- सचिन जवळकोटे
बॉबी देओलची ‘आश्रम’ ही वेबसिरीज मोबाइलवर भलतीच लोकप्रिय झालेली. या आश्रमातला भोंदू महाराज अत्यंत हुशारीनं राजकीय नेत्यांशी सलगी वाढवतो. तसंच कॉमन पब्लिकच्या श्रद्धेचा पद्धतशीरपणे बाजारही मांडतो. त्याचीच आठवण यावी, अशी बुवाबाजी सध्या ‘उजनी’ काठावर रंगलेली. मंत्री-संत्री त्याच्या पाया पडायला आलेले, मात्र त्याचंच गाव त्याच्याविरोधात गेलेलं. मग अशावेळी या पॉलिटिकल भोंदूगिरीला बत्ती लावलीच पाहिजे. मग चला तर, लगाव बत्ती..
उंदरगाव. करमाळा तालुक्यातलं कोपऱ्यातलं गाव. करमाळा-भिगवण रस्त्यावरचं हे गाव जगापासून दूर राहिलेलं. मात्र गेल्या पाच-सात वर्षांपासून जगाच्या नकाशावर आलेलं. या गावाच्या बाहेर दीड-दोन एकरात एक भलामोठा आश्रम उभा राहिलेला. दररोज पाच-पन्नास गाड्या येऊन उभारलेल्या. अमावस्येला तर बाजारच फुललेला. सातशे-आठशे गाड्यांच्या गराड्यात गावचं शिवारही गुडूप झालेलं.एन्ट्रीला काही रांगड्या-दांडग्या कार्यकर्त्यांची फौज उभारलेली. कोपऱ्यातल्या टेबलावर धडाधड पावत्या फाडण्याचं काम सुरू झालेलं. पैसे देण्यासाठी भक्तांचीही गर्दी झालेली. तीन हजारवाले रांगेत उभारलेले, तर एकवीस हजारवाले थेट महाराजांच्या दर्शनासाठी आत सोडले गेलेले. त्यांच्या हातात जणू व्हीआयपी पासच. कुणी नगरहून आलेलं तर कुणी थेट पुण्याहून पोहोचलेलं. ज्याचे-त्याचे फॅमिली प्रॉब्लेम वेगळे. सारेच चेहरे चिंताग्रस्त. मात्र साऱ्यांना एकच आशा..आपलं संकट दूर करू शकतात, ते केवळ हेच महाराज. होय सद्गुरू मनोहरमामा. त्यांच्या दृष्टीनं हे महाराज म्हणजे चक्क ‘बाळूमामां’चा नवा अवतार.पंधरा-वीस-पंचवीस लाखांच्या आलिशान गाड्यांमधून येणारी ही वेडी भक्तमंडळी महाराजांच्या पायावर लोळण घेतात. डोळ्यांत पाणी आणून आपलं दु:ख सांगतात. महाराजही शांतपणे त्यांचं सारं ऐकून घेतात. मग त्यांच्या डोक्यावर हात ठेवून ‘निश्चिंत राहा’चा आशीर्वाद देतात. सोबतीला भस्माची पुडी असते. तीच जणू चमत्काराची जननी असते..कारण ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’ हे महाराजांना कळून चुकलेलं असतं. म्हणूनच संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या जयघोषासोबत ‘मनोहरमामां’चाही जयजयकार केला जातो.हे सारं पाहून आपल्या संतांची भूमी थरकापून उठते. पावत्यांच्या ढिगात श्रद्धा चिरडली जाते. नोटांच्या बंडलात अंधश्रद्धेचा बागुलबुवा खदखदून हसतो. हे सारं पाहून अस्वस्थ झालेल्या गावातला एखादा तरुण संतापून उठतो. थेट करमाळा पोलीस ठाण्यात जातो. तक्रार देतो; मात्र तिथंही म्हणे या बुवांचे चेले पेरलेले असतात. ‘मदने’ नामक ‘खाकीधारी’ या तरुणालाच दमात घेतो. ‘महाराजांचे हात खूप वरपर्यंत पोहोचलेत,’ असं सांगून गावाला पुन्हा दहशतीखाली ठेवण्याचं काम इमानं-इतबारं करतो.त्या तरुणासह त्रेचाळीस जणांनी सह्या केलेला तक्रार अर्ज कचऱ्याच्या टोपलीत जातो. अंधश्रद्धेविरुद्धचं बंड कोनाड्यात शमतं. ‘खाकी’ जिंकते. बुवाच्या अंगावरची ‘खादी’ही हसते.मग धाडस वाढतच जातं. अजून चार दांडग्या चेल्यांचा राबता आश्रमात वाढतो. आमदार-बिमदारासोबचे फोटो व्हायरल केले जातात. फेसबुकवरही पेज तयार केलं जातं. ‘मनोहरमामा’च्या व्हिडीओत ‘बाळूमामां’ची भक्तिगीतं वाजविली जातात. खरा संत कोण, याचा सारासार विचार न करता लोक मोबाइलवरच याच्या पाया पडू लागतात.सुरुवातीला ‘संत’ म्हणून उदयास आलेला हा ‘बुवा’ आता तर ‘देवाचा अवतार’ म्हणूनच सोशल मीडियावर ‘प्रेझेंट’ केला जातो. इकडं त्याच्या पायावर लोटांगण घेणाऱ्यांच्या बुद्धीवर अधिकच गंध चढत जातो. तिकडं आजूबाजूच्या शिवारातील अनेक सात-बाऱ्यावरही त्याच्या फॅमिलीचं नाव चढलं जातं. ‘खाकी’ अन् ‘खादी’च्या जोरावर ही ‘पॉलिटिकल भोंदूगिरी’ कायद्याच्या नाकावर टिच्चून थयाथया नाचू लागते, तेव्हा गरज भासू लागते ‘लेखणी’च्या आक्रमकतेची. म्हणूनच आजची लगाव बत्ती..
