शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री -जवाहरलाल दर्डा आणि माझ्यात एका पिढीचं अंतर असलं तरी, दर्डाजींच्या वागण्यात, त्यांच्या सामाजिक कामात आणि राजकारणात हे अंतर आम्हाला कधी जाणवलं नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करणारा हा मोठा दिलदार नेता होता. १९७२ साली वसंतराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात माझा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. त्याचवेळी दर्डाजी विधान परिषदेमध्ये सदस्य होते. मी राज्यमंत्री झाल्यावर माझं अभिनंदन करायला ते आले होते. त्यावेळी ते विधानपरिषदेचे सदस्य होतेच, पण वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या नागपूरच्या दैनिक लोकमतचे संस्थापक संपादकही होते. मी आणि विठ्ठलराव गाडगीळ प्रदेश काँग्रेसचे सचिव होतो आणि दर्डाजी कोषाध्यक्ष होते. पक्षात असो, सरकारात असो... त्यांच्यावर कितीही टीका झाली तरी कोणत्याही वादात ते पडले नाहीत. उत्तरं देत बसले नाहीत. ‘आपलं काम हेच आपलं उत्तर आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करत राहायचं’, हीच त्यांची भूमिका होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कारावास भोगलेल्या दर्डाजींची विचारांशी पक्की बांधिलकी होती. पुढे स्वातंत्र्यानंतर लोकनायक बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली चालणारं ‘लोकमत’ नावाचं पाक्षिक दर्डाजींनी घेतलं, त्याचं साप्ताहिक केलं आणि पुढे दैनिक केलं. एका छोट्या गावातलं साप्ताहिक राज्यपातळीवर यशस्वी करून दाखवणं, हे काम सोपं नाही. सर्व जाती, धर्मांना आणि प्रश्नांना या दैनिकानं व्यासपीठ दिलं. माझ्या मंत्रिमंडळात दर्डाजी दोन वेळा होते. उद्योग खात्याची जबाबदारी सांभाळताना दर्डाजींनी महाराष्ट्राच्या आजच्या विकसित उद्योग वैभवाचा पाया घातला. नागपूरजवळची बुटीबोरी ते उद्योगमंत्री असतानाच विकसित व्हायला सुरुवात झाली. आरोग्य मंत्री असताना त्यांनी पाठपुरावा करून, यवतमाळसारख्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं. उच्च शिक्षणाच्या सुविधा ग्रामीण भागात गेल्या पाहिजेत, हा आग्रह दर्डा यांनी धरला आणि तो निष्ठेने पूर्णत्त्वाला नेला. त्यांच्यावर जी - जी म्हणून जबाबदारी दिली गेली, ती अत्यंत प्रभावीपणे त्यांनी पार पाडलेली आहे. मंत्रिमंडळातली महात्वाची खाती असोत, काँग्रेस पक्षाचं कोषाध्यक्षपद असो किंवा काँग्रेसला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजे १९८५ साली, सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती ती म्हणजे काँग्रेसच्या या शताब्दी अधिवेशनात लाखो लोकांच्या तीन दिवसांच्या भोजनाची व्यवस्था करणं. फार जिकिरीचं काम होतं; परंतु अतिशय मेहनतीने, सुयोग्य नियोजन करून त्या अधिवेशनातलं सर्वोत्कृष्ट काम दर्डाजींनी पार पाडलं. १५-२० वर्षे सरकारात राहून वर्तमानपत्र चालवायचं, ही सोपी गोष्ट नव्हती. प्रसंगी सरकारच्या विरोधातील बातम्या देण्याचं धाडसही त्यांनी दाखवलं. सरकारात असताना ‘लोकमत’च्या संपादकीय कामात त्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे लोकमत हे अग्रगण्य वर्तमानपत्र होऊ शकलं. मंत्रिमंडळातील माझे सहकारी, निष्ठावंत राजकारणी, पुरोगामी पत्रकार, सामान्य माणसांबद्दल आत्मीयता बाळगणारा नेता म्हणून दर्डाजींचं कर्तृत्व चौफेर होतं. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अनेक कार्यक्रम होतील; परंतु माझ्या दृष्टीने राजकारणातली सहजता आणि नम्रता, दैनिक लोकमत, नागपूरजवळची बुटीबोरी औद्योगिक वसाहत, यवतमाळचं मेडिकल कॉलेज हीच दर्डाजींची सर्वात मोठी स्मारकं आहेत.
एका पिढीचं अंतर; निष्ठावंत राजकारणी म्हणून दर्डाजींचं कर्तृत्व चौफेर होतं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 11:22 AM