भारत देश लिखित राज्यघटनेवर चालताे. भारतीय लाेकशाही ही जगातील सर्वात माेठी मानली जाते. कायद्यापुढे सर्व समान आणि सर्व समाज घटकांना समान अधिकार हक्क आणि स्वातंत्र्य ही मूल्येही लागू आहेत. मात्र, अलीकडील काळात काेणत्या प्रश्नांवरून धार्मिक ध्रुवीकरण करता येईल, याची जणू वाटच पाहणाऱ्या काही शक्ती निर्माण झाल्या आहेत. लता मंगेशकर यांना आदरांजली वाहताना ख्यातनाम अभिनेता शाहरुख खान यांनी त्यांच्या धार्मिक चालीरितीप्रमाणे आदर व्यक्त केला. त्यावरूनही वाद निर्माण करण्यात आला.
आता कर्नाटकात गेल्या आठवड्यापासून पेटविण्यात आलेल्या वादाचे कारणही समाजात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रकार आहे. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात काही मुस्लीम मुलींना हिजाब घालून आल्याने प्रवेश नाकारण्यात आला. याला अनेक मुस्लीम मुलींनी विराेध केला आणि हिजाब वापरण्याचे आमचे स्वातंत्र्य असल्याचे सांगितले. याचे निमित्त झाले आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शाळा-महाविद्यालयात अधिकृत गणवेशाचा वापर करण्यात यावा, अशी मागणी करीत हिजाबला उत्तर म्हणून विद्यार्थ्यांनी भगवे शाल, फेटे वापरून विराेध केला.
हिजाब वापरणाऱ्या मुलींच्या समाेर जाेरदार निदर्शनेही करण्यात आली. कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील कुंदापूरमधील या घटनेचे पडसाद कर्नाटकाच्या सर्वच जिल्ह्यात उमटले. शिमाेगा येथील महाविद्यालयातील तिरंगा ध्वज अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी उतरवून त्याजागी भगवा ध्वज फडकविला, असे वातावरण बदलत जात असताना, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, हिजाब वापरण्याचा आपला अधिकार आहे, असे प्रतिपादन करीत कर्नाटक उच्च न्यायालयात काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या आहेत.
यावरील सुनावणी चालू आहे. राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्यांनी शांतता पाळावी, असे आवाहन केले आहे. वास्तविक, विविध प्रांतात आणि धार्मिक घटकात परंपरेने आलेल्या वेशभूषा परिधान केल्या जातात. शृंगार केले जातात. उत्तर भारतातील काही प्रांतात हिंदू समाजातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना, पडदा किंवा गोषा पद्धतीचा अवलंब करण्याची सक्तीच असते. ती पद्धत एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा मानून स्वीकारली जाते.
पंजाबमधील शीख समुदायाला पगडी ही धार्मिक परंपरेने परिधान करण्याची मुभा आहे. पाेलीस दलात किंवा लष्करातील शीख पुरुषांनाही पगडी वापरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ताे एक धार्मिक स्वातंत्र्याचा भाग मानला जातो. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर विविध प्रकारचे गणवेश शैक्षणिक संस्थामध्ये परिधान करण्याची पद्धत आहे. कारण समाजातील विविध घटकातील आणि आर्थिक स्तरातील मुला-मुलींमध्ये समानतेचे तत्त्व बिंबविण्याचा त्यामागे हेतू असताे. त्याच वेळी परंपरेने आलेले बिंदी, कुंकू, टिकली, इबत्ती, नाम, गंध आधी लावण्याचे स्वातंत्रही आहे. तशीच हिजाबची परंपरा आहे. त्याविषयी काेणाची तक्रार असण्याचे कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काशी किंवा हैदराबाद येथील अलीकडच्या कार्यक्रमात साधुसंतासारखा वेश परिधान केला हाेता. अनेक तास ते पूजाअर्चनेमध्ये सामील झाले हाेते.
राज्यघटनेने निर्माण करण्यात आलेल्या पदावरील व्यक्तीने अशा प्रकारे एखाद्या कार्यक्रमाचे निमित्त म्हणून धार्मिक पेहराव परिधान करावा का, असा प्रश्न उपस्थित करता येऊ शकताे. मात्र, आपल्या राज्यघटनेने धार्मिक स्वातंत्र्यानुसार ज्या परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्या सांस्कृतिक मानून अनुमती दिली जाते. अनेक शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रमही हाेतात. त्यात सर्व जाती-धर्माची मुले-मुली सहभागी हाेतात. असे हे थाेडे मुक्त वातावरण असणाऱ्या आणि विविध धर्माचे लाेक एकत्र राहत असताना, एकमेकांना समजून घेतले पाहिजे. मुलींनी जीन्स वापरू नये किंवा पबमध्ये जाऊ नये, असा फतवा काढत कर्नाटकातील मंगलाेर शहरात उन्माद माजविला गेला हाेता. ही दादागिरी अनेकांना आवडली नव्हती. त्याचा फटका राजकारणात भाजपला बसला हाेता. हा ताजा इतिहास आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून समाजातील एकाेपा संकुचित करण्याचा प्रयत्न चांगला नाही. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा पाळत असताना, त्याची सक्ती काेणावर करणे याेग्य हाेणार नाही. त्यातून समाजाचे नुकसान हाेईल. कर्नाटकसारख्या प्रागतिक राज्यात अशा प्रकारचे ध्रुवीकरण व्हावे, ही फार माेठी धाेक्याची घंटा आहे.