- राजा मानेपंढरपुरात येणा-या वारक-यांच्या मांदियाळीने जागतिक विक्रम केला; मात्र त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी सरकार कधी पूर्ण करणार...आषाढी वारी उभ्या महाराष्ट्रातील सर्वस्तरातील पंढरी भक्तांचा उत्सव. आषाढी वारीला वर्षानुवर्षे लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात, ही बाब कधीच नवी नव्हती. लाखो वारकºयांची भक्तीभावाने हजेरी ही तर आषाढी वारीची परंपराच आहे. या परंपरेची आता आठवण होण्याला मात्र एक कारण आहे. ते कारण म्हणजे ‘बा विठ्ठला, आषाढी वारीतील एका दिवशीच्या वारकºयांच्या हजेरीचा विश्वविक्रम तू नोंदलास, आता पंढरीच्या विकासाचा विक्रम महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी कधी नोंदणार?’, असा भाबडा प्रश्न समस्त वारकºयांच्या मनात उभा राहिला तर आश्चर्य वाटू नये.इंडो-ब्रिटिश कल्चरल फोरम या लंडनस्थित संस्थेने २५ जून २०१७ रोजीच्या आषाढी वारीदिवशी पंढरीत हजेरी लावून विठुरायाची भक्ती करणाºया वारकरी संख्येने जागतिक विक्रम नोंदला आहे. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी एवढ्या संख्येने दर्शन घेणाºया भाविकांचा विक्रम पंढरीच्या नावे नोंदला गेला आहे. विठुरायावर निस्सीम श्रद्धा असणारा वारकरी मंदिराच्या कळस दर्शनानेही धन्य पावतो. या विक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरी विकासाच्या आणाभाका घेणारे देवेंद्र फडणवीस हे देखील पंढरपूर विकासाचा विक्रम नोंदवतील ही अपेक्षा ठेवणे गैर आहे काय? ‘नमामि चंद्रभागा’चा डंका पिटला गेला, त्यासंदर्भात मंत्र्यांच्या लवाजम्यासह त्या विषयावर पंढरपुरात परिषदही झाली. २२ कोटी रुपयांचा आराखडा तयार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आज धूळखात पडलेल्या त्या आराखड्याची आणि घोषणेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. चंद्रभागेचे पात्र वर्षानुवर्षे दूषित राहते, पंढरपूर शहर आणि परिसरातील अगदी रस्त्यापासून ते स्वच्छतेपर्यंतचे प्रश्न दुर्लक्षितच राहतात. एकीकडे धार्मिक पर्यटनाला चालना देण्याची भाषा केली जाते आणि दुसरीकडे कुठल्याही प्रकारची कृती मात्र होत नाही. नमामि चंद्रभागा या जिव्हाळ्याच्या विषयाला न्याय मिळत नाही. खरे तर उजनी धरणातील प्रदूषित आणि विषारी पाण्याच्या प्रश्नाला वाचा फुटायला हवी. उजनी धरणातील तब्बल १५ टीएमसी एवढ्या गाळमिश्रित तथाकथित ४० हजार कोटी रुपये मूल्यांच्या वाळू संदर्भातदेखील चर्चा व्हायला हवी. कारण आषाढी वारीनिमित्ताने आपण चंद्रभागा नदीत उजनीचेच दूषित पाणी सोडत असतो. जिथून दूषित पाणी येते तिथल्या शुद्धीकरणाला न्याय द्यायचा नाही आणि नमामि चंद्रभागाची केवळ भाषा करायची हे लाखो वारकºयांना व पंढरपुरातील रहिवाशांना फसविण्याचा प्रकार आहे. वारकºयांच्या ‘निवाºयासाठी ६५ एकर’ हा तळ विकसित करण्यात आला. तो देखील अपुरा पडतो. त्यामुळे आता १०० एकराचा आणखी एक तळ सांगोला मार्गावर विकसित झाला पाहिजे. वारकºयांना दिल्या जाणाºया सोयीसुविधा आणि दर्शन रांगेत क्रांतिकारी बदल व्हायला हवेत. पंढरीच्या एकात्मिक विकास कामाला निधीच्या रूपात मुख्यमंत्र्यांनी पाठबळासह दिशा द्यावी अशी अपेक्षा आहे. पण ती फोल ठरत असल्याचा अनुभव येतो. म्हणूनच ‘बा विठ्ठला, तुझ्या वारकºयांच्या हजेरीचा विश्वविक्रम तू नोंदलास, आता पंढरी विकासाच्या कामाचा विक्रम देवेंद्रजी कधी नोंदविणार?’
बा विठ्ठला, तू विक्रम केलास, देवेंद्रजी कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:28 AM