यदु जोशी
भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात ‘जाहीर पक्षप्रवेश’ असे लिहिलेला एक बोर्ड कायमस्वरूपी लावण्यात आला आहे. या ‘कॉन्फिडन्स’ला मानलं पाहिजे. येत्या महिनाभरात या बोर्डच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेश करीत असल्याचे अनेकांचे फोटो झळकू शकतात. बरीच धक्कादायक नावे रांगेत आहेत. बडा काँग्रेस नेता भाजपमध्ये जाणार असे भाकित इथे यापूर्वीच केले होते. महायुतीतील जागावाटपाची चर्चा भाजप यासाठी सुरू करत नाही, कारण काँग्रेसच्या बड्या नेत्याला पक्षात आणून आधी ते आपली बार्गेनिंग पॉवर वाढवतील आणि मग चर्चेला बसतील, हे तर गेल्या शुक्रवारी इथेच लिहिले होते. चार दिवसांतच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपवासी झाले. अजित पवारांनी आघाडी सरकारमध्ये ते एकत्र असताना ‘अशोकाचे झाड सावली देत नसते’, असा चिमटा अशोकरावांना काढला होता. आता अजित पवार आणि अशोकराव असे दोघेही भाजपच्या सावलीत उभे आहेत. नियती असे काहीही करू शकते.
कोटी करण्यासाठी ठीक आहे; पण हे झाड तसे नाही. कुठेही श्रेय न घेता अशोकरावांनी अनेकांना आयुष्यात उभे केले, ‘आउट ऑफ वे’ जाऊन मदत केली. त्या मदतीचा साधा उल्लेखही कुठे केला नाही. एखाद्या व्यक्तीला मदत केली की, तिची पाठ वळताच गावभर सांगणारे नेते महाराष्ट्रात आहेत. अशोकराव त्याला अपवाद! ‘त्यांना पक्षाने सगळे काही दिले तरीही ते पक्ष सोडून गेले’ अशी टीका काँग्रेसमधील जे नेते करत आहेत त्यांच्यासह अनेक नेत्यांना आणि पक्षाला अशोकरावांनी काय काय दिले, याची यादी खूप मोठी आहे; पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे ती यादी ते कधीही वाचून दाखवणार नाहीत. कारण तो त्यांचा स्वभाव नाही. परवा ते म्हणाले, आदर्श प्रकरण हा त्यांच्या आयुष्यातील अपघात होता आणि त्याची भरपूर किंमतही त्यांनी चुकवली आहे. अनेकांनी लिहिले की, ‘आदर्श’च्या फेऱ्यातून सुटण्यासाठी अशोकराव भाजपमध्ये गेले. ते अजिबात खरे नाही. हे प्रकरण २०१० मधले. त्याला आता १४ वर्षे झाली. एवढ्या दीर्घ कालावधीत अशोकराव भाजपमध्ये गेले नाहीत. मग इतक्या वर्षांनंतर त्या प्रकरणाचा आज काही मागमूस नसताना ते का गेले असावेत? जन्मापासून ज्या मांडीवर खेळले ती मांडी सोडून जावेसे मोठ्या नेत्यांना का वाटत असेल? काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व पक्षाला पुढे नेऊ शकेल आणि त्याच्या नेतृत्वात आपले राजकीय भवितव्य सुरक्षित असेल, असा भरवसा आज अनेकांना वाटत नाही, ही खरी अडचण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे अन्य पक्षांतील लोकांनाही आकर्षण वाटते. हे वास्तव लक्षात घेऊन काँग्रेसचे शीर्षस्थ नेतृत्व स्वत:त बदल करत नाही आणि राज्यातील काँग्रेसची धुरा ज्यांच्याकडे आहे, ते आत्मपरीक्षण करत नाहीत तोवर काँग्रेसची अशीच पडझड होत राहील आणि ‘नाना’ अडचणी येत राहतील. मोदी-शहांना शिव्या घालणारे आणि त्याचे मार्केटिंग करणारे कामाचे आणि आपल्या जिल्ह्यात काँग्रेस वाढविणारे कुचकामी ही फुटपट्टी दिल्लीतले नेते बदलत नाहीत तोवर असेच एकेक नेते सोडून जातील.
अशोकरावांमुळे भाजपचा काय फायदा होईल, हे भविष्यात दिसेलच; पण त्यांनी साथ सोडल्याने अलीकडच्या वर्षांतील काँग्रेसचे सर्वांत मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसेल. त्यांच्याशी कनेक्ट असलेले विशेषत: कुणबी समाजातील बरेच नेते विदर्भात आहेत. विदर्भातील डॉ. श्रीकांत जिचकारांना मानणारा मोठा वर्गही त्यातलाच. असे कुठेकुठे धागे जुळलेले असतात. अशा लोकांना न सांगता, विश्वासात न घेताच अशोकराव भाजपमध्ये गेले. आता आपण काय करायचे, हा प्रश्न त्यांना मानणाऱ्यांना पडला आहे. गेले चार दिवस अशोकराव समर्थकांकडे काँग्रेसमध्ये संशयाने पाहिले जात आहे. ‘आम्हाला असे वाऱ्यावर सोडण्याचा अशोकरावांना काय अधिकार होता,’ असा त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस सोडण्याचे पटेल असे कारण अशोकरावांना देता आलेले नाही. ते त्यांनी दिले असते तर तपास यंत्रणांच्या दबावामुळे ते भाजपमध्ये गेले, या आरोपाला बळ आले नसते आणि काँग्रेसचे उपकार विसरल्याच्या टीकेतूनही ते वाचले असते. भुजबळ, राणे, शिंदेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्याबरोबर आमदारही गेले होते. अशोकरावांबरोबर कोणीही गेले नाही. त्यामागे एखादी रणनीती असेलही; पण जाताना ते एकटे गेल्याचे जे चित्र समोर आले ते त्यांच्या लोकनेतेपदाला मारक आहे.
फडणवीसांचा त्याग सुरूच!देवेंद्र फडणवीसांची बरेचदा कमाल वाटते. शिंदे, अजित पवारांनंतर अशोकरावांच्या ऑपरेशनमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. आधीच्या दोघांना सोबत आणताना त्यांना त्याग करावा लागला. आधी मुख्यमंत्रिपदाचा त्याग आणि नंतर उपमुख्यमंत्रिपदाचा संकोच. आता अशोकरावांमुळे लगेच त्यांच्यावर तशी पाळी आलेली नाही; पण पक्षात एक रेडिमेड बडा नेता आला आहे. पुढेमागे त्यांच्यामुळेही फडणवीसांवर त्यागाची वेळ येऊ नये म्हणजे मिळवले. ‘सह्याद्री’ याआधीही ‘हिमालया’च्या मदतीला धावत राहिला आहेच. यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्राची ती परंपरा आहे. ‘हिमालया’ने किती परतफेड केली? लोकसभेचा हिशेब समोर ठेवून फडणवीसांनी दिल्लीचे हात बळकट करण्यासाठी त्याग स्वीकारला. दिल्लीने याची जाणीव ठेवली तर त्यागाची सव्याज परतफेड नक्कीच होईल. ‘जय सियाराम’ झाले, आता भाजपमध्ये ‘आयाराम’ जोरात दिसतात. मूळ भाजपवाल्यांची जरा काळजीच वाटते आहे.