- राजू नायक
गोवा विधानसभेचे तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन ‘शांततेने’ पार पडले. शांततेने एवढय़ाचसाठी कारण विरोधी काँग्रेसला त्यांच्याकडे योग्य गणसंख्या असूनही सरकारला नामोहरम करता आले नाही. काँग्रेस पक्षाने पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला खाली खेचण्यासाठी नव्याने हालचाली चालविलेल्या आहेत. परंतु काही आमदार फोडून, मगो पक्षाला बंडखोरी करण्यास प्रवृत्त करून भागणार नाही. हे सरकार कसे निष्क्रिय आहे, ते त्यांना लोकांच्या मनावर बिंबवावे लागेल. विधानसभेत त्यांचा हा प्रतिकार जाणवला नाही.
पर्रीकरांनी मांडलेला अर्थसंकल्प किंवा राज्यपालांचे अभिभाषण ही विरोधकांना सरकारचे वाभाडे काढण्यासाठी योग्य संधी होती. अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी अर्थसंकल्प हा केवळ एक उपचार असे म्हटले. ज्या पद्धतीने हा अर्थसंकल्प मांडला, ती गोवेकरांची चेष्टा होती, गोव्याच्या भवितव्यावरच सरकारने सर्जिकल स्ट्राइक केला, असे रमाकांत खलप म्हणाले. परंतु त्यांच्या पक्षाच्या सभागृहातील सदस्यांना विनियोग विधेयक मंजूर करताना सरकारला पेचात आणण्याची संधी होती, ती त्यांनी गमावली. जे सरकार पर्रीकरांच्या आजारामुळे लुळेपांगळे बनले आहे- ज्या सरकारमधील मंत्री सतत वादात असतात व एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्यात धन्यता मानतात- त्या सरकारचे वाभाडे काढण्याची संधी काँग्रेसने गमावली.
मगो पक्ष सरकारातून बाहेर पडण्यास उत्सुक आहे असे वातावरण आहे. त्यांना सरकारातील दुसरा घटक पक्ष गोवा फॉरवर्डने तसे करण्याचे जाहीर आव्हान दिले आहे. मगोपने पाठिंबा काढला तर आम्ही नवे सदस्य उभे करू असे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. मगोपच्या तीन सदस्यांपैकी दोन सदस्य यापूर्वीच भाजपाच्या संपर्कात आहेत व काँग्रेसच्या काही सदस्यांनाही सत्ताधारी बनण्याचे डोहाळे लागले आहेत. दुस-या बाजूला भाजपाचेही काही सदस्य काँग्रेसच्या संपर्कात आहेत.
अशा राजकीय घडामोडी तेजीत असतात तेव्हा विरोधी पक्षाला सरकारला अडचणीत आणण्याचा डाव खेळावा लागतो. सरकारचे कमकुवत संख्याबळ दाखवून देण्याचीही ती संधी असते.
या अधिवेशनाची एकमेव उपलब्धी म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची उपस्थिती. पर्रीकरांनी ज्या प्रकारे- अत्यंत आजारी असताना- चालता-व्यवस्थित बोलताही येत नसताना खिंड लढविली ती लोकांच्या, पत्रकारांच्या कायम स्मरणात राहील. त्यांना बोलताना-वाचताना-चालताना दोन सुरक्षा रक्षकांनी पकडावे लागत असे. त्यांच्याबरोबर एक डॉक्टर ठेवण्यात आला होता. आवाज अस्पष्ट होता; परंतु त्यातूनही हा माणूस जिद्दीनेच नाही तर त्यांनीच म्हटल्याप्रमाणे - जे त्यांच्यावरच्या ‘उरी’ चित्रपटातले वाक्य ‘जोश’ दाखवतो- ही गोष्ट संस्मरणीय, वैशिष्टय़पूर्ण आहे. याच पर्रीकरांनी दोन दिवसांपूर्वी नवीन आकर्षक मांडवी पुलाचे उद्घाटन केले. त्यांना पाहून लोक खुश झाले. मात्र, सरकारला ते वेग देऊन जनतेचे समाधान करू शकले असते तर लोकांचा आनंद द्विगुणीत झाला असता. त्यानंतर पर्रीकर तातडीने दिल्लीला वैद्यकीय इलाजासाठी गेले.
परंतु, केवळ ‘इच्छे’वर सरकार चालत नाही. नेतृत्व वेगवान पाहिजे, मंत्री कार्यक्षम आणि धाडसी हवेत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने एकवाक्यता दाखवायला हवी. पर्रीकर आजारी असल्यापासून गेले वर्षभर सरकार अडखळत आहे. विरोधकांनीही फारसा आशेचा किरण दाखविलेला नाही.