- सुरेश द्वादशीवार२६ एप्रिल १९९२ या दिवशी अटलजी नागपूरच्या विदर्भ साहित्य संघात ‘राष्ट्रवाद’ या विषयावर भाषण करायला आले. साहित्य संघाचे रंगमंदिर श्रोत्यांनी फुलले होते. प्रस्तुत लेखक तेव्हा साहित्य संघाच्या अध्यक्षपदी असल्याने व्याख्यानाचे अध्यक्षपदही त्याच्याकडे होते. कै. वि.घ. देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झालेल्या त्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा पुढाकार भाजपच्या तेव्हाच्या ज्येष्ठ नेत्या सुमतीबाई सुकळीकर यांनी घेतला होता. अटलजी त्यावेळी लोकसभेत विरोधी पक्षाचे नेते होते आणि तेव्हाच्या नरसिंहराव सरकारने पद्मविभूषण हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला होता. त्या निमित्ताने वि.सा. संघानेही त्यांना सन्मानचिन्ह अर्पण करून त्यांच्या गौरवात सहभाग घेतला होता.बाहेरचे वातावरण तापलेले होते. २५ सप्टेंबर १९९० ला अडवाणींची सोमनाथहून निघालेली रथयात्रा ३० आॅक्टोबरला अयोध्येला पोहचली होती. त्या यात्रेने देशाची सारी मानसिकता ढवळून काढून तीत स्वधर्मप्रेमाहून परधर्मद्वेषाचे विष अधिक पेरले होते. पुढची घटनाही मग तशीच झाली. मंदिरासाठी गेलेली यात्रा बाबरी मशिदीचा विध्वंस करून समाप्त झाली. नंतरचा काळ देशात उसळलेल्या धार्मिक दंगलीचा व तीत मारल्या गेलेल्या निरपराध लोकांचा होता. भाजप, संघ व त्याचा एकूण परिवार आणि त्या यात्रेत सहभागी झालेल्या तथाकथित कारसेवकांसह अडवाणींच्या मागे कमालीच्या त्वेषाने उभा होता. एकटे वाजपेयीच त्या उन्मादापासूनच दूर राहिले होते.वाजपेयींचे राष्ट्रवादाचे उद्बोधन या पार्श्वभूमीवरचे होते. वातावरण निवळायचे होते आणि वाजपेयींच्या तटस्थतेसंबंधी साऱ्यांच्या मनात कुतुहल होते. त्यांच्या भाषणानंतर साहित्य संघाने दिलेल्या मेजवानीतही अटलजी सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी या प्रतिनिधीला, पुढे पाँडेचरीच्या नायब राज्यपालपदी आलेल्या रजनी रॉय यांच्या निवासस्थानी एक मुलाखत दिली. वाजपेयी आंत कुठेतरी दुखावले होते. पक्ष, संघटना व परिवार यांच्यापासून त्या रथयात्रेच्या काळात त्यांनी अनुभवलेला दुरावा त्यांना अस्वस्थ करीत होता. एरव्हीचा त्यांचा प्रसन्न व देखणा चेहरा बहुदा त्याच वैतागाने तेव्हा ग्रासला होता. मुलाखतीच्या आरंभी काही औपचारिक बोलणी करून प्रस्तुत लेखकाने त्यांना त्याच विषयावरचा सरळ प्रश्न विचारला.‘अटलजी, अडवाणींच्या रथयात्रेपासून तुम्ही स्वत:ला दूर का ठेवले व त्यांनीही तुम्हाला आपल्या यात्रेत का घेतले नाही’‘सही मानेमे’ ते म्हणाले ‘मुझे यह यात्रा और उसका आयोजनही पसंद नहीं था. इससे देश की जनता का धार्मिक धृवीकरण होने की आशंकासे मैं चिंतीत था. मंदिर रह गया और मस्जिद ढह गयी. जो नहीं होना था वह हुआ और जो होने का था वह हुवाही नहीं.’‘तुम्ही तुमची ही भावना पक्षाला सांगितली की नाही’ प्रस्तुत लेखकाचा प्रश्न.अटलजी म्हणाले ‘इन दिनो पार्टी मे मेरी बात को कोई सुनता नही भाई. सभी के दिलोदिमागपर यह यात्रा छायी है और सबको देश से धर्म और आदमी से भगवान बडा लगने लगा हैै’जरा वेळाने ते स्वत:च म्हणाले ‘और इस यात्रामे हमारी पार्टीने इन साधुओं और महंतो को शामील कर बहुत बडी भूल की है. उन्हे साथ लेना आसान है, संभालना बहुत मुश्कील है. उन्हे मंदिर दिखाईही नहीं देता, उनकी आंखो के सामने सिर्फ मस्जिद है और थी. देखो, शेर पे सवार होना एकबार आसान हो सकता है लेकिन बादमे उसकी पीठ से उतरना असंभव होता है’.