. रेखा व डॉ. नीरज कदम यांच्या या हॉस्पिटलमध्ये अगदी गोबरगॅसच्या खड्ड्यांमध्येही गर्भातील जिवांच्या कवट्या व हाडांचा चुरा आढळून आला. या कदमांच्या कुटुंबाला चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा डॉक्टरी पेशाचा वारसा आहे.

नीरज यांचे वडील कुमार व आई शैलजा दोघेही डॉक्टर. त्यातही आई डॉ. शैलजा या वर्धा व अमरावती जिल्ह्यांची सीमा असलेल्या वर्धा नदीच्या डाव्या तीरावरच्या भागात आधीच्या पिढीतल्या नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ. कदम कुटुंब राजकीयदृष्ट्याही प्रभावी मानले जाते. नीरज कदम यांचे आजोबा जगजीवनराव ऊर्फ नानाजी कदम तीनवेळचे आमदार व १९७१ चे लोकसभेचे खासदार.  त्यांच्या कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीने ग्रामीण भागात गर्भपाताचा गोरखधंदा  का उघडावा, हा प्रश्न कोणालाही पडेल. अल्पवयीन मुला-मुलींची प्रेमप्रकरणे नवी नाहीत. लैंगिक आकर्षणासाठी कारणीभूत सिनेमा, नट-नट्यांचे गॉसिप, विवाहबाह्य संबंधांभोवती फिरणाऱ्या टीव्ही मालिका वगैरेंसोबतच स्मार्टफोन खेड्यापाड्यात पोहोचला असल्याने अगदी शाळकरी वयातच मुला-मुलींचे शारीरिक संबंध आता सवयीचे झाले आहेत.

मुलीच्या अब्रूचा प्रश्न असल्याने समाजातील चारचौघांना मध्यस्थ टाकून कसेबसे प्रकरण निस्तरणे व शक्य तितक्या लवकर मुलीचे लग्न लावून देणे, असा मधला मार्ग त्यावर पालक शोधतात. दरवेळी ते जमतेच असे नाही. त्यामुळेच गर्भधारणा, बलात्काराच्या तक्रारी, कोर्टकज्जे आदी प्रकार वाढल्याचे दिसते. आर्वीचा कत्तलखानाही अशाच प्रकरणातून चव्हाट्यावर आला. अल्पवयीन मुला-मुलीच्या प्रेमसंबंधातून मुलीला गर्भधारणा झाली.  

मुलीची बदनामी होईल तेव्हा गर्भपात करून टाकू, खर्च आम्ही करू, असा प्रस्ताव मुलाच्या आई-वडिलांकडून देण्यात आला. त्यानुसार गर्भपातासाठी कदम यांचे हॉस्पिटल गाठले गेले. ऐंशी हजारांत गर्भपाताचा सौदा ठरला. तीस हजार अगाऊ देण्यात आले. त्याचदरम्यान मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली व डॉ. रेखा कदम तसेच मुलाच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली. नंतर दोन परिचारिकांना अटक झाली.  संबंधित मुलीच्या विल्हेवाट लावलेल्या गर्भाचा शोध घेतला जात असताना, हॉस्पिटलच्या परिसरात आधी पाच मानवी कवट्या, तर नंतर गोबरगॅसच्या खड्ड्यात अकरा मानवी कवट्या, गर्भाच्या रूपातील अर्भकांची काही हाडे पोलिसांना आढळून आली.

बहुतेक गर्भ पूर्ण वाढ झालेले, शरीरात हाडे तयार झालेले असावेत. कायद्यानुसार अतिआवश्यक असेल तरच मान्यताप्राप्त केंद्रांवरच गर्भपात करता येतो. आधी वीस आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा गर्भ काढून टाकायचा असेल, तर मान्यताप्राप्त डॉक्टरची परवानगी घ्यावी लागायची. वर्षभरापूर्वी हा कालावधी चोवीस आठवडे करण्यात आला. डॉक्टरांनी परवानगी नाकारली, तर न्यायालयात जाता येते. बलात्काराच्या प्रकरणांमध्ये मात्र कालावधीचा विचार न करता न्यायालयाची परवानगी लागतेच. बलात्कार ठरू शकेल अशा प्रकरणामुळे आर्वीतील गर्भपाताचे रॅकेट उघडकीस आले असले तरी, सगळेच गर्भपात तशा प्रकरणांचेच असतील, असे मानता येणार नाही. कारण, गुरुवारी सापडलेल्या अकरा कवट्यांपैकी नऊ कवट्या मुलींच्या गर्भाच्या असाव्यात, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. वर्धा, अमरावती, नागपूर अशा आजुबाजूंच्या शहरांमध्ये स्त्रीभ्रूणहत्येच्या उद्देशाने केले जाणारे गर्भपात उघडकीस येतील, ही भीती मुलींना गर्भातच मारून टाकणाऱ्या मंडळींना असते.

लिंगनिदान चाचण्यांबद्दल प्रशासन सतर्क आहे. सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर संगणकीय ट्रॅकर बसविण्यात आले आहेत. तेव्हा, आर्वीसारखे आडवळणाचे गाव तर या कतलींसाठी निवडले गेले नाही ना?, याचा तपास करणे गरजेचे आहे. राज्यभर गाजलेल्या आधीच्या प्रकरणांमध्येही बीड जिल्ह्यातील परळी, सांगलीजवळचे म्हैसाळ अशी मुख्य शहरांपासूनची दूरची गावेच नराधम डॉक्टरांनी व मुलीचा गर्भातच जीव घेणाऱ्या माता-पित्यांनी निवडली होती. तेव्हा, आर्वी प्रकरणाचा तपास बेकायदेशीर गर्भपातापुरता मर्यादित राहू नये. कोवळ्या कळ्यांच्या गर्भातच कतलींच्या दृष्टीनेही गंभीर तपास व्हावा.