श्रीनिवास नागेदोन वर्षांपूर्वी ‘फेसाटी’ कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेला नवनाथ गोरे आज दुसऱ्याच्या रानात राबतोय. कधी कुणाची बाजरी काढायला जातोय, तर कधी कुणाच्या द्राक्ष-डाळिंबबागेत खुरपतोय. गेली साताठ महिने लेखणी मोडून हातात खुरपं आणि खोरं आलंय त्याच्या. कामाला गेलं तरच कसाबसा दोनवेळचा भाकरतुकडा मिळतोय.. मध्यंतरी ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे या सशक्त लेखकाची कुतरओढ सुरू होती. अखेर मरणानंच त्यांची सुटका केली. पुण्यातल्या झोपडपट्टीत एकाकी मरण आलं त्यांना. दिल्लीत राहणारा भारताचा आंतरराष्टÑीय धावपटू अली अन्सारी पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर फळं विकतोय, अशी दोन महिन्यांपूर्वीची बातमी. आशियाई स्पर्धेत भारताला पदक जिंकून देणाºया हरीशकुमारवर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चहा विकण्याची वेळ आलीय.
प्रतिभावान आणि गुणवंतांच्या वाट्याला आलेलं हे अस्वस्थ करणारं वर्तमान. त्यांचा जगण्याशी झगडा सुरू असताना मदतीचा हात देणारं कुणी येत नाही. साहित्य-संस्कृतीपासून खेळापर्यंत आणि शिक्षणापासून शेतीपर्यंत कुठलंही क्षेत्र वर्ज्य नाही या अन्यायाला ! चोहीकडं प्रागतिक समाजभानाची वानवा. तरुण प्रतिभा नावारूपाला आल्यावर प्रसिद्धी, पैशाचा वर्षाव होतो. पण तो तात्पुरताच. जेव्हा त्यांचा उमेदीचा काळ असतो, तेव्हा गुणवत्ता सिद्ध करूनही त्यांना पुरेसं पाठबळ, सहकार्य आणि व्यवस्थात्मक पाठिंबा देण्यात आपण कमी पडतो.आता ‘फेसाटी’कार नवनाथ गोरेला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठात नोकरी देण्याच्या हालचाली सुरू केल्यात. नवनाथच्या जल्माची ‘फेसाटी’ होता होता कदाचित वाचेल, हे काहीसं आशादायी चित्र. अर्थात असा दातृत्वाचा हात विरळाच.नवनाथ हा साहित्य विश्वात कसदार लेखणीच्या आणि अस्सल अनुभवांच्या जोरावर उमेदीनं पुढं आलेला उण्यापुºया तिशीतला लेखक. स्वत:च्या जल्माची व्याधिकथा त्याने टोकदारपणे ‘फेसाटी’तून कागदावर उतरवली. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला; पण एम.ए., बी.एड. (फर्स्ट क्लास हं!) करूनही कायमची नोकरी नाही, कामधंदा नाही. पुढं काय, हा प्रश्न खायला उठतो. नगर जिल्ह्यातल्या महाविद्यालयावर तासिका तत्त्वावर शिकवण्यासाठी संधी मिळाली. दहा हजार मिळायचे. दीड वर्षं राबला. पण फेब्रुवारीत वडील गेले. नंतर कोरोनामुळं लॉकडाऊनचा दणका. नवनाथ गावाकडं म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या जत भागातच अडकला. महाविद्यालयावर आता तीस टक्केच मानधन मिळतंय समजल्यावर गेलाच नाही. घरात आई आणि अपंग भाऊ. सव्वाचार एकर कोरडवाहू रान. ते करत दुसºयाच्या रानात जायचं रोजंदारीला. ‘लेखनाचं काय?’ या प्रश्नावर म्हणतो, ‘साताठ महिने लेखनच काय, वाचनही केलेलं नाही. नुसती जगण्याचीच लढाई. मी कष्टाला मागं हटणारा नाही; पण वाचाय-लिहायची मन:स्थितीच नाही. दिवसभर रानात राबायचं... वेळ तर पाहिजे ना? आणि आधीच्या दोन कादंबऱ्यांचा कच्चा खर्डा तसाच पडलाय.’
- आता काहीजण म्हणतील, ही काय फक्त नवनाथची व्यथा आहे का? त्याच्याहून अधिक शिक्षण असलेले कितीक गुणवंत पडलेत की तसेच उपेक्षित नोकरीविना! हे तर खरंच! - पण जगण्याच्या एखाद्या विशिष्ट प्रांतात अधिक चमक दाखवणाºयांना सगळ्यांच्याच तागडीत तोलायला जाणार का आपण? आणि मग लेखनापासून मैदानापर्यंत आणि नवनिर्मितीपासून संशोधनापर्यंतच्या सगळ्या क्षेत्रात नवी प्रतिभाच समोर येत नाही म्हणून ओरडा करायला मोकळेच! यातला विरोधाभास आपल्या समाजाच्या आणि मुख्य म्हणजे शासकीय यंत्रणेच्या, व्यवस्थेच्या लक्षात येईल, तेव्हाच गुणवंतांना वाव देण्यासाठी प्राधान्याने संधी निर्माण करावी लागते याचं भान रुजेल. उमेदीच्या वयातल्या गुणवत्तेला व्यवस्थेने हात दिला, तर त्यातून फुलणारं त्या व्यक्तीचं आयुष्य पुढे अनेक अर्थांनी समाजाच्या कारणी लागू शकतं. समाजाच्या एकूण जगण्याची प्रत उंचावतं ! नवनाथ, अली अन्सारी, हरीशकुमार हे केवळ निमित्त. कोणताही आधार नसलेल्या अशा गुणवंतांचा जगण्याचा संघर्ष एकेकट्याचा बनतो; पण समाज मात्र त्यांच्याकडून आणखी गुणात्मक, सांघिक यशाची अपेक्षा करत असतो. त्यांच्यातील प्रतिभा जोपासण्याची कोणतीही व्यवस्था निर्माण न करता ! या आणि अशा तरुण गुणवंतांना किमान आर्थिक स्थैर्य मिळालं तरच त्यांच्याकडून आश्वासक कामगिरी होईल ना? पैशांशिवाय मानसन्मान काय कामाचा? उमेदीच्या वयातली जगण्याची लढाई फार मोठी असते.