सचिन जवळकोटे
(लेखक लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत)
लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचे सेवक. मतदार हाच मालक. मात्र, सोलापूर जिल्ह्यात जनतेला भेटलेत एक सोडून चार मालक. एक ‘शहर-उत्तर’चे. दुसरे ‘दक्षिण सोलापूर’चे. तिसरे ‘पंढरी’चे.. तर चौथे ‘मोहोळ’चे. विशेष म्हणजे, या नेत्यांना कौतुकानं मालक म्हणायला लोकांनाही म्हणे आवडतं. आता तुम्ही म्हणाल.. हे मालक तुम्हाला अचानकच कसे सुचले. हीच तर खरी गंमत आहे ना सोलापुरी राजकारणाची.. कारण, आजकाल जिल्ह्याचं राजकारण फिरतंय याच मालकांभोवती !तीन मालक... एक अण्णा! शहराच्या पूर्व भागात नुकताच रथोत्सव सोहळा थाटामाटात साजरा झाला. मात्र, तब्बल पंधरा मिनिटं एका नेत्यासाठी हा सोहळा म्हणे लांबला. अनेकांना वाटलं... सोलापूरच्या सुपुत्रासाठी सारे जण थांबलेत; पण खरी मेख वेगळीच. पंढरपूरचे प्रशांत मालक येण्याची अनेक जण वाट बघत होते. कारण, त्यांच्या पंढरीच्या दुधानं या सोहळ्याला नेहमीच मदत केलेली. त्या जाणिवेपोटी महेशअण्णांनी केली बरीच प्रतीक्षा. अजून एक अंदर की बात म्हणजे मुंबईतला मालकांचा दूध प्लांटही अण्णांनी चालवायला घेतलाय. एमआयडीसी परिसरातल्या लोकांना कदाचित आश्चर्य वाटेल की, अण्णांचा ग्रुप कधीपासून दुधाच्या व्यवसायाकडं वळाला ?असो. महेशअण्णा आजकाल अनेकांना हवेहवेसे वाटू लागलेत. काही काळापूर्वी देशमुख मालकांनी त्यांची मुंबईत देवेंद्रपंतांशी गाठ घालून दिली होती. अण्णांनी धनुष्याचं ‘उत्तर’ शोधण्याच्या नादात आपल्याला त्रास देऊ नये, ही मालकांची भूमिका होती की ‘मध्य’मध्ये ‘कमळ’ फुलावं, ही प्रामाणिक इच्छा होती, हे त्यांच्या लाडक्या ‘सिद्धू’लाच माहीत.. कारण, त्यांच्या मनातलं म्हणे बाहेर कुण्णाऽऽलाच कळत नाही. मालकांची ही तिरकस चाल कदाचित सुभाषबापूंच्या लक्षात आली असावी. म्हणूनच की काय, बापूंनी अण्णांशी पालिकेत अनेकवेळा जुळवून घेतलेलं. ‘उत्तर’मध्ये भुंगा सोडायला ‘अण्णा’ उपयोगी ठरू शकतात, हे ओळखूनच बापूंनीही वरिष्ठ नेत्यांसोबत अण्णांची गाठभेट घडवून दिलेली. पण अण्णा लई हुशारऽऽ कमळाच्या दोन्ही पाकळ्यांवर हात ठेवून धनुष्याची प्रत्यंचा ताणायला तयारऽऽ.. दरम्यान सुभाषबापू भविष्यात महेशअण्णांच्या माध्यमातून आपल्याला त्रास देऊ शकतात, हे ओळखूनच देशमुख मालकांनीही दिलीप मालकांशी जुळवून घेतलंय. ‘उत्तर’मध्ये बापूंनी ‘फटाके’ वाजविले तर ‘दक्षिण’मध्ये दोन मालक एकत्र येऊन ‘धूर’ काढणार... लगाव बत्ती !