- राजा माने
देवेंद्रभाऊंनी केलेली हजारो कंत्राटी नोकऱ्यांची घोषणा व साखरेच्या कोसळलेल्या भावाची बित्तम्बात पाठविण्याच्या तयारीला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके लागला होता. एवढ्यातच त्याच्या कानावर हाक पडली.. ‘हॅलो यमके !’.. यमकेने मागे वळून पाहिले.. एक वयस्क व्यक्ती उभी होती. डोक्याच्या मागील बाजूस उरलेल्या विस्कटलेल्या केसांना जतन करणारे तुळतुळीत टक्कल, धोतर, शर्ट, त्यावर आखूड कोट आणि काखोटीला छत्री! यमके त्या व्यक्तीकडे पाहत म्हणाला, ‘नमस्कार ! आपण कोण?’ ती व्यक्ती म्हणाली, ‘तू मला ओळखले नाहीस?’ त्याचे बोलणे ऐकत असतानाच यमकेच्या फोनची रिंग खणाणली ... ‘नारायण.. नारायण’ ! अर्थातच महागुरू नारदांचा तो फोन होता. यमके बोलू लागला, ‘नमस्कार गुरुदेव!’ यमके : गुरुदेव, देवेंद्रभाऊ.. साखरेचे भाव.. नारद : (यमकेचे बोलणे तोडत)..ते राहू दे! मी तुझ्याकडे एका व्यक्तीला धाडलं आहे. (एवढेच बोलून नारदांनी फोन कट केला)मघाच्या व्यक्तीने पुन्हा हाक दिली, ‘हॅलो यमके..’ यमके लगेचच त्या व्यक्तीकडे वळला आणि नारदांनी पाठविलेली व्यक्ती ती हीच आहे, हे क्षणार्धात जाणले.. त्याने पुन्हा त्या व्यक्तीचे मनोभावे निरीक्षण केले आणि त्याची ट्यूब पेटली.. तो चक्क ओरडलाच ! वाहवा.. कॉमन मॅन ..कॉमन मॅन ! व्यंगचित्रमहर्षी लक्ष्मण यांचे ‘कॉमन मॅन’ तुम्हीच ना?कॉमन मॅन: हो, लक्ष्मण सर स्वर्गलोकी वास्तव्यास गेल्यापासून माझे बोलणे खुंटले..संवाद थांबला.. मी मूकबधिरच झालो. अवती-भवतीच्या वातावरणाने मन अस्वस्थ होते.. पण मन मोकळे करायला संधीच नाही. म्हणून मी नारदमुनींकडे याचना केली आणि त्यांनी मला तुझ्याकडे धाडले... यमके: कॉमन मॅनकाका सांगा, मी तुमच्यासाठी काय करू? कॉमन मॅन: एका जमान्यात लक्ष्मण सरांच्या कुंचल्यातून चितारली जाणारी प्रत्येक रेषा माझं मन मोकळं करायची! आता तूच माझं मन मोकळं कर.. कर्नाटकी नाट्याने मी खूप खूप अस्वस्थ बनलोय. यमके: काका, त्यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? भारतभूमीतील आम्हा लोकांना अशा नाटकांची सवयच झालीय.. कॉमन मॅन: अरे, सत्ता कुणाची, याच्याशी मला देणे-घेणे नाही. जे चुकीचे ते चुकीचेच ना! कुणी तरी चुकीचे करतो म्हणूनच आपण परिवर्तन करतो ना? राष्ट्रप्रेम, आपला देश आणि आपल्या देशाची राज्यघटना यांच्यापेक्षा कुणीही मोठे नाही. यमके: खरंय काका! पण पूर्वीचे सत्ताधारी तसे वागले होते, मग आताचे तसेच वागले तर बिघडले कुठे?कॉमन मॅन: मग परिवर्तन कशासाठी? देशात त्याच त्या चुका घडत राहाव्यात यासाठी? अरे, ते नाट्य आणि येडियुरप्पांचे भाषण...छे..छे..मला अटलजी आठवले! यमके: कुठे अटलजी अन् कुठे येडियुरप्पा ? एका मताने पंतप्रधानपदाला हुलकावणी मिळाली तेव्हा..विश्वासदर्शक ठरावावरील भाषण आठव..कोट्यवधी जनता टीव्हीवर पाहत होती.. भाषणाचा समारोप ‘मी माझा राजीनामा राष्ट्रपतींकडे द्यायला जात आहे..’ या वाक्याने झाला आणि टी.व्ही.पुढे बसलेल्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.. प्रत्येक भारतीय हळहळला !आज येडियुरप्पा यांच्या भाषणानंतर काय झाले? राष्टÑगीताचा मान राखण्याचेही भान कुणाला राहिले नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते, अटलजी त्यांना माफ करा!