काल-आज महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण नव्या वळणावर पोहाेचले आहे. लोकसभेतील सलग पंचवीस वर्षांची कारकीर्द थांबवून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी राज्यसभेच्या वाटेवर आहेत. त्यांचा राजस्थानमधून अर्ज हे महत्त्वाचे राजकीय वळण आहे. पती राजीव यांच्या हत्येनंतर आठ वर्षांनी सोनिया राजकारणात आल्या. राजीव यांच्या अमेठी मतदारसंघातून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. नंतर सासू इंदिरा व सासरे फिरोज गांधी यांच्या रायबरेलीचे त्या प्रतिनिधित्व करू लागल्या. आता त्या राज्यसभेत जाताहेत. उल्लेखनीय म्हणजे त्यांच्यासोबत जया बच्चन, सुष्मिता देव, सागरिका घोष, मेधा कुलकर्णी, ममताबाला ठाकूर, माया नरोलिया यादेखील राज्यसभेचा उंबरठा ओलांडू पाहत आहेत. राजकारणाचे दुसरे वळण महाराष्ट्रात व तेदेखील काँग्रेसशी संबंधित आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पक्ष व आमदारकीचा राजीनामा, चोवीस तासांत भारतीय जनता पक्षात प्रवेश, लगोलग राज्यसभेची उमेदवारी या घडामोडींनी पुन्हा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस पक्षाशी स्वत:ची चाळीस तर चव्हाण कुटुंबाची सत्तर वर्षांची नाळ का तोडली वगैरेंबद्दल आपण काही बोलणार नाही, असे स्वत: अशोक चव्हाणांनीच सांगितल्याने पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला किंवा इतरांनी कितीही संताप व्यक्त केला तर पुढे काही होणार नाही. अर्थात रविवारी सायंकाळपर्यंत पक्ष तसेच महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये व्यस्त असणारे, डिसेंबरमध्ये नागपूर येथे झालेल्या स्थापना दिनाच्या सभेची जबाबदारी उचलणारे, भारत जोडो यात्रा यशस्वी करणारे, सध्याच्या भारत जोडो न्याय यात्रेची समरसून तयारी करणारे अशोक चव्हाण अचानक पक्ष साेडतात हे सर्वांसाठीच धक्कादायक होते. त्यातही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची शकले पडत असताना अभेद्य राहिलेल्या, त्याचा तोरा मिरविणाऱ्या काँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पक्षांतर नाउमेद करणारे आहे.
दशकानुदशके काँग्रेसचेच म्हणून ओळखले जाणारे आणि आता उजवा रस्ता धरणारे चव्हाण हे दुसरे घराणे. आधी मुंबईत मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना जवळ केली. दिवंगत मुरली देवरा तसेच मिलिंद यांनी केंद्रात मंत्रिपदे सांभाळलेली. मिलिंद हा राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडचा एक चेहरा. त्या पक्षांतराची शाई वाळण्याआधीच अशोक चव्हाण यांनी स्फोट घडविला. भूषविलेल्या पदांचा विचार केला तर नांदेडचे चव्हाण घराणे देवरा यांच्यापेक्षा काकणभर सरस. मराठवाड्याचे पाणीदार नेतृत्व, दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणेच अशोक चव्हाण यांनीही दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले. शंकरराव चव्हाण यांनीही एकदा वेगळी वाट धरली होती. पण, ती इंदिरा गांधींच्याच इशाऱ्यावर. अशोकरावांसारखी त्यांनी काँग्रेसच्या मूळ प्रवाहापासून फारकत घेतली नव्हती.
दरम्यान, मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. देवरा, सिद्दीकी, चव्हाण ही सगळी जुळवाजुळव लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीतून आणि तीदेखील ‘साम, दाम, दंड, भेद’ या परिचित नीतीनुसार सुरू आहे, यात शंका नाही. लागोपाठचे सर्व्हे दाखवतात की लोकसभेच्या जागांबाबत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. छत्रपती शिवरायांचे नाव आणि मराठा चेहरा ते आव्हान पेलण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठीच सुरुवातीला नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपने जवळ केले. ते पुरेेेसे नाही हे पाहून शिवसेना व राष्ट्रवादीला भगदाड पाडले आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेतले, तरीही राणे वगळता इतर नेते राज्यापुरतेच मर्यादित आहेत आणि दिल्ली दरबारी काही उपयोग होत नाही हे स्पष्ट झाले तेव्हा, लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेले नारायण राणे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना अशोक चव्हाण यांच्या रूपाने उच्चविद्याविभूषित कुशल प्रशासक नेता भाजपने आपल्या तंबूत आणला.
चव्हाण यांच्यासोबत भाजपने चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूड मतदारसंघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी व नांदेडचेच डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिलिंद देवरा, तर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना रिंगणात उतरविले आहे. अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठवायचे ठरवल्याने महाराष्ट्रातील निवडणूक बिनविरोध होईल. या घडामोडींचा तातडीचा अन्वयार्थ हाच, की नारायण राणे यांच्याऐवजी भाजपला अशोक चव्हाण अधिक महत्त्वाचे वाटतात.