‘हे साधू आणि महंत राम मंदिराच्या उभारणीसाठी या यात्रेत आल्याचे सांगितले गेले’ असे प्रस्तुत प्रतिनिधीने म्हणताच, अटलजी उतरले ‘देखिये, आज वो हमारे साथ है, कल वो हमे अपने साथ खिचके ले जायेंगे. उस वक्त हम उन्हे नकार नही सकेंगे’ यावेळी काहीसे स्वत:शी बोलल्याप्रमाणे ते म्हणाले ‘इन साधूओं को ना देशसे मतलब है, ना जनता से. इन्हे ना राजनीती समझती, ना समता धर्म. सारा दिन भक्तोने लाकर दिये फल और मिठाईयां खाना, शाम को गंगाजी मे नहाना और बाद मे गांजा कसके आराम करना. ये लोग देश, समाज और जनता की स्थिती का ख्याल करनेवालोंमेसे नहीं’‘त्यामुळे तुम्ही या यात्रेत नाहीत तर’ प्रस्तुत लेखक.‘नही, मुझे यह प्रयास शुरूसेही पसंद नहीं और मेरी नापसंदगी सभी बडे नेताओं को मालूम है, इसलिये उन्होंने भी मुझे साथ आने का आग्रह नहीं किया’.मुलाखत संपली आणि प्रस्तुत लेखकाने अटलजींना वंदन करून व त्यावेळी उपस्थित असलेल्या सुमतीबाई सुकळीकर व रजनी रॉय यांचा निरोप घेऊन तिचा सविस्तर वृत्तांत आपल्या वृत्तपत्रात (तेव्हा हा लेखक ‘लोकमत’मध्ये नव्हता) प्रकाशित केला. दुसरे दिवशी त्यावर अपेक्षेप्रमाणेच मोठा गदारोळ झाला. भाजपमधील काही मोठ्या नेत्यांनी त्या वृत्तपत्राच्या मालकापर्यंत धाव घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला व अशी ‘अवसानघातकी’ मुलाखत प्रकाशित कशी झाली याची त्यांच्याकडे विचारणा झाली. वृत्तपत्राच्या संचालकांनीही आपल्या मुख्य संपादकामार्फत त्याविषयीची ‘चौकशी’ प्रस्तुत लेखकाकडे केली. मात्र अटलजी शांत होते. दुसºया दिवशी झालेल्या त्यांच्या अधिकृत पत्रपरिषेदत सगळ्याच पत्र प्रतिनिधींनी त्यांना या मुलाखतीविषयी छेडले. मात्र अटलजींनी आपले शब्द मागे घेतले नाहीत. ‘आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’ अशी राजकारणातली कोडगी भाषाही त्यांनी वापरली नाही किंवा सरळ सरळ ‘मी असे म्हणालोच नाही’ असेही ते म्हणाले नाहीत. धीरगंभीर वृत्तीच्या त्या राष्ट्रनेत्याने त्यांना दिलेले उत्तर होते, ‘देखिये भई, वह द्वादशीवारजी हमारे मित्र है. उनसे हमने खुले मनसे जो बात कही, वही उन्होंने अपने अखबार मे दी है. वह बातचित हमने बडी सहजतासे और अनौपचारिक तौर पर की.काही काळपर्यंत अटलजींच्या त्या उद्गारांनी प्रस्तुत लेखकामध्येच एक अपराधी भाव राहिला. नंतर झालेल्या त्यांच्या दुसºया भेटीत तो त्यांनीच काढायला सांगितला. मात्र या प्रतिनिधीच्या मनाच्या झालेल्या घालमेलीपेक्षा भाजपात व परिवारात उमटलेली प्रतिक्रिया कमालीची गंभीर होती. त्यांच्या नित्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी ती ‘बातचीत’ प्रकाशित झालीच नाही वा आम्ही पाहिलीच नाही असा अविर्भाव आणला. वाजपेयींची तोवर होत असलेली पक्षातली उपेक्षा काही काळ आणखी वाढली. मात्र काही काळानंतर आपल्या नेतृत्वात पक्षाला निवडणुकीत अपेक्षित यश मिळणार नाही याची जाणीव अडवाणींनाच झाली व मुंबईच्या एका जाहीर सभेत त्यांनी स्वत:च ‘आपण वाजपेयींसाठी नेतृत्वाच्या स्पर्धेतून दूर होत आहोत. यानंतर तेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील’ असे त्यांनी देशाला सांगितले.तथापि या घटनेने अटलजींचे इतर नेत्याहून वेगळे व उंच असणे. प्रस्तुत लेखकासह पत्रकारांच्या व कोणत्याही पक्षात नसलेल्या वाचकांच्या मनातही कायमचे ठसविले... अटलजींच्या स्मृतींना प्रणाम.
(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत.)