कुर्डूवाडीच्या बंडखोरांसमोर बोलताना अकलूजच्या तरुण नेतृत्वानं अत्यंत ‘धवल’पणे राजकारणातले पत्ते ओपन केले. ‘आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण खेळण्याचा प्रयत्न झाला म्हणूनच आपण राजीनामा दिला’ असा बॉम्ब त्यांनी टाकताच सारेच अचंबित झाले. ते बंडाळी शमवायला आले होते की वाढवायला, हेच क्षणभर कुणाला समजलं नाही. मात्र एक खरं, अकलूजकरांचा खांदा नेहमीच अनेकांनी वापरलेला. बारामतीकरांनी तर यात विक्रमच केलेला. कधी थोरल्या काकांनी पुढाकार घेतलेला तर कधी धाकट्या दादांनी कामापुरता अन् वेळेपुरता वापर करून घेतला. तरीही हा खांदा म्हणे आजही शाबूत. थोडासा दुखरा झालाय... हा भाग वेगळा. बहुधा काळाचा महिमा. एकेकाळी अकलूजकरांनी सत्तेचा सुवर्णकाळ पाहिलेला. त्यांच्या इशाºयाशिवाय झेडपीत टाचणीही खाली पडत नव्हती की ‘डीसीसी’त कागदाचं पानही हलत नव्हतं. कदाचित म्हणूनच खांद्यावरच्या बंदुकीची ठसठस अकलूजच्या ‘सिंहा’नं व्यक्त केलेली. वकिली पॉर्इंट... पानमंगरुळच्या कार्यक्रमात गौरव मूर्तीच्याच खासगी जीवनातल्या गोष्टी जगजाहीर करणारे सोलापूरचे खासदार महाशय ग्रेटच की रावऽऽ. गेल्या चार-साडेचार वर्षांत ते बºयाच ठिकाणी बरंच काही बोललेत. मात्र, कालची डॉयलॉगबाजी एकदम डेंजरच. राष्टÑीय पातळीवरच्या एका दिग्गज नेत्याला पराभूत करून खासदार झाल्याचा आवेश एवढा भारी असतो, हे आम्हा पामराला माहीत नव्हतं बुवा... खरंतर, ते निवडून आले मोदी लाटेत. मात्र, त्यांच्या कर्तृत्वाला (!) सोलापूरच्या सूज्ञ मतदारांनी पसंती दिली, असं त्यांना वाटत असेल तर त्यांचा भ्रम त्यांनाच लखलाभ. दरम्यान, आपल्या जन्मगावचा रस्ता इतके दिवस नेमका कशामुळे अडलाय, याचीही माहिती त्यांना नसेल तर धन्य ती लोकशाही. चिंता शत्रूची नाही..रथोत्सवाच्या सोहळ्यात सुशीलकुमारांनी महेशअण्णांच्या पाठीवर थाप मारली. आता ही खरंच कौतुकाची थाप होती की बेरजेच्या राजकारणाची, हे त्या दोघांनाच माहीत... कारण, ‘नेत्यांची थाप’ बिच्चाºया सर्वसामान्य जनतेला कधी कळतच नसते. मात्र, या घटनेतून एक स्पष्ट झालं. सोलापूरच्या सुपुत्राला खºयाखुºया शत्रूची चिंता नाही. शत्रू बनलेल्या मित्रांच्या बाबतीत मात्र ते अधिक सावध बनलेत.खरं तर ‘बुढ्ढी के बाल’ची कहाणी मोठ्या कौतुकानं ऐकत सोलापूरच्या तीन पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या प्रत्येक भावनिक आवाहनाला ‘ओ’ देत मतदानासाठी सरसावल्या. गेल्या तीन-चार दशकांत अवघं सोलापूर ‘सुशीलमय’ होतं. मात्र, मोदी लाटेत ‘शरदाचं चांदणं’ फुललं.’ अशातच तार्इंची ‘डिसिप्लिन अन् सिस्टीम’ पक्षात मुक्तपणे वावरणाºयांना खटकली. काही नाराज झाले. काही बाजूला सरकले.मात्र, आता पुन्हा एकदा सारी सूत्रं हाती घेऊन पिताश्रींनी ‘जन वात्सल्य’ फुलविण्याची मोहीम आखलीय. विखुरलेले सारे दुवे ते पुन्हा जोडू पाहताहेत. दुरावलेल्या साºया मंडळींना पुन्हा एकत्र आणू पाहताहेत. कदाचित त्याचाच परिपाक म्हणजे गेल्या पाच दिवसांपासून त्यांचा सोलापुरी मुक्काम..अन् महेशअण्णांच्या पाठीवरची थाप.