- यदु जोशी
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाच्या हातून सत्ता गेली वा सत्ता स्थापनेसाठी जोडतोड करण्याची कसरत भाजपाला करावी लागली तर त्याचे राजकीय पडसाद महाराष्ट्रातही उमटतील. काँग्रेसचे मनोबल निश्चितच उंचावेल. या पक्षाची राष्ट्रवादीशी आघाडी जवळपास निश्चित असल्याने राज्यात एकूण आघाडीलाच बळ मिळणार आहे. एकीकडे पारंपारिक विरोधकांना असे बळ मिळत असताना मित्र पक्ष शिवसेनेचा भाजपाला आधीच असलेला त्रास आणखी वाढू शकतो. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून दरदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर होणाऱ्या टीकेची धार तीव्र होईल, असे वाटते. आजच्या निकालाचे भाजपाने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला शिवसेनेने लगेच दिला आहे.
यापुढील कोणतीही निवडणूक स्वबळावरच लढविणार असा ठराव केलेल्या शिवसेनेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीसाठी राजी करून घेताना भाजपाला बरीच कसरत करावी लागेल. शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर अर्थातच वाढेल. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. भाजपाचा असा प्रयत्न आहे की युतीमध्ये जागांचे वाटप केवळ लोकसभेपुरते व्हावे पण शिवसेनेला मात्र निवडणुका वेगवेगळ्या होणार असल्या तरी जागा वाटपाचा फॉर्म्यूला एकाचवेळी निश्चित झाला पाहिजे असे वाटते.आता त्या दृष्टीने भाजपावर शिवसेनेचा दबाव वाढेल. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्याने भाजपा लोकसभेसाठी आपल्याला गोंजारेल आणि विधानसभा निवडणुकीत पाठ दाखवेल, अशी शंका शिवसेनेला वाटत असावी. कारण, २०१४ चा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यावेळी लोकसभेत युती झाली पण विधानसभेला दोघे वेगवेगळे लढले होते. तेव्हा युती तोडल्याचे खापर दोघांनी एकमेकांवर फोडले होते.
महाराष्ट्रात भाजपाला २०१४ मध्ये २३ तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. राजस्थानमध्ये भाजपाने २५ पैकी २५ जागा जिंकत शंभर टक्के यश संपादन केले होते. छत्तीसगडमध्ये ११ पैकी १० तर मध्य प्रदेशात २९ पैकी २७ जागा जिंकून भाजपाने मोठे यश मिळविले होते. या तीन राज्यांमिळून ६५ पैकी ६२ जागा जिंकून निर्भेळ यश भाजपाने संपादन केले. २०१९ च्या निवडणुकीत ६२ चा हा जादुई आकडा पुन्हा पक्षाला गाठता येणे शक्य दिसत नाही. उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा युती लोकसभेत झाली तर गेल्यावेळचा ७३ चा आकडा तिथेही गाठणे अशक्य होईल. गेल्यावेळी भाजपाला ७१ तर त्यांचा मित्र पक्ष अपना दलला २ जागा मिळाल्या होत्या. हिंदी पट्टयातील अशा मोठ्या राज्यांमध्ये २०१९ च्या निवडणुकीत पडणारा संभाव खड्डा भरुन काढायचा असेल तर भाजपाला इतर राज्यांमधील सध्याचे यश टिकवून ठेवावे लागेल. त्यामुळेही त्यांना शिवसेनेशी युती करणे ही भाजपाची अपरिहार्यता असेल असे दिसते.
विविध चॅनेल्सनी मध्यंतरी जे सर्वेक्षण केले त्यानुसार भाजपा-शिवसेना युती झाली नाही तर मोठे नुकसान हे शिवसेनेचे होईल. भाजपाच्या जागा चार किंवा पाचने कमी होतील पण गेल्यावेळी १८ वर असलेली शिवसेना चारवर येईल, असे अंदाज दिला आहे. युती तुटली तर भाजपाचे नुकसान होणार नसले तरीही युती तोडणे भाजपाला परवडणार नाही. कारण, युती तुटली असता शिवसेनेच्या १४ जागा कमी होतील. त्यामुळे एनडीएचे एकूण संख्याबळ घटेल.२०१९ मध्ये भाजपा स्वबळावर सत्तेत येणार नाही असे आता मानले जात आहे. त्यामुळे भाजपाला एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊनच सत्तेचा सोपान गाठता येणार आहे. अशावेळी महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करुनच भाजपाला लढावे लागेल. एवढेच नव्हे तर शिवसेनेकडून होणारे शब्दांचे प्रहार गोड मानून घ्यावे लागणार आहेत.