अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

By अतुल कुलकर्णी | Published: June 16, 2024 07:01 AM2024-06-16T07:01:41+5:302024-06-16T07:02:13+5:30

अण्णा, तुमच्याकडून आमच्या अपेक्षा असताना तुम्ही आमच्या दादांना क्लीनचिट दिली की नाही, हे स्पष्ट केले तर बरे होईल.

atul kulkarni article Anna hajare did you give a clean chit to our ajit pawar or not | अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

प्रिय अण्णा,
नमस्कार, कसे आहात? खूप दिवसांनी तुम्ही राजकारणावर बोलताना दिसलात. बरे वाटले. तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा राजकारण्यांना धाक असलाच पाहिजे. एवढ्या दिवसांनी तुम्ही राजकीय नेत्यांवर टीकाटिप्पणी केल्याच्या बातम्या आल्या, पहिल्याच फटक्यात आमच्या अजितदादांवर तुम्ही हल्ला चढविला मात्र, मी असे बोललोच नाही, असे सांगून तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांनी कोणत्या पक्षाला मदतीचा हात पुढे केला, कोणत्या पक्षाने त्यांचा हात हाती घेतला, हे माहिती झाले म्हणून तर तुम्ही यु-टर्न घेतला नाही ना? दादांना मात्र, याचे फार वाईट वाटले. तुम्ही क्लीनचिट दिली की नाही, याचे उत्तर कोण देणार? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदर्श ठेवून दादा कार्यरत आहेत, हे तुम्ही विसरलात. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अशी घोषणा कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यांना प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची कोरोनापासून काळजी घ्यावी, असे सांगायचे होते. कोविड तर गेला, पण आमच्या दादांनी ती घोषणा किती मनावर घेतली हे तुम्हाला माहिती नाही, काका स्वतः खासदार आहेत, त्यांनी त्यांच्या मुलीला खासदार केले. काकांनी त्यांच्या पुतण्याला म्हणजे आमच्या दादांना खासदार केले, नंतर आमदारही केले. अनेक वेळा उपमुख्यमंत्री केले, अधून आमच्या दादांनी त्यांच्या पुतण्याला म्हणजे रोहितला आमदार केले. आता आमच्या वहिनीसाहेब तेवढ्या राहिल्या होत्या. लोकांनी त्यांना निवडून द्यावे म्हणून दादांवर प्रेम करणाऱ्यांनी गांधीजींच्या फोटोवर अमाप श्रद्धा ठेवली. ठिकठिकाणी गांधीजींच्या फोटोंचे रंगीत कागद मोठचा प्रमाणावर वाटले, पण लोकांना ते का आवडले नाहीत माहिती नाही.. म्हणून का दादांनी आमच्या वहिनीसाहेबांना खासदारच करायचे नाही का? आता संधी आली होती म्हणून लगेच आमच्या दादांनी वहिनीसाहेबांना खासदार करून टाकले. त्यामुळे इतरांच्या पोटात का दुखावे.? आता फक्त दार्दाचा मुलगा पार्थ राहिला.. खरं तर मागच्या वेळीच तो निवडून आला असता.

लोकांनी निवडून दिले असते तर कोणाची टीकाही झाली नसती, पण तो पडला म्हणून राजकारणातून संपणार का.? आता एकदा का पार्थ खासदार झाला की, सगळ्यांना सगळं व्यवस्थित दिल्यासारखं होईल. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उद्धवजींच्या घोषणेचे सार्थक होईल. हा चांगला विचार लोक का करत नसावेत. पार्थला खासदारकी दिली म्हणून कोणाला वाईट वाटणार असेल तर पार्थसाठी एखादी जागतिक पातळीवरची खासदारकी किंवा युनोचे सदस्यत्व, जागतिक बँकेचे अध्यक्षपद... गेला बाजार सदस्यपद तरी आमच्या दादांनी शोधून पार्थला दिले पाहिजे. म्हणजे उगाच इवे कोणाला वाईट वाटायला नको. आपणच वडीलकीच्या नात्याने हे दादांना सांगू शकाल. आम्ही छोटे कार्यकर्ते पडतो...

अण्णा, तुमच्याकडून आमच्या अपेक्षा असताना तुम्ही आमच्या दादांना क्लीनचिट दिली की नाही, हे स्पष्ट केले तर बरे होईल. गेले काही दिवस छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांना काय नाही दिले..? आमदारकी, उपमुख्यमंत्रिपद, आता कॅबिनेट मंत्रिपद... सतत सत्ता दिली. एमईटीसारखी संस्था त्यांना उभी करता आली. मुलगा पंकजला आमदारकी दिली होती. पुतण्या समीरला मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद दिले. त्यामुळेच तर मुंबई राष्ट्रवादीचा अध्यक्ष शोधा आणि बक्षीस मिळवा, अशी स्पर्धा काँग्रेसवाल्यांना घेता आली... आता भुजबळांना खासदारकी हवी म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या चॅनलवाले देत आहेत... असे काही नसल्याचा खुलासा आमच्या दादांनी केला. भुजबळांनी केला.. पण चॅनलवाले त्याकडे लक्षच देत नाहीत.. अण्णा, तुम्ही आता त्यांनादेखील चार गोष्टी समजावून सांगा... आमचे दादा किती रोखठोक आहेत तुम्हाला माहिती आहे. लोकसभेच्या पराभवानंतर भाजपने चिंतनशिबिर आयोजित केले. दादाम्हणाले, 'मी चिंतन करत नसतो.... दादांना सोबत घेतल्यामुळे भाजपचे मधून नुकसान झाले, असे 'त्यांच्या' मुखपत्रात छापून आले. तेव्हा 'असल्या टीकेला मी उत्तर देत नसतो...' असेही दादांनी ठणकावून सांगितले, दादांनी, अजून किती ठाम भूमिका घ्यायला पाहिजे.? दादांवर टीका करणाऱ्यांना तुम्ही समजावून सांगाल असे आम्हाला वाटले.. पण तुम्ही त्यांच्या क्लीनचिट दिली की नाही, हे स्पष्ट करत नाहीत, हे काही आम्हाला आवडलेले नाही....

अण्णा, एक गोपनीय गोष्ट सांगतो. कुणाला सांगू नका, दादांचे आणि देवेंद्रभाऊंचे खूप चांगले संबंध आहेत. उद्या अर दादांना एकटे लढा, असे सांगितले तर आमचे दादा देवेंद्रभाऊ सांगतील तेवढ्या जागेवर एकटे लढतील, तसेही दादांच्या पक्षात तटकरेंना खासदारकी मिळाली... भुजबळांना सगळे काही मिळाले. प्रफुल्लभाई केंद्राच्या क्लीनचिटमुळे खुश आहेत... आढळराव पाटील पडल्यामुळे, आमचे दिलीप वळसे पाटीलही खुश आहेत... नवनीत कौर राणा पराभूत झाल्यामुळे दादांचे उजवे हात संजय खोडके खुश आहेत.. ज्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार नाही असे वाटते, ते दादांच्या काकांकडे जायला मोकळे आहेत... त्यामुळे आमचे दादा एवढे बिनधास्त आहेत.. नव्या सरकारमध्ये त्यांचे उपमुख्यमंत्रिपद पक्के होईल, असा त्यांना ठाम विश्वास आहे... दादांना भाजपने सोबत घेतल्यामुळेच ठाणेकरांना 'ब्रेक' लागला है नागपूरकरांना माहिती आहे... तेव्हा अण्णा, या गोष्टी कुणाला सांगू नका आणि आमच्या दादांविषयी काही बोलू नका.. प्लीज... लवकरच तुमच्या भेटीला येतो.
 

Web Title: atul kulkarni article Anna hajare did you give a clean chit to our ajit pawar or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.