धनाजी कांबळे ।लॉकडाऊन आणि कोरोनाने जवळची, लांबची सगळीच नाती उघडी पाडली. जीवघेणा रोग झाल्यावर रक्ताच्या नात्याचे लोकही मृतदेह स्वीकारायला नकार दिल्याच्या बातम्या झाल्या, तसेच आयटी कंपन्यांमध्ये दीड-दोन लाखांचा पगार घेणाऱ्या लोकांचे रोजगार गेल्यावर त्यांनी भाजीपाला विक्री सुरू केल्याचेही दिसले. एकीकडे हे घडत असताना काही सर्जनशील लोक. ‘...ज्ञानी करून सोडावे सकळ जना’ म्हणून नवनिर्मिती करण्यात व्यस्त होते.डॉ. प्रा. नवनाथ शिंदे त्यापैैकीच एक. ओघवत्या वाणीने मंत्रमुग्ध करून सोडणाºया शिंदे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चरित्रच पुन्हा नव्याने जिवंत करून लॉकडाऊन सत्कारणी लावले. क्रांतिसिंहांची ३ आॅगस्टला जयंती. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या राज्याचे स्वप्न घेऊन जगणाºया क्रांतिसिंहांची ग्रामराज्यांची संकल्पना होती. त्यातूनच स्वयंपूर्ण शासन अस्तित्वात आणण्यासाठी त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. तुफान सेना, लोकराज्य, न्यायव्यवस्था हे प्रतिसरकारचे तीन विभाग होते. साक्षरता, कर्ज आणि व्यसनमुक्ती, विधवाविवाह, हुंडाबंदी, बालविवाहबंदी, अस्पृश्यता निवारण, आदी उपक्रम प्रतिसरकारने राबविले. तब्बल साडेचार वर्षे चालविलेल्या प्रतिसरकारमुळे त्यांच्याबद्दल वलय निर्माण झाले होते.
सामाजिक कार्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा त्यांनी जपला. संसदेमध्ये मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार. ब्रिटिश राजवटीत दीड हजार गावांमध्ये त्यांनी प्रतिसरकार चालविले. प्रतिसरकारला ‘पत्रीसरकार’ असेही म्हटले जात असे. प्रतिसरकारचा क्रांतिकारी इतिहास आजही जुन्या पिढीच्या स्मरणात असेल. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, बाबूजी पाटणकर, इंदुताई पाटणकर, भारत पाटणकर यांच्यासारख्या मंडळींनी हा वारसा जपला आहे. मात्र, याचं डॉक्युमेंटेशन झालेलं नसल्यानं नव्या पिढीला ते समजून देणं महत्त्वाचं होतं. त्यामुळेच लॉकडाऊन देशात असलं, तरी विचारप्रवृत्त करणारा मेंदू लॉकडाऊनमुक्त होता; त्यामुळेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या इतिहासाला शब्दबद्ध करून एकपात्री प्रयोगात मांडण्याचा प्रयत्न प्रा. शिंदे यांनी केला आहे.
हातात झाडू घेऊन रस्ते साफ करतानाच लोकांचे मेंदू साफ करणाºया संत गाडगेबाबा यांच्यापासून सुरू झालेला त्यांचा हा एकपात्रीचा प्रवास आज क्रांतिसिंहांपर्यंत आला आहे. संत गाडगेबाबा, शहीद भगतसिंग, गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चरित्रात्मक एकपात्री प्रयोग महाराष्ट्रभर झाले आहेत. केवळ वैैचारिक समाजप्रबोधनच नव्हे, तर दुष्काळी स्थितीत बीड जिल्ह्यातील स्वत:च्या गावातील शेतात स्वखर्चाने कूपनलिका खोदून गावाला पाणी देणारा कृतिशील प्राध्यापक म्हणूनही ते परिचित आहेत. पुस्तकाने मस्तक घडते हे खरे आहे, त्याहीपेक्षा पुस्तकातले विचार आचरणात कसे आणता येतील, त्याचा व्यवहारात कसा उपयोग करता येईल, हे महत्त्वाचे आहे, असे सांगणाºया शिंदे यांना महात्मा फुले यांच्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा इतिहास मुखोद्गत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर त्यांनी पीएच.डी. मिळविली असून, विविध विषयांवरील पुस्तकेही लिहिली आहेत. प्रा. विठ्ठल बन्ने यांच्यासोबत देवदासी चळवळीत काम करीत जटानिर्मूलनाचा उपक्रम त्यांनी राबविला. माणूस ज्या कोशात वाढतो, रुळतो, मोठा होतो, ते वातावरण त्याच्या जडणघडणीवर परिणाम करते. त्यातूनच माणसाच्या विकासाचा परीघ मोठा होतो. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हजारो प्रयोग राज्यभर करून शिंंदे यांनी एकपात्री प्रयोगांतून विचारधन पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राला संतांची, विचारवंतांची मोठी परंपरा आहे. तरीही कळतं पण वळत नाही, अशा पद्धतीने आजही उज्ज्वल परंपरा विस्मृतीत टाकून लोक अंधविश्वास, अंधश्रद्धा, जातिवाद, धर्मांधता याला जास्त महत्त्व देऊन माणूस व माणुसकीला विसरत चालले आहेत. अशा वेळी कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाºया, इतिहासाला उजागर करणाºया माणसांनी अजूनही मानवमुक्तीच्या लढ्यात घट्ट पाय रोवून प्रबोधन वारसा जपला व टिकविला आहे.
(लेखक लोकमतमध्ये वरिष्ठ उपसंपादक, आहेत)