विकास झाडे
इतिहासात डोकावून पाहिले तर अनेकांचे श्रद्धास्थान ‘बाबा’ असायचे. हे बाबा समाजसुधारक होते. काही विज्ञानवादी होते. अनेकांनी मानवधर्म शिकविला. गाडगेबाबांचे आयुष्यच समाजसुधारक म्हणून गेले. ते कधीच शाळेत गेले नाहीत परंतु ‘सर्वसामान्यांचे विद्यापीठ’म्हणून त्यांना जगता आले. लोकांमध्ये असलेले अज्ञान, अंधश्रद्धा दूर करणारे ‘विज्ञानवादी बाबा’ म्हणून महाराष्ट्रात त्यांचे आदराने नाव घेतले जाते.
अलीकडे ‘बाबा’ म्हटले की लोकांचा थरकाप उडतो. भीती वाटायला लागते बाबांची!. ‘बाबा’ कोणत्या वर्गवारीत मोडतो याची चिकित्सा केली जाते. गेल्या काही दशकांत अनेक ‘चमत्कारी बाबा’ जन्मास आलेत. काहींनी वेड्या लोकांमध्ये बाबा शोधला. त्यांना देवाचा अवतार म्हणून सादर केले. बाबांच्या नावाने जंगी दरबार सुरू झाला. त्यामुळे देशातील भोळी जनता फसत गेली. सामान्य आणि गरिबांना लुटण्याचा धंदा फोफावत गेला. बाबांच्या आशीर्वा$दाने श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेलेत आणि बाकीच्यांच्या नशिबी लाचारीचे जगणे येत गेले. राजकीय लोकांचे राजकारणात मजबूत पाय रोवण्याचे सूत्र एखाद्या बाबांपर्यंतच पोहोचतात. एखादा खेळाडू जगज्जेता होतो तो बाबांमुळेच! जग जिंकल्यानंतरही आपल्यात काही ‘दम’ नव्हताच जे काही झाले ते बाबांमुळेच अशा ‘लहरी’ त्यांच्या अंतर्मनात भ्रमण करतात. तो बाबांच्या पायावर साष्टांग दंडवत घालतो, ते दृश्य पाहून देशातील कोट्यवधी जनता हात जोडत, ‘आमच्यावरही कृपादृष्टी ठेव रे बाबा’ म्हणत स्वत:च मेंदूला गुलामगिरीत ढकलतात.
आसाराम, राम रहिम, रामपाल, नारायण साई आदी अनेक श्रीमंत लिंगपिसाट बाबांचा उदय झाला. आज जे राजकारणात वावरतात त्यातील बहुतांश श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांची आशीर्वाद घेण्यासाठी या बाबांकडे रांग लागायची. नेता जातो म्हणून लोकही यांच्या दरबारात हजेरी लावत होते. नंतर हे बाबा बलात्कारी होते हे सिद्ध झाले; परंतु तोपर्यंत त्यांनी हजारो महिलांना नासवले. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. धर्माच्या नावाखाली संपत्ती गोळा करणे आणि सामान्यांचे शोषण करणे हा या बाबांचा मूळ धंदा होता. आता हे सगळे तुरुंगात आहेत; परंतु सगळेच बाबा लिंगपिसाट होते, असे नाही. ‘बाबा’ हा शब्द कलंकित झाल्यामुळे बाबांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत गेला. नंतरच्या काळात ‘बाबा’ या शब्दाची इभ्रत राखली ती रामदेवबाबांनी!
देशाला योगाचे धडे देण्याचे सत्कार्य रामदेवांच्या खात्यात जमा होते. योगा व आयुर्वेद हे समाजाला निरोगी करण्याचे रामदेवांचे सूत्र होते. योगाबरोबर त्यांनी केलेल्या आयुर्वेदिक उत्पादनांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. एका सर्वोच्च श्रेणीत या ‘बाबा’ची गणना होत गेली. गेल्या दशकात बाबांचा योगा कमी आणि उद्योगांवर भर अधिक राहिला. ‘आयुर्वेद म्हणजेच बाबा रामदेव’ अशी समीकरणे व्हायला लागली. कपड्यांपासून तर बिस्किटे आणि थंड पेयावर रामदेव झळकायला लागले. रामदेव हे ‘व्यावसायिक बाबा’ झाले. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांप्रमाणे त्यांची ‘पत’ही कमी-जास्त होत गेली. कोणतेही उत्पादने लोकांपुढे आवेशात आणणे हा रामदेवांचा छंद होत गेला. पोलीस जंतरमंतरवरील आंदोलन उधळत असताना रामदेवांनी अंगावरचे भगवे वस्त्र फेकत ‘सलवारी बाबाचे’ रूप धारण केले. एका क्षणात जगाने त्यांना वेगळ्या रूपात पहिले. इतकीच तत्परता त्यांच्या काही उत्पादनांमध्ये दिसून येत गेली. रामदेवबाबांचा अंगलट येणारा घायकुतेपणा कोरोना औषधांच्याबाबतही दिसून झाला. कोरोनाने जगात पाच लाखांवर लोक मृत्युमुखी पडलेत. हा आकडा घड्याळाच्या काट्यासारखा पुढे सरकतो आहे. देशातील शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू आहे. अद्याप लस शोधता आली नाही. या वर्षात कोरोनावर लस येईल याची खात्रीही जागतिक आरोग्य संघटना देऊ शकत नाही; परंतु या सगळ्यांना रामदेवांनी एका क्षणात मुर्च्छित पाडले.
‘कोरोनिल’ नावाच्या गोळ्या दाखवून कोरोनावरचा १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे सांगून मोकळे झाले. रामदेवांचा हा प्रयोग एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हताच. मोदी सरकारमध्ये रामदेवांचे लाड पुरविले जातात. रामदेवही सरकारची त्यांच्या उत्पादनाइतकीच पोपटपंची करून परतफेड करतात. तरीही रामदेवांच्या या उपद्व्यापामुळे आयुष मंत्र्यालाही तोंड कुठे लपवावे, असे झाले; परंतु भक्ताला ठणकावून सांगणे हे प्रियांका गांधींना तातडीने घर खाली करा, सांगण्याइतके सोपे नव्हते. सुरुवातीस केंद्राने पतंजली समूहास मारल्यासारखे केले. नंतर रामदेवांनी रडल्यासारखे करत, माझे चुकले ते प्रतिकारशक्ती वाढविणारे औषध होते, असा खुलासा केला. आपल्या भक्ताला अधिक त्रास होऊ नये म्हणून केंद्राने म्हटले, आता बनवलेच आहेस आणि गुंतवणूक केलीच आहेस तर विक औषधी. फक्त कोरोना यामुळे पळून जाईल असे म्हणू नकोस. इथे सरकारचा आणि रामदेवांचा विषय संपला. औषध बाजारपेठेत येईल; पण लोकांची दिशाभूल झाली त्याचे काय? आता कोरोनिलमध्ये ‘राम’ नसल्याने लोकांपुढे ‘देव’ही होता आले नाही या ‘बाबा’ला.
(लेखक लोकमत दिल्लीचे संपादक आहेत)