- सुकृत करंदीकर, ज्येष्ठ पत्रकार sukrut.k@gmail.com
द्युती चंद ही भारतीय धावपटू. गेल्या वर्षी पतियाळात झालेल्या स्पर्धेत द्युतीनं शंभर मीटर अंतर ११.१७ सेकंदांत कापलं. शंभर मीटर महिला गटातली ही सर्वोत्तम वेळ ठरली. द्युतीच्या नावावर राष्ट्रीय विक्रम जमा झाला. आता द्युतीला वेध लागले आहेत ते येत्या २८ जुलैपासून इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे. या स्पर्धेत द्युती तिच्या आवडीच्या शंभर आणि दोनशे मीटर स्पर्धेत धावणार नाही. ती चारशे मीटर रिले संघाचा भाग असेल. या रिले संघाकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे, कारण द्युती या संघातून धावणार आहे.
सव्वीस वर्षांची द्युती यंदा पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेत आहे. खरं तर आठ वर्षांपूर्वी ती अठरा वर्षांची असतानाच तिला ‘राष्ट्रकुल’मध्ये धावण्याची संधी मिळाली होती. सन २०१४ मध्ये शंभर मीटरसाठी अठरा वर्षांखालील भारतीय संघात तिचा समावेश झाला होता; पण द्युतीच्या शरीरात पुरुषांइतके टेस्टोस्टेरॉन संप्रेरक (हार्मोन) असल्याचं स्पष्ट झालं आणि महिला गटातून धावण्यास तिला मनाई केली गेली. हा धक्का मोठा होता; पण द्युतीला लहानपणापासून असे धक्के पचवण्याची सवय होती. ‘तुम लडकी नही, लडका हो,’ असे टोमणे ऐकतच ती ओरिसातल्या गोपालपूर या गावातून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली होती. तिच्या वेगवान धावण्याइतकीच ती तिच्या पुरुषी दिसण्याबद्दल ओळखली जायची. तिचा आवाज मुलासारखा आहे, ती खरोखरच ‘स्त्री’ आहे का, अशा शंका तिच्याबद्दल उपस्थित झाल्या. यात तिची काहीच चूक नव्हती. ती मुलगी म्हणूनच जन्माला आली; पण वयात येताना तिच्यात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण सामान्य स्त्रीपेक्षा जास्त वाढत होते. ती मुलगी होती; पण नेहमीसारखी नाजूक ‘फेमिनिन’ नव्हती. ‘ट्रान्सजेंडर ॲथलिट’ ही स्वतःची ओळख तिने कधी लपवली नाही. आहे ते शरीर न्यूनगंडाशिवाय स्वीकारलं. महिला गटात धावताना स्पर्धक मुली, प्रेक्षकांच्या कुचेष्टेच्या नजरा ती सहन करीत राहिली. ‘लडका होके लडकीयों मे खेलता है,’ असले टोमणे कानाआड करीत राहिली. २०१४ मधल्या राष्ट्रकुल स्पर्धेत अक्षरशः ट्रॅकवरून बाहेर जावं लागल्यानंतर एखादीचं करिअर निराशेच्या गर्तेत बुडालं असतं. पण द्युतीनं आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढा दिला. द्युतीचं स्त्रीत्व तिथं मान्य झालं. त्यानंतर तिला महिला गटातून धावण्यापासून जगात कोणी रोखू शकत नाही.
द्युती वेगळी आहे का?- तर ती आहेच. ‘ट्रान्सजेंडर ॲथलिट’चं शरीर सामान्य स्त्रीच्या तुलनेत अधिक ताकदवान, चपळ असू शकतं. स्नायूंना पुरुषी बळकटपणा असू शकतो. हृदय, फुप्फुसांचा आकार सामान्य स्त्रीपेक्षा मोठा असू शकतो. शरीरातल्या संप्रेरक पातळीतल्या बदलांमुळे द्युतीसारख्या स्त्रियांच्या (आणि पुरुषांच्या) लैंगिक आवडीनिवडी बदलू शकतात. द्युती गेली काही वर्षे तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान तरुणीसोबत ‘डेटिंग’ करते आहे. ‘डेटिंग’ म्हणायचं कारण समलिंगी विवाहांना भारतात अद्याप परवानगी नाही. कायदेशीर लग्नाची सोय नाही म्हणून त्या दोघींचं काही बिघडलेलं नाही. दोघी वयानं सज्ञान असल्यानं त्यांच्या मर्जीनं एकत्र नांदतात. चार भिंतींआड त्यांना हवं ते आयुष्य उपभोगतात. त्यांच्या अवतीभोवतीचा ‘समाज’ नावाचा प्राणी मात्र नको इतका भोचक आहे. त्यामुळं जाईल तिथं ‘यंदा कर्तव्य आहे का’ या छापाचे प्रश्न द्युतीच्या वाट्याला येतात. ‘लडकी के साथ है तो ये लडकाही होगा,’ अशी शेरेबाजीही होते. या रिकामटेकड्यांना उत्तरं द्यायला द्युतीला वेळ नाही. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं तिचं ध्येय आहे. त्यामुळं तोवर लग्न नको, असा निर्णय तिनं आणि तिच्या मैत्रिणीनं घेतला आहे. आता तिला वेगानं धावू द्या...आणि सध्या तरी तिच्या आयुष्याचा भाग असलेल्या तरुणीसोबत मनासारखं जगू द्या.