कोण हा महाराज ?... कुठून आला हा बुवा ?
याचं नाव मनोहर. मूळचा इंदापुरातल्या ल्हासुर्णेचा. दोन दशकांपूर्वी उंदरगावात स्थायिक झाला.डीएडच्या परिक्षेत नापास झाल्यानंतर सुकट बोंबील विकून गुजराण करु लागला. मात्र एक दिवस गायब झाला.काही वर्षांनंतर गावात पुनरागमन. कलकत्त्याहून ‘बंगाली विद्या’ शिकून आल्याची चर्चा. गावातल्याच एका छपरात लपून-छपून पूजा-अर्चा सुरू. अंगातलं भूत काढण्याच्या नावाखाली अनेक महिलांना मारहाण होऊ लागतात किंकाळ्या गावभर ऐकू येऊ लागल्या. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्याला हिसकाही दाखविला. भरपूर 'प्रसाद'ही मिळाला.भूत-करणी-धरणी-भानामती यातून पैसा मिळतो; मात्र म्हणावी तेवढी भक्तमंडळी जमत नसल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर याच छपरात एक चमत्कारही घडविला गेला.पूजा करताना धुपाच्या धुरात झोपडी भरलेली असताना छताला बांधलेल्या पुडीतून अकस्मात भंडारा उधळला गेला. महाराजांच्या अंगात साक्षात 'बाळूमामा' आल्याची घोषणा झाली.मग काय.. भक्तांची गर्दी वाढू लागली. आडनाव गायब झालं. गावात एकेकाळी 'मन्या' म्हणून ओळखला जाणारा आता ‘सद्गुरू मनोहरमामा’ बनला. गावातलं झोपडं शिवारात गेलं.दीड-दोन एकरात आश्रम उभारला गेला. देणग्यांसाठी संस्थाही स्थापन झाली. गाड्यांच्या रांगा लागल्या. त्याच्याही दिमतीला दोन-दोन फॉर्च्युनर आश्रमात उभारली.अकस्मात येणाऱ्या लक्ष्मीपाठोपाठ म्हणे अवदसाही अवतरते. हीच अवदसा त्याला पोलिस ठाण्यातही घेऊन गेली. शारीरिक व्याधी दूर करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची दौंडला गुन्हेही दाखल झाले. घरातील सोनं काढून देण्याचं आमिष दाखवून पैसेही लुबाडल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या. मात्र यातूनच निर्ढावलेपण वाढत गेलं. बोलबच्चनगिरीला कोडगेपणाही लाभला.आता मात्र अंधश्रद्धेचा हा बाजार गावकऱ्यांना उघड्या डोळ्यानं पाहवेना. काही जणांनी विरोध करताच चेल्यांनीच दांडगाई केली. प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊनही काहीच फरक पडला नाही.मग मात्र पठ्ठ्यानं बुवाबाजीची ‘स्ट्रॅटेजी’ बदलली. पद्धतशीरपणे राजकीय नेत्यांसोबत सलगी वाढवली. आश्रमातील गर्दी पाहून नेतेमंडळीही माथा टेकवू लागली, कारण लोकप्रतिनिधींना म्हणे फुकटचा मॉब खूप आवडतो. ‘संजयमामां’पासून 'पटोलेनानां’पर्यंत अनेकांचे फोटो अत्यंत हुशारीनं ब्रँडिंगसाठी वापरले गेले.‘तहसीलदार-डीवायएसपी’सारखी क्लासवन मंडळीही दर्शनासाठी उंदरगावची वाट धरू लागली. गावात दहशत. समाजात रुबाब. सोशल मीडियावर दरारा. पाँचो उंगलीयां घी में. संत एकनाथांनी नदीकाठच्या गाढवाला पाणी पाजून वाचविलेलं. मात्र चंद्रभागेच्या पाण्यात या स्वंयघोषित महाराजाचे पाय सुशिक्षित मंडळी धुऊ लागली.भक्तांचं रोगनिवारण करणाऱ्या या बुवाच्या मातोश्रीचा पॅरालिसीस आजार मात्र हा दूर करू शकला नाही. अनेक दिवस दवाखान्यात तिच्यावर ट्रिटमेंट करावी लागली.हा बाबा म्हणे नाव सांगताच समोरच्याचा आधारकार्ड क्रमांक ओळखतो. खिशातल्या नोटांचाही अचूक आकडा सांगतो. हा चेल्यांचा अजून एक मार्केटिंग फंडा. यात किती तथ्य याचा शोध घेण्याची जबाबदारी आता ‘अंनिस’ची.जाता-जाता : या बाबाच्या उपद्व्यापामुळे तिकडं ‘बाळूमामां’च्या अदमापूर गावकऱ्यांनी ठराव घेऊन धिक्कार केलाय. इकडं उंदरगावातील मंडळींनीही आता दंड थोपटलंय. आता ‘अंधश्रद्धेचा बाजार’ या आश्रमात अजून किती दिवस चालतो, हे ‘खाकी’लाच माहीत. तोपर्यंत लगाव बत्ती..
( लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)