सविता देव हरकरे
जामलो माकदम. अवघ्या १२ वर्षांची चिमुकली. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात राहणारी. तेलंगणात मिरचीच्या शेतात मजुरीला पाठवली होती. कोरोनाने देशात थैमान घालायला सुरुवात केली आणि लॉकडाऊन जाहीर झाले. स्थलांतरित मजुरांचे जत्थेच्या जत्थे आपापल्या गावाकडे निघाले. पायी, अनवाणी, शेकडो किलोमीटरचा प्रवास करत. त्यात कोवळी जामलोसुद्धा होती. या समूहामध्ये तिच्यासारखेच आणखी चार बालमजूर होते. तब्बल १५० किलोमीटरचा प्रवास. तोसुद्धा पायी. त्यात जामलो दुर्दैवाने मिरचीच्या शेतात पडली आणि जखमी झाली; पण तिच्यासोबत असलेले थांबायला तयार नव्हते. सगळ्यांच्या मनात विचित्र भय आणि चिंता होती. सहकाऱ्यांशिवाय तिचे तिथे कुणीही नव्हते. त्या जखमी अवस्थेतच ती त्यांच्यापाठोपाठ निघाली. तीन दिवस तिची इवलीशी पावले चालत होती; पण चौथ्या दिवशी असह्य वेदनांमुळे तिला पाऊल पुढे टाकणेही कठीण झाले आणि ती मार्गातच कोसळली. पुन्हा कधीही न उठण्याकरिता. तिला कामावर घेऊन जाणाºया कंत्राटदार महिलेने जामलोला वैद्यकीय मदत मिळवून देण्याचीही तसदी घेतली नाही आणि एका निष्पाप जिवाचाबळी घेतला. या अत्यंत संतापजनक आणि हृदय हेलावून टाकणाºया घटनेनंतर पोलिसांनी त्या निर्दयी मजूर कंत्राटदार महिलेविरुद्ध सदोष मनुष्यवध आणि मानवी तस्करीचा गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली आहे.
हे जरी खरे असले तरी जामलोच्या आयुष्याचे काय? हसण्या-बागडण्याच्या वयात तिला अशा दारुण अवस्थेत प्राण गमवावे लागले, त्याला नेमके दोषी कोण? त्यातही लॉकडाऊनमध्ये अडकलेली जामलो ही काही एकमेव स्थलांतरित बालमजूर नाही. तिच्यासारखे हजारो बालमजूर देशभरात अनेक ठिकाणी अजूनही अडकून पडले आहेत. आपल्या गावापासून, आई-वडिलांपासून दूर, कारखाना मालक किंवा कंत्राटदारांच्या भरवशावर. दोनवेळ खायलाही मिळतेय की नाही कुणास ठावूक? अत्यंत भयावह असे हे चित्र आहे.यासंदर्भात बालमजुरीविरोधात संघर्ष करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी व्यक्त केलेली चिंता प्रश्नाचे गांभीर्य दर्शविणारी आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लहान-लहान कारखाने बंद झाले आहेत. अशात तेथे काम करणाºया बालमजुरांचे काय? त्यांना त्यांच्या हक्काचा पूर्ण पगारही न देणारे खाऊ काय घालणार? परिणामी या मुलांचे जीवन धोक्यात आले आहे. ही सगळी मुले तस्करी करून आणलेली आहेत. त्यामुळे या बिकट परिस्थितीत त्यांना सुरक्षा, भोजन आणि आरोग्य सुविधा कशा मिळतील यासाठीचा मार्ग तातडीने शोधावा लागणार आहे. शिवाय त्यांना सुरक्षित घरी पोहोचविण्याची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. शासनाने या बालमजुरांसाठी शीघ्र कृतिदल स्थापन केल्यास ते शक्य होणार आहे. आपण आपल्या मुलांना बालमजुरीपासून वाचवू शकलो नाही. आता किमान अशा मुलांनाउपाशी मरण्यापासून तरी वाचवू शकतो, अशी कळकळीची विनंती कैलास सत्यार्थी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. त्यांची ही विनंती शासन मान्य करेल आणि तातडीने याअनुषंगाने कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे.
आपल्या देशाला लागलेला हा बालमजुरीचा कलंक कधी मिटणार? यासंदर्भातील कायदे कठोर करण्यात आल्यानंतरही त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. जगभरातील सर्वाधिक बालमजूर आपल्या भारतात आहेत. मोठ्या शहरांसोबतच लहान-लहान गावांमध्येही ही कुप्रथा आजही अस्तित्वात आहे. त्यातही बालकांचा हा वापर केवळ मजुरीपुरताच मर्यादित नसून, त्यांना अनेक कुकृत्यांचा सामनादेखील करावा लागतो. बालपण म्हणजे माणसाच्या आयुष्यातील सुवर्णक्षण. ना कुठल्या गोष्टींची चिंता, ना कुठली जबाबदारी. आपल्याच मस्तीत रमायचे, खेळायचे आणि अभ्यास करायचा. परंतु पराकोटीची गरिबी, लाचारी आणि आई-वडिलांची उपेक्षा यामुळे या भारतवर्षातील लाखो मुले बालपणाच्या आनंदापासून केवळ मुकतच नाहीत, तर बालमजुरीच्या दलदलीत फेकून त्यांच्या आयुष्याचा चुराडा केला जातो.
शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवून अशा मुलांचे भविष्य करपले जाते. शाळाबाह्य मुलांची संख्या बघितली की, हे वास्तव समोर येते. मुलांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळावा, म्हणून इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात आले. शाळांमध्ये मुलांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली; पण व्यर्थ. महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात लाखो गरीब लोक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी बालवयातच त्यांना कामाला जुंपतात, हे कटूसत्य आहे. यातच त्यांचे भविष्य असल्याचा ठाम विश्वास त्यांना वाटत असावा. बालमजुरी वाढण्यामागील हे एक महत्त्वाचे कारण आहे. जोपर्यंत त्यांची ही मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत जामलो माकदमसारखी लाखो मुले अशीच उद्ध्वस्त होणार, हे मात्र निश्चित.
(लेखक नागपूर लोकमतच्या उप वृत्तसंपादक आहेत)