- प्रशांत दीक्षित
निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदी यांनी संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये केलेले भाषण त्यांच्या समर्थकांसह संशयग्रस्तांनाही आवडले होते. देशातील अल्पसंख्य समाजात पसरलेले कल्पित भय संपविण्याचे आव्हान सरकारसमोर आहे असे मोदी म्हणाले. ‘सबका साथ, सबका विकास’ अशी घोषणा त्यांनी २०१४च्या निवडणुकीत दिली होती. त्या घोषणेत, ‘सबका विश्वास’, अशी भर त्यांनी घातली.ही भर महत्वाची होती. या निवडणूक निकालातून बहुसंख्यवाद उग्रपणे समोर आला अशी अनेकांची भावना झाली होती. एनडीटीव्हीवर निकालाच्याच दिवशी प्रणय रॉय यांनी ही भावना व्यक्त केली. देशातील अल्पसंख्यांकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे असे ते म्हणाले. ही धास्ती या समाजाला दहशतवादाकडे खेचू शकते असा इशारा त्यांनी दिला. पहिल्याच दिवशी असे बोलणे चुकीचे होते व अल्पसंख्यांकांच्या मनात विनाकारण धास्ती निर्माण करणारे होते असे काहीजणांचे मत पडले.मात्र प्रणय रॉय यांनी मांडलेला मुद्दा मोदींना पटला असावा. नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत त्यांनी तोच मुद्दा उचलून धरला व अल्पसंख्यांकांच्या मनातील धास्ती दूर करण्याचे आव्हान सरकारसमोर असल्याचे मान्य केले. ‘काल्पनिक धास्ती’ असा शब्दप्रयोग त्यांनी केला. तो समर्थकांना पटणारा होता. पण धास्ती काल्पनिक असली तरी त्याचे परिणाम वास्तव असतात हे मोदींना माहित होते.मोदींच्या या वक्तव्याचे स्वागत झाले असले तरी या विधानाला छेद देणारी एखादी छोटीशी घटना देशात कुठेही, अगदी आडबाजूला घडते आहे काय याचा शोध घेतला जाईल आणि असे काही घडले तर थेट मोदींनाच जबाबदार धरले जाईल असा अंदाज होता. तो दोनच दिवसात खरा ठरला. घटना एक नव्हे तर दोन घडल्या व दोन्ही राजधानी दिल्लीत घडल्या. दोन्ही घटना म्हटल्या तर किरकोळ स्वरुपाच्या आहेत, पण माध्यमांनी त्या उचलून धरल्या आहेत आणि पुढील काही दिवसांत त्यावरून मोदीविरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.अर्थात अशा घटनांकडे लक्ष वेधल्याबद्दल माध्यमांना दोष देता येणार नाही किंवा अशा घटना माध्यमांच्या लक्षात आणून दिल्याबद्दल संबंधीत व्यक्तीलाही दोष देता येणार नाही. समाजातील त्रूटी लक्षात आणून देणे हे माध्यमांचे काम आहे. ते काम करताना माध्यमांमध्ये वैचारिक अंधत्व येत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून मूळ त्रूटी दूर कऱण्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. मोदी विजयाचा एक परिणाम असा की निदान एका घटनेबद्दल इंग्रजी वृत्तपत्राने सर्व बाजू घेऊन बातमी दिली आहे.एक घटना मुस्लीम युवकाशी संबंधीत आहे. मोहम्मद बरकत आलम नावाचा २५ वर्षीय तरूण मशीदीतून घरी जात असता त्याची मुस्लीम टोपी काढून टाकण्याची आणि जय श्रीराम म्हणण्याची सक्ती त्याच्यावर एका टोळक्याने केली असे त्याचे म्हणणे आहे. दुसरी घटना डॉ गद्रे या पुण्यातील मान्यवर डॉक्टरांच्याबाबत दिल्लीतच घडली आहे. एका टोळक्याने त्यांनाही घेरले आणि जय श्रीराम म्हणण्याची सक्ती केली. वाद नको म्हणून गद्रे यांनी ती सक्ती मान्य केली. जय श्रीराम म्हणण्याची सक्ती झाल्यावर मुस्लीम तरूणाने रीतसर पोलीसात तक्रार केली. डॉ गद्रे यांनी तसे केलेले नाही. दोन्ही घटना निषेध करण्याजोग्या आहेत. निकालाचा सामान्य कार्यकर्ते कसा अर्थ लावीत आहेत याची झलक त्यातून मिळते. लोकशाहीमध्ये देशातील बहुसंख्य समाजाचे प्रतिबिंब निकालातून पडणे हे साहजिक आहे. तसे पूर्वीही होत होते. परंतु, आताचा विजय हा हिंदूंचा आणि फक्त हिंदूंचाच विजय आहे असा अर्थ लावला जात आहे. हा बहुसंख्यवाद आहे. बहुसंख्यांकांच्या विजयाचे उन्मादात कधीही रुपांतर होऊ शकते. तो धोका टाळायचा असेल तर आत्तापासूनच अशा, वरकरणी क्षुल्लक वाटणाऱ्या घटनांकडे, बारकाईने लक्ष दिले पाहिजे.यातील सकारात्मक बाब अशी दिल्लीतील मुस्लीम तरूणाबाबतच्या घटनेची त्वरीत दखल भाजपाचे नवे खासदार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने घेतली. त्याने ट्विटरवरून त्वरीत या घटनेचा निषेध केला आणि पोलीसांनी टोळक्याला जेरबंद करावे अशी मागणी केली. गंभीर यांची ही कृती आश्वासक आहे. मात्र भाजपाच्या काही आक्रस्ताळी समर्थकांनी गंभीरवर टीकेची झोड उठविली. यामध्ये राजकीय नेते कोणीही नव्हते तर सोशल मिडियावरील स्वयंघोषित भाजपा प्रवक्ते होते. त्यांच्या मते गौतम गंभीर याने घाईघाईने प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती. सरकारवर शिंतोडे उडविण्यासाठी काहीजण असले उद्योग करतील, त्याला फार महत्व देऊ नये असे काहीजणांनी म्हटले तर अन्य लोकांनी गौतम गंभीरवर नेहमीप्रमाणे शेलक्या शब्दांचा मारा केला. मात्र गौतम गंभीर आपल्या मागणीवर ठाम राहिला. असली टीका मी क्रिकेटर असताना बरीच सहन केली आहे असे त्याने म्हटले. तीन तासांनंतर त्याने पुन्हा ट्विट केले आणि मोदींच्या सबका विश्वास या विधानाची आठवण करून दिली. ते विधान सार्थ ठरविण्याचा प्रयत्न मी करीत आहे असे गौतम गंभीर म्हणाला.