- पद्मजा फेणाणी-जोगळेकरसाल १९८२... भावगंधर्व पंडित हृदयनाथजी मंगेशकरांचा एके दिवशी अनपेक्षितपणे मला फोन आला... ‘मी मुंबई दूरदर्शनसाठी एक दिवाळी पहाट स्पेशल... 'शब्दांच्या पलीकडले' करतोय. मी आणि दीदी गातोय. त्यात तुम्हीही गावं अशी आमची इच्छा आहे...’ हे फोनवर ऐकताक्षणी, माझ्या पायात कापरं भरलं आणि आनंदानं हात थरथरू लागले. हे सारं काही ‘विश्वासाच्या पलीकडलं’ होतं. आजही माझ्या आयुष्यातल्या अशा अनेक घटना परमेश्वराच्या अस्तित्वाची सदैव साक्ष देतात.दीदींनी आणि बाळासाहेबांनी मला 'तरुण आहे रात्र अजुनी' गायला बोलावलं खरं, मात्र रेकॉर्डिंगच्या आदल्या रात्री मी बाळासाहेबांकडून गाणं घेऊन घरी परतल्यावर मला, ‘तुमचं उद्याचं रेकॉर्डिंग कॅन्सल झालंय’ असं सांगणारे निनावी फोन वारंवार येऊ लागले. इतकी मोठी सुवर्णसंधी हातून जाईल की काय, असं वाटून मी खट्टू झाले. बाळासाहेबांना फोन केल्यावर ते म्हणाले, ‘दीदीशी बोलून घे.’ त्वरित मी दीदींना फोन केला आणि सारं सांगितलं. त्यावर त्या गोड आवाजात म्हणाल्या, ‘ही तर तुमच्या यशाची पहिली पायरीच समजा. माझ्याही बाबतीत करिअरच्या सुरुवातीला असंच घडायचं!’दीदींचा हा असा आश्वासक सूर माझ्या सांगीतिक कारकिर्दीच्या सुरुवातीलाच माझ्या पाठीशी ‘मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’सारखा उभा राहिला, हे मी माझं भाग्यच समजते. पूज्य माई मंगेशकरांचा माझ्यावर असलेला लोभ आणि त्यांचे मला लाभलेले आशीर्वाद हेही माझं सद्भाग्यच! सन १९८१ मध्ये अनिल-अरुण या संगीतकार द्वयींच्या ‘शब्दांच्या पलीकडले’मध्ये मी गायलेले 'धुंद मंद ही अशीच सांज उतरली' हे माझं दूरदर्शनवरचं अगदी पहिलंवहिलं गीत ऐकून, ‘ही मुलगी कोण? हिने संपूर्ण कार्यक्रम खाऊन टाकला आणि मला हिच्याकडून गाऊन घ्यायचंय....’ ही दीदींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनिल मोहिलेंकडून मला समजल्यावर, माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.'लता मंगेशकर' हे नावच इतकं जादूमय आहे की, त्यांच्या सोबतच्या प्रत्येक आठवणी, प्रत्येक क्षण मला अलिबाबाच्या गुहेतच घेऊन जातात. दीदींनी माझं 'धुंद मंद...' गाणं ऐकून मला सहीसकट भेट दिलेल्या एल.पी. रेकॉर्ड आजही मी जपून ठेवल्यायत. 'निवडुंग' चित्रपटासाठी 'केव्हा तरी पहाटे' व 'लवलव करी पातं' ही गाणी बाळासाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाऊन घेऊन दीदींनी, ‘मला हिच्याकडून गाऊन घ्यायचंय...’ हा शब्दही पुरा केला. दीदींना दादरच्या पुरोहितांचे, पांढरे बारीक साखर पेरलेले पेढे, खूप आवडायचे म्हणून मी त्यांच्यासाठी घेऊन जाई. त्या वेळी आपल्या रूममध्ये टी.व्ही.वर मिकी माऊसची कार्टून्स पाहताना, खळखळून हसणाऱ्या दीदींना पाहून मला आश्चर्य वाटे नि त्यांनी स्वत:त जपलेलं मूल पाहून आनंदही होई. त्या वेळी अनेकदा दीदी आधी मला पेढा भरवत, मगच स्वत: खात. त्या छोट्या पेढ्यातला तो केवढा मोठ्ठा आनंद! असंच कधीतरी गप्पा मारताना, दीदी त्यांच्या परिचयातील जुन्या गायकांच्या गायकीची हुबेहूब नक्कल करून दाखवत. त्या वेळी २५-३० वर्षांपूर्वीचं सारं काही दीदींना जसंच्या तसं कसं काय आठवतं, याचं मला कुतूहल वाटे. तर कधी त्या माझ्याच समक्ष, हातवारे करून, मी जशी गाते, तशीच नक्कल करून दाखवत हास्याचे फवारे उडवत.एकदा दीदींनी मला, ‘मी भरली वांगी कशी करते ते पाहायला या’ म्हणून स्वत:च्या सपाता मला घालायला देऊन स्वयंपाकघरात नेलं. मला कोण आनंद! जणू काही त्यांच्या सुरांनी त्यांच्या सपातांतून माझ्या शरीरात वीजेप्रमाणे प्रवास केला तर... काय मज्जा येईल? असंच मला वाटत होतं. कढई, तेल, मसाले, बारीक चिरलेला कांदा, छेद असलेली छोटी वांगी, सारं काही आधीच तयार होतं. जणू काही संगीत दिग्दर्शकाने वाद्यवृंदासह गाण्याची जय्यत तयारी केल्यासारखं! मग दीदींनी सर्व मसाले प्रमाणात घेऊन, एका ताटात कालवले आणि छेद असलेल्या वांग्यांत भरून, ती वांगी अलगदपणे उकळत्या तेलात सोडली. ही सर्व प्रक्रिया मला दीदींच्या गाण्याप्रमाणेच भासली. संगीतकाराने तयार ठेवलेल्या प्रत्येक गाण्यात, भावभावनांचे रंग योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या प्रमाणात मिसळून, दीदी किती तरलपणे रसिकांसमोर सादर करतात तशीच! गंमतच सारी न्यारी!बालपणापासून दीदींनीच सर्वात प्रथम अनेक पिढ्यांना चांगलं 'दर्जेदार संगीत' काय असतं हे शिकवलं. त्यांनी चांगलं-वाईट जाणण्याची नीर क्षीर विवेकबुद्धी दिली. हिंदुस्थानी संगीतातला लखलखता जरतारी, उत्तुंग स्वर म्हणजे मास्टर दीनानाथ! या ओजस्वी आणि तेजस्वी दीनानाथांचीच कन्या ती! ते तेज आणि ओज दीदींमध्ये उतरलं नाही तरच नवल! आचार्य अत्रेंनी म्हटल्याप्रमाणे 'लोण्यात केशर विरघळावं' तसा दीदींचा आवाज! दीदींनीच हिंदी व उर्दूचे उच्चार शिकवले आम्हा रसिकांना. दीदींच्या स्वरांनी धर्म, भाषा, जात, पात, देश, खंड, उपखंड न मानता एकछत्री अमलाखाली अनेक वर्षं अधिराज्य गाजवलं. रसिकांचं हे असं त्यांच्याप्रति प्रेम अव्याहत राहणार आहे. कधी दूरदूरच्या दौºयात, प्रवासात एकटं असताना, दीदींचं गाणं कानावर पडलं तर केवढा मोठ्ठा आधार वाटतो आणि एकटेपण पळून जातं.कुठे कसं गावं, कुठे कसा शब्दोच्चार करावा, तलमपणे व तरलपणे भावना कशा व्यक्त कराव्यात, कुठे ठहराव घ्यावा, कुठे श्वास घ्यावा, कुठे हरकती, मुरक्या घ्याव्यात नि कुठे घेऊ नयेत, तसंच चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेला साजेशा आवाजात गायलेलं गाणं... एक ना दोन... अशा अमाप गोष्टींच्या अचूकतेचा 'वस्तुपाठ' म्हणजे साक्षात दीदी! सरस्वतीचाच वरदहस्त तो! एखाद्या विद्यापीठातही शिकायला मिळणार नाही असा कंठ, हृदय आणि बुद्धीचा संगम! माझे गुरू आदरणीय बाळासाहेबांच्या प्रोत्साहनामुळे व वादकांच्या आग्रहामुळे, मी दीदींच्या पंच्याहत्तरीला दीदींना मानवंदना म्हणून 'तेरे सूर और मेरे गीत' या कार्यक्रमास सुरुवात केली. दीदींनी इतक्या अप्रतिम गायलेल्या या गाण्यांना त्यांच्याव्यतिरिक्त कुणी स्पर्शू नये असं वाटायचं, म्हणून जवळपास २ वर्षं मी या कार्यक्रमास नकार देत होते. परंतु ‘साक्षात दीदींनी तुझं कौतुक केलंय, त्यामुळे तू त्यांना तुझ्या गाण्यातून जरूर मानवंदना दे.’ या वादकांच्या प्रेमळ आग्रहामुळे शेवटी मीही सर्व गाणी, मूळ सौंदर्यगाभा न बदलता, माझ्या शैलीत गायचं ठरवलं. माझ्या बालपणी दीदींच्या ज्या गाण्यांचे संस्कार झाले ती, तसेच सहसा वाद्यवृंदात गायली जात नाहीत, अशी गाणी मी निवडली. उदा. 'जाने कैसे सपनों में, ना जिया लागे ना, अजी रूठकर, ...त्यातले 'कहीं ये वो तो नहीं' हे गाणं तर बाळासाहेबांचं खूप आवडतं, म्हणून ते माझ्याकडून नेहमी म्हणून घेत आणि सांगत, यातला 'वो' म्हणजे साक्षात परमेश्वरच मला दिसतो. कार्यक्रमास सुरुवात करताना, दीदींचा आशीर्वाद घेतेवेळी, 'तेरे सूर और मेरे गीत' हेच नाव का ठेवलं? अशी विचारणा दीदींनी माझ्याजवळ केली. त्या वेळी मी त्यांचा हात हाती घेऊन म्हटलं, ‘धड़कन में तू है समाया हुवा, खयालों में तू ही तू छाया हुवा, दुनिया के मेले में लाखों मिले, मगर तू ही तू दिल को भाया हुवा...’ ही भावना तुम्हांप्रति माझ्या मनात आहे. मधाळ सुरांनी काळीज कापणाऱ्या गाण्याचं हेच मोहित करणारं रहस्य आहे.’दीदींच्या सुरात, 'प्रभू तेरो नाम' ऐकताना कानात देव, मनात देव, रोमरोमांत देव आणि डोळ्यांतून फक्त अश्रूधारा अशी माझी अवस्था असते. या दैवी सुरांत परमेश्वराप्रत क्षणार्धात नेण्याचं सामर्थ्य आहे, म्हणूनच वाटतं, ‘कहीं ये वो (ईश्वर) तो नहीं?...’(लेखिका प्रसिद्ध गायिका आहेत.)
कहीं ये वो (ईश्वर) तो नहीं?...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 4:28